रविवार, ११ मे, २०१४

छक्का





भिकेच्या पैशाने
विकत घेवून गुटखा
रस्त्याने साडीमध्ये
ताड ताड गेला छक्का
काळा उंच रुंद खांद्याचा
उभट पुरुषी चेहऱ्याचा
रबर बांधल्या कुरळ्या केसांचा
धनी उपहासी नजर स्मितांचा   
जुनाट कुठली साडी टाकली
वेडी वाकडी होती नेसली  
सैल विटकी तशीच चोळी
घालण्यासाठी होती घातली
तीच टाळी कमावलेली
दे रे राजा ओळ ठरली
राकट हात डोक्यावरती
ठेवत स्वारी होती चालली
किंचित किरटा स्वर फाटका
स्त्री लयीत शब्द दुमडला
किन्नर मी म्हणत स्वतःला
देवलोकी जावून भिडला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





शुक्रवार, ९ मे, २०१४

तोच चेहरा

क्षणात सरले 
सारे संचित
रित्या ओंजळी
रितेच भाकीत
श्वासामधले 
प्राण जळले 
मागे उरले 
भास आंधळे 
नकोत स्वप्ने 
नकोच जळणे 
उगा असू दे 
उदास जगणे 
भिर भिरणारी 
फुलपाखरे 
चंद्र तारे ही 
नको नको रे
तोच चेहरा 
पुन्हा पुन्हा 
अलभ्य तरीही 
पुसता पुसेना


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

तो निघून जाता ..




पाहल्या वाचून मागे  
तो गेला असे निघून
फुटलेल्या शब्दातून
स्वप्न गेले विखुरन

भावनांच्या भरतीने
मन होते भारावले
यौवनाच्या वादळाने
विश्व सारे गंधाळले

चार हाती रुजविले
रोप का जळून गेले
प्रेम होते शिंपले वा
अन्य काय ते वेगळे

सुटण्याचे दु;ख नाही
प्रतारणेची वा व्यथा
चुकले मीच कळूनी  
स्वप्न पहिले ते वृथा

येणार तो नाही आता
मीही मागे जाणार ना  
घाव काही असतात
सोसण्यास जळतांना

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, ८ मे, २०१४

विलास आपटे (हिमोफिलियाचा शाप )



विलास आपटे ( श्रध्दांजली )

हिमोफिलियाचा शाप घेवून
आलेला देखणा गंधर्व .
आजारानं आलेल्या
अपंगत्वाला न जुमानता
रुबाबात जगणारा
मनस्वी रसिक माणूस .
त्याला माहित होतं कुवती पेक्षा
खूपच खालच काम करतो आपण
पण आलेलं प्रत्येक काम
संपूर्णपणे निभावलं त्यानं
मरणाशी पैजा घेत जगतांना
आजाराशी शांतपणे लढतांना
त्रागा त्रास वैताग कधीही
दिसला नाही वागतांना
कितीवेळा कुठ कुठ 
रक्तस्त्राव व्हायचा त्याला
महागडं इंजेक्शन घेवून
हसत हसत पुन्हा तो
रुजू व्हायचा कामाला
हात वर करून बराय म्हणायचा
त्या आजारावर पीचडी करू शकेल
एवढी माहिती होती त्याला
सारे कॉम्प्लिकेशन सारे उपचार
भोगून माहीत होते त्याला
शेअर मार्केटची मैत्री होती
खाण्यावर भक्ती होती
मित्रांवर प्रीती होती
सौंदर्यासक्त दृष्टी होती
तरीही लग्न कधी केले नाही
चार दिवसाच्या चैनी साठी
कुणाचे आयुष्य बरबाद केले नाही
भाळी आलेलं प्राक्तन
कुणाच्या माथ्यावर लादलं नाही
सदैव प्रसन्न हजरजबाबी
विलक्षण बुद्धिवान व्यक्ती होती
आजाराआडून आलेल्या आजारानं
त्याचा घात केला
चतुर चाणाक्ष मित्र आमचा
आम्हाला सोडून गेला
कधी कधी म्हणायचा तो
इंजिन ऑईल गळणारी
गाडी आहे आमची
कधीतरी कुठल्या वळणावर
थांबली कि थांबलीच
ऑईल आपलं अनरिप्लेसेबल
चालेल तेवढ चालेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ७ मे, २०१४

विजयी हार..


अजुनी माझ्या हृदयात
अव्यक्त अधीर थरथर आहे
शिणल्या या वेड्या मनात
अतृप्त धुंद काहूर आहे
मोडून गेल्या वाटा तरीही
व्याकूळ उत्सुक नजर आहे
तिचे अबोध खट्याळ डोळे
निग्रह जळला कापूर आहे
किणकिणते हास्य भोवती  
शीतल शांत लहर आहे
माझी माझ्यासमोर सदैव  
एक विजयी हार आहे
  
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...