बुधवार, १६ जुलै, २०१४

पुन्हा रुजू येता प्रीत ...






मनातील प्रश्न सारे
मनामध्येच राहू दे   
चुकलेल्या उत्तराने
वर्ष व्यर्थ जातात रे

तुटलेत धागे जरी 
काही मनी जपावेत
पुन्हा रुजू येता प्रीत
नवे स्वप्न फुलावेत  

जीवनाच्या वादळात
कधी कुणी हात देत
आतल्या जखमावर
हळूवार फुंकारत

संशयाची छाया मनी
पडूनिया देवू  नको
हाती येता पुन्हा फुले
उधळून देवू नको

छोटेशीच जिंदगानी
भराभर वर्ष जाती
सुटल्याची खंत नको
सुटू देत खोटी नाती   

अशी हास खळाळून
आनंदाने झळाळून  
बाकी सोड सारे सारे
प्रीती कर उधाणून


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १५ जुलै, २०१४

सजवावे तुज ..





तुझे एकटेपण
तुझ्या ओठातून
उमटते काही
बहाणा घेवून

जरी दूरवर
सोडुनिया घर
मनाच्या अंगणी
स्मृतीचा सागर

मायावी जगात
मायावी शब्दात
हरवे स्वत:ला
उगाच कशात

तुझे थकलेले  
व्याकूळ डोळे
मनात दाटले
आभाळ सावळे

मजला बेचैन
टाकती करून
वाटे सुखा मग
आणावे खेचून

हजार गाण्यांनी
हजार शब्दांनी
सजवावे तुज  
हजारो स्मितांनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, १४ जुलै, २०१४

नको नको रे पावसा








नको नको रे पावसा
पुन्हा बोलावूस मला
देही तळमळे माझ्या
तुझा डंख ओला ओला

ऐन यौवनाच्या देही
तुझं पिसात वागणं
धसमुसळ्या हट्टी
नको नकोसं करणं

दाही दिशातून येत
मज करशी पाचोळा
लाख ओठांनी जहरी
जीव बेजार कोवळा

वस्त्र राहते नावाला
असा देहात भिनतो
माझ्या मनातील नाव
दूर देशांतरा नेतो

मज खेचते तुझीच
धुंद गारुडी नजर
नको नको म्हणुनी मी
धाव घेते छतावर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...