गुरुवार, ५ मार्च, २०१५

पुन्हा गोंगाट






पुन्हा गोंगाट
पुन्हा घणघणाट
मद्यधुंद मनाचा
उथळ थयथयाट

बंद खिडक्यावर
आपटणारा नाद
थरथरत्या काचा
उरात धडधडाट

आम्ही आहोत
तेच ते ग्रेट
संस्कृतीरक्षक
कट्टर नि कडवट   

चाले वर्षानुवर्ष
तोच अव्याहत
उद्दाम उच्छाद
अचकट विचकट

शांती सदैव
कपाळ आवळत
राहे कोंडून
स्वत:त थरथरत  

काय हे कधीच
थांबणार नाही  
डबकी स्वच्छ का
होणार नाही


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






रविवार, १ मार्च, २०१५

विपर्यास






शब्द सांडून सारे मी उभा आहे कधीचा
मागून मिळेना मज स्पर्श त्या पोकळीचा

हे गाणं विझलेले अन हे भान थिजलेले
व्याकूळ नीरवता तळ क्षुब्ध काळजाचा

कोमेजला देह कधी हे कळलेच नाही
सुटल्या पाकळ्या परी गंध तोच कालचा

दिसे सत्य उजेडी का विपर्यास हा त्याचा
लपुनी सावलीत स्पर्श छळे काळोखाचा 


 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

तू तशी मुळीच नाही





कुणी म्हणो तुला काही
नावे ठेवो उगा काही 
पण मज माहित की 
तू तशी मुळीच नाही

घेरतील सारे तुला
सोडणार मुळी नाही
टोचतील सारे तुला
झेपणार बघ नाही

सांग किती लढशील
जग थांबणार नाही
सांभाळून चाल किती
माग सोडणार नाही

तुला सारे कळूनही
पर्वा मुळीसुद्धा नाही
आगीसवे खेळण्याचा
छंद अन जात नाही

सांगू कसे अन किती
तू ती ऐकणार नाही
परी मज ठाव आहे
कधी चुकणार नाही  

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

म्हटले तर..





ती हसली म्हणून
मी हसलो
म्हटले तर वाचलो
म्हटले तर मेलो
घर का गुलाबीच होते ?  
ना आठवते !
पण बहुदा ते
तसेच होते
काय काय इथे  
जमा मी केले
आश्चर्य वाटते
काय मीच कमावले
बरे असो आता ते
झाले ते झाले
जगण्यास काही
कारण मिळाले
आणि बाकी
तसेच सारे,
पोरे सोरे
शाळा फिळा
डोनेशन वगैरे वगैरे
चाललीय गाडी
होते कधी पंक्चर
झाडावर कुठल्या
आदळले बंपर
म्हटले तर
व्यर्थ बरळणे आहे
म्हटले तर
आनंदे गाणे आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...