गुरुवार, २ एप्रिल, २०१५

विस्मरण





मी तुला पहिले आहे
कितीतरी वेळा
कितीतरी ठिकाणी
तू मला भेटला आहे
कितीतरी वेळा
कुठे कुठे धावूनी  
परी होता दृष्टीआड तू
मी तुजला सदैव
गेलो आहे विसरुनी  

कधी तरी लहानपणी
चुकला रस्ता परकी जागा
शहर अनोळखी
गेलो घाबरूनी
डोळे आटले रडरडूनी
तूच तेव्हा हात धरुनी
सोडलेस मज घरी आणुनी
कोण तू ते कळल्यावाचुनी
   
कधीतरी खोल पाण्यात  
बेफिकीरीत गेलो पोहोत
थकलो दमलो आली ग्लानी
धावलास तू मित्र होवुनी
ते नावही तुझे  
मज न ये स्मरणी  

निराशेच्या घनदाट क्षणी
विषण्ण दग्ध उदास मनी
दिलीस उभारी नव संजीवनी
सांभाळलेस मज धीर देवूनी  
बुडणारी नाव जणू की
सोडलीस तीरी आणुनी

पण तरीही ..
होता दृष्टीआड तू
मी गेलो तुला विसरुनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/









बुधवार, १ एप्रिल, २०१५

म्हाताऱ्याची आत्महत्या







जगून खूप झालय जीवना
फूट आता मरून जातो   
ओझे वाहून थकलो तुझे  
पुरे आता फेकून देतो  


तुझी उष्टी सुखं किती
ओरपून मी चाखली इथे
कळून चुकले पण आता
किती मज फसवले तू ते


किती असावे हलकट कुणी
खरेच दाखवून दिलेस तू  
वेचलेल्या प्रत्येक फळात
किडीस पेरले होतेस तू


आणि फिरविले बैलागत
पोट चाकरी लावून पाठी
मरणाची दावूनी भिती  
नाडलेस रे दिवसाकाठी


दिला तसाच देह फटका
सुमार व्याधीत मळलेला
अन अभिमानी मन वरी
मीठ जखमेवर चोळायला


वृद्ध घोडा मरून जाता
तुला फरक पडत नाही
पण तरीही लक्षात घे रे
तू मला मारत नाही


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, ३१ मार्च, २०१५

नग्न बाहुल्या




लक्ष्यावधी भिंतीत इथल्या
लक्ष कहाण्या जळमटल्या
तरी सांभाळत छता आपुल्या
उनसावली खेळत राहिल्या
धुरामध्ये कधी खंगल्या
प्रकाशात कधी आटल्या
झुंबरात वा कपात फुटक्या
त्याच सावूल्या नाचून गेल्या
नग्न बाहुल्या विस्कटलेल्या
सताड डोळे ओठ फाटल्या
दुकानात त्या सजल्या धजल्या
किंमत त्यांची चार टिकल्या

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...