रविवार, २६ एप्रिल, २०१५

विष्षण माझ्या मनात आले






विष्षण माझ्या मनात आले
तेच कालचे स्वप्न देखणे
काळोखी मग किर्र बुडाले
प्रकाश रिंगण इवले साने

जरा जगू दे अरे जीवना
गीत म्हणू दे श्वासामधले
कुठल्या दिशे मधून येती
क्षण उदास धुरकटलेले

एक सावळी मूर्त कोरली
पुन्हा मनात उभी राहिली
हसरे डोळे नितळ काळे
हृदयातील तार तुटली

जरा जरासा हर्ष जागला  
पुन्हा तमात मिटून गेला
शोधू कुठे मी प्राणामधला
स्पंद इवला थरथरला  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, २५ एप्रिल, २०१५

जाय अशीच पुढे निघुनी




तेच जुने
शब्द उसने
हवे कशाला
तुला साजणे

तुझ्या प्रीतीचे
लाख तराणे
होते माझे
सुरात जगणे

सवे तुझ्या
गेले गाणे
आभासात
आता जगणे

जाता तू
काच तडकने
झाले मन
उदासवाणे

कधीतरी तू
जवळी यावे
आणि माझे
स्वप्न सजावे

   अशी वांच्छा  
काही धरली
दिवा स्वप्ने
जणू ठरली

ग जगण्याचे
रंग फिकुटले
  जीर्ण पोपडे  
काही उरले

तुला माहित
जरी सगळे
पण दैवाने
हात बांधले

  जाय अशीच  
पुढे निघुनी
 विझेल चिता  
सारे जाळूनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

जीवाश्म




मी नक्कीच विसरलोय    
असे  वाटत असेल तुला    
मग पांघरुनी मनावर
असशील तू जन्म घेतला

असेच सारे समज तुझे
हवेत सखी वाढायला
नवे गांव नवा रस्ता
हवा पुन्हा चालायला 

काही काही जनावर
फार द्वाड असतात
मेले तरी खोलवर ते
अश्मी होवून राहतात

तसाच काहीसा आहे मी
उकरले की दिसणार
पण असे जड जीवाश्म
त्याने काय फरक पडणार

तसा अर्थ काहीच नाही  
कुठल्याही पाषाणाला
कळणाऱ्याला कळला तर
वा जाई पायी लाथाडला
   
बाकी सरो गोष्ट माझी
फक्त उरो तुझे नाव
या माझ्या असण्यालाही
विसरून जावो सारा गाव


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...