शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

अर्धरात्री







 
अर्धरात्री जग सारे
स्वप्नसुखी निजलेले
देहराग प्रीतजाग
वादळून मिटलेले

जागेपण व्यर्थ माझे
मनी प्रश्न गंजलेले
कृपा कष्ट दाता स्वतः
सैरभैर पडलेले

प्रार्थनेत बळ नाही
पाहण्यात शक्ती किंवा
ओघळते रात्र काळी
जाळणारी खंत जीवा

घेवूनी हे जायचे का
ओझे असे खांद्यावरी
वासनेच्या गोधडीत
झोप ती वा आहे खरी

इमारती फटीमध्ये
चांदणी उभी मुक्याने
वाट माझी पाहते वा
मांडला खेळ मनाने

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

निर्धावल्या नोकरीत ..





निर्धावल्या नोकरीत
निर्धावला उपकार
इथे काही होत नाही
येणे जाणे उपचार

अडलेल्या जनतेचे
देव आम्ही सरकार
लिहूनिया चार शब्द
ऐट मोठी मारणार

येता कधी जाता कधी
कुणा कोण पुसणार
अळी मिळी चूप चळी
याला तो सांभाळणार

पटापट गर्दी काढा
लिहा सारे साच्यावर
झाल्या तर होवो चुका
मारू साऱ्या फाट्यावर

क्षण कुणी जादा घेता
कावूनिया त्याच्यावर
दहा क्षण वाया जावो
गय नाही करणार
  
मोठमोठ्या गप्पा मारो
साहेब त्या खुर्चीवर
आम्ही सारे पोहचले
त्याला काय कळणार

येता इथे बसताच
चटके ते बुडावर
कळेल तो त्याला मग
बावट्याचा कारभार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...