रविवार, ४ मे, २०१४

द्वंद्व ..






द्वंद्व ..

तू कविता झाली आहे
माझ्या मनी रुजली आहे
युगायुगांचे अंतर तरीही
मनी चंद्रिका भिनली आहे

अरे बापरे काय करे मी  
कोण तू अन कुठली आहे
कर लगबग चल निघ इथुनी
गाडी ही तर सुटली आहे

विरघळवणारा सहवास तुझा
मनी फुले सजली आहे
जावू नये तू दूर कधीही
अभिलाषा ही जागली आहे

हो जागा का उभाच निजला
वर्ष तुझी ती भरली आहे ?
कुठे चालला स्मरे तुला का
काय अक्कल विकली आहे ?

ये जगताचे बंधन तोडून
पदी प्रीत अंथरली आहे
भिन्न तुझे अन जग माझे
पायवाट मी विणली आहे

काय करावे या मनाला
नाठाळ बुद्धी झाली आहे
मान्य मला ही प्रीती जरी
वाळू हातून गळली आहे  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ३ मे, २०१४

पोस्टमार्टेम रिपोर्ट.. (The cause of death is cast)




उद्या परवा सीलबंद त्याचा  
पोस्टमार्टेम रिपोर्ट येईल
खरा असेल कदाचित खोटा नसेल   
पुरा असेल बहुदा अपुरा नसेल
करणाऱ्याच्या मनावरील
ओझ्याखाली दबला नसेल
आणल्या पुसल्या पुराव्याने
उलटा सुलटा झाला नसेल
वैद्यकीय भाषेत शास्त्रशुद्ध
जसा कि ...
अतिरिक्त रक्तस्त्रावाने..
अथवा गुदमरून गेल्याने ..
वा व्हिसेरा तपासनीस  
रिपोर्ट लवकरच कळेल..  
वगैरे ..वगैरे.. परंतु
काहीही असला तरी
कधीही आला तरी
तो रिपोर्ट ..
खरा कधीच नसेल
कारण त्याच्या मृत्यूचे कारण
कुठलेही सर्टिफिकेट  
कुठलाही रिपोर्ट  
कधीच दाखवणार नाही
त्यांना मुळी दाखवताच येणार नाही
कारण ते असेल “ जात “
(The cause of death to the best of my knowledge and belief is cast )

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २ मे, २०१४

भरल्या पोटाची कविता





भरलेल्या पोटानं
लिहतोय कविता
“भुकेने जळल्या
कलिका लता”

शांत निवांत
लोडला टेकून
एसीचे तापमान
योग्य राखून

शब्दाचा परिणाम
यमक विचार
आठवतो कुठली
उपमा चमकदार

ठरवले असते
कविता लिहल्यावर
मॉलला चक्कर
दुपारचा पिक्चर

आणि आल्यावर
लाईकवर नजर
थँक्स धन्यवाद
लाघवी उत्तर

तोवर तिकडे
जंगलात दूरवर  
एका बळीची
पडतेच भर  

वाचणारा अरे रे  
लिह्णारा खरे रे
काही मिनीटातच
विसरती सारे

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





गुरुवार, १ मे, २०१४

माणूस आहोत आपण..




(नितीन आगेच्या निमित्ताने)

सतरा अठरा वर्षाचे
तरुण कोवळे वय
कुठल्याही मुलीने
हाक मारली तरी
धडधड वाढायचे
नर्व्हसनेस झाकायचे
वेड्या खुळ्या स्वप्नांचे
रानभूली वय
अश्या या वयात
अनोळखी वनात
हलकेच पाऊल
पडले म्हणून
यौवनाच्या गंधाने
नकळत छाती
भरली म्हणून
द्वेषाचा तीर गेला
धुंद हृदयास भेदून
कळल्या वाचून गंध कसला
कुठल्या फुलावरून आला
कट्टर कडव्या हातांनी
श्वास बंद करून टाकला
माणूस आहोत
माणूस आहोत
माणूस आहोत आपण
कितीदा सांगायचे
पुनःपुन्हा त्यांना    
कानामध्ये ओरडून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, ३० एप्रिल, २०१४

मदांध सत्ता ...


तोंडामध्ये पान चघळत
अजस्त्र देह धडधाकट
पुढे येती सरसावत
याचे त्याचे नाव सांगत
कुणाकुणाच्या नावाचा
टिळा कपाळी लावलेला
डोळ्या मध्ये बेदरकार
सत्तेचा मद भरलेला
तोंडामध्ये उग्र भाषा
उग्र वासात मिसळली
परीटघडीच्या पेहारावी
गुंडगिरी सजलेली
आम्ही झोडू आम्ही मोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्या वाचून
समोरच्याला पार गाडू
होते दानव काय वेगळे
यवनांनीही हेच केले
बाहुच्या मदात मातले
परि शेवटी मातीत गेले
नियती फिरवे गरागरा
तीच वर्तुळे पुनःपुन्हा
सत्ता मद अविचार अंत
कळूनी सारा घडे गुन्हा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...