शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

तू नाही म्हणाली त्याला..







वीस वर्ष झाली
तू नाही म्हणाली त्याला
पण कालच घडल्यागत
तो प्रसंग
उंचावरून दरीत पडल्याचा
तो अनुभव  
शब्द सुचत नव्हते तेव्हा
भावना झाल्या होत्या दग्ध
आणि तो स्पोर्टली घेतल्याचा
माझा सपशेल नाटकी अभिनय

आता मला तुझी स्वप्न पडत नाही
(झोपही नीट लागत नाही
वाटत वय झालय)
तुझे सुख दिसते दुरून
अन माझेही बरे चाललेय
पण हा दिवस
अन ही तारीख
हटकून आठवण आणते
साऱ्या जगाचे वाढदिवस
विसरणारा मी
आत स्मृतीची घंटी वाजते

जर तरचा हिशोब
आता मनात उमटत नाही
डोळ्यात पाणी मन हळवे
काही काही होत नाही
पण या तारखेचे अन
या आठवणीचे काय करायचे
मला खरच कळत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

विस्मरण





मी तुला पहिले आहे
कितीतरी वेळा
कितीतरी ठिकाणी
तू मला भेटला आहे
कितीतरी वेळा
कुठे कुठे धावूनी  
परी होता दृष्टीआड तू
मी तुजला सदैव
गेलो आहे विसरुनी  

कधी तरी लहानपणी
चुकला रस्ता परकी जागा
शहर अनोळखी
गेलो घाबरूनी
डोळे आटले रडरडूनी
तूच तेव्हा हात धरुनी
सोडलेस मज घरी आणुनी
कोण तू ते कळल्यावाचुनी
   
कधीतरी खोल पाण्यात  
बेफिकीरीत गेलो पोहोत
थकलो दमलो आली ग्लानी
धावलास तू मित्र होवुनी
ते नावही तुझे  
मज न ये स्मरणी  

निराशेच्या घनदाट क्षणी
विषण्ण दग्ध उदास मनी
दिलीस उभारी नव संजीवनी
सांभाळलेस मज धीर देवूनी  
बुडणारी नाव जणू की
सोडलीस तीरी आणुनी

पण तरीही ..
होता दृष्टीआड तू
मी गेलो तुला विसरुनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/









बुधवार, १ एप्रिल, २०१५

म्हाताऱ्याची आत्महत्या







जगून खूप झालय जीवना
फूट आता मरून जातो   
ओझे वाहून थकलो तुझे  
पुरे आता फेकून देतो  


तुझी उष्टी सुखं किती
ओरपून मी चाखली इथे
कळून चुकले पण आता
किती मज फसवले तू ते


किती असावे हलकट कुणी
खरेच दाखवून दिलेस तू  
वेचलेल्या प्रत्येक फळात
किडीस पेरले होतेस तू


आणि फिरविले बैलागत
पोट चाकरी लावून पाठी
मरणाची दावूनी भिती  
नाडलेस रे दिवसाकाठी


दिला तसाच देह फटका
सुमार व्याधीत मळलेला
अन अभिमानी मन वरी
मीठ जखमेवर चोळायला


वृद्ध घोडा मरून जाता
तुला फरक पडत नाही
पण तरीही लक्षात घे रे
तू मला मारत नाही


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...