बुधवार, ११ मार्च, २०१५

गर्भाशयोच्छेदन







  
डॉक्टरांनी सांगितले
जगायचे असेल तर
गर्भाशय काढावेच लागेल
प्रचंड रक्तस्त्रावाने
बधीरलेले शरीर
घाबरलेले मन
लगेच तयार झाले
भराभर तपसण्या झाल्या
सोपस्कार पार पडले
अन ऑपरेशन झाले
अन हळू हळू जीवन  
रुळावरून धावू लागले  
महिना उलटून गेला
ती वेळ येणार नव्हती
माहित होते तरीही
चुकल्या चुकल्या सारखे
वाटू लागले
आयुष्यभर जे
नको नकोसे वाटत होते
इथे तिथे सदा आडवे येत होते
त्यातून सुटका होवूनही
उगाच सुटका झाली
असे वाटत होते
का ?
खरच कळत नव्हते
आणि हजारो वर्षाची मी
स्वत:वर उगाच नाराज होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ९ मार्च, २०१५

रंगात सावळ्या तुझ्या



सावळ्या रंगात तुझ्या
भिजायचे होते मला
डोळीयात काजळाच्या  
निवायाचे होते मला

तू कृपेची बरसात
तू सुखाची रुजवात
असे स्वप्न देखणे मी
पाहिले ना जीवनात

गाऊनी गीत किती मी
रेखाटले होते तुला
मांडुनि शब्द कोवळे
सजविले होते तुला  

शोधतांना जन्म गेला
सुख क्षण भेटले ना
मी तरीही मोहरलो 
कवडसे वेचतांना

विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ५ मार्च, २०१५

पुन्हा गोंगाट






पुन्हा गोंगाट
पुन्हा घणघणाट
मद्यधुंद मनाचा
उथळ थयथयाट

बंद खिडक्यावर
आपटणारा नाद
थरथरत्या काचा
उरात धडधडाट

आम्ही आहोत
तेच ते ग्रेट
संस्कृतीरक्षक
कट्टर नि कडवट   

चाले वर्षानुवर्ष
तोच अव्याहत
उद्दाम उच्छाद
अचकट विचकट

शांती सदैव
कपाळ आवळत
राहे कोंडून
स्वत:त थरथरत  

काय हे कधीच
थांबणार नाही  
डबकी स्वच्छ का
होणार नाही


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






रविवार, १ मार्च, २०१५

विपर्यास






शब्द सांडून सारे मी उभा आहे कधीचा
मागून मिळेना मज स्पर्श त्या पोकळीचा

हे गाणं विझलेले अन हे भान थिजलेले
व्याकूळ नीरवता तळ क्षुब्ध काळजाचा

कोमेजला देह कधी हे कळलेच नाही
सुटल्या पाकळ्या परी गंध तोच कालचा

दिसे सत्य उजेडी का विपर्यास हा त्याचा
लपुनी सावलीत स्पर्श छळे काळोखाचा 


 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...