रविवार, ६ एप्रिल, २०१४

व्हाटसअपवर बायको ..





ती जेव्हा एकटीच
फेसबुक किंवा व्हाटसअपवर
चँट करत असते
मी जवळ जाताच
पटकन लॉग ऑफ करते .
आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर
येणाऱ्या गदेवर
चांगलीच सुनावते .
ती तिचा मोबाईल
कधीच एकटा सोडत नाही
झोपतांनाही उशाखाली
अगदी जवळ ठेवते .
त्यावर टपलेला मी
फेऱ्या मारत राहतो
किती दिवस झाले अजून  
हात चोळत बसतो .
ती कुणाशी बोलते ?
कुणाला काय पाठवते ?
काय बघते ? का हसते ?
मी सदैव बेचैन असतो
तिला कोण फसवत तर नसेल ?
तिचे पाऊल घसरत तर नसेल ?
नको त्या शंकांनी
मग मन व्याकूळ होते .
तशी ती सुजाण आहे
कर्तव्यपरायण आहे
दोन मुलांची आई आहे
पण मन कुणाचे कधी
का कुणाला कळते ?
त्या तिच्या शिट्या
व्हाटसअप वरच्या  
माझे बीपी वाढवत असतात
तिचे माझ्यावरले लक्ष
कमी कमी करीत असतात
नाही म्हटलं तरी
मनाच्या क्षितिजावर
काळे ढग जमा करतात .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ५ एप्रिल, २०१४

अण्णा पाटील गेले तेव्हा ,,



एक लढाई अस्तित्वाची होती संपून गेली   
समोर त्या देहाची होती फुले विझली
आकंठ संसारात ते मग्न मुली नातवात
हिंदोळ्यावर सुखाच्या सदा होते झुलत 
सारे काही होते त्यांच्या मनासारखे झालेले
सुखा समाधानात होते आयुष्य चाललेले 
नाकासमोर पाहत निर्मळ जीवन
सदैव जगले आपल्या दृढ तत्वास धरून
घरा दारावर केले सदैव प्रेम भरभरून
उरात ठेवली मोट स्वप्नांची सांभाळून
आणि मग अचानक उभे ठाकले मरण
चार महिन्यात गेले सारे काही संपून
किती तरी स्वप्ने ठेवली होती कवटाळून
अचानक गेली होती तीही सारी संपून ...

हे खर आहे की मरण कुणाला चुकत नाही 
पण अस मरण कुणाला याव बर वाटत नाही
पूर्ण विरामाची जाणिव आतून उलगडावी
पाण्याची ओंजळ पाण्यात रिती व्हावी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४

वासनाकेंद्र ..



मेंदुच्या कोपऱ्यात ..
कुठेतरी आत
आदिम काळापासून 
ठामपणे बसलेले
वासनाकेंद्र ..
असते एक सत्ताकेंद्र
सर्वव्यापी जीवनाचे
कधी शक्तिशाली
सार्वभौम राजासारखे
तर कधी बेदरकार
बेमुर्वत गुंडासारखे
तुमच्या चांगुलपणाचा
अथवा धाकधपाट्याचा 
त्यावरती काहीही
परिणाम होत नाही
राजरोसपणे कधी
छाती पुढे काढून
चोरासारखा कधी
अंधाऱ्या गल्लीतून
आपले अस्तित्व क्षणोक्षणी
ते सिद्ध करीत असते
या अफाट अनाकलनीय
सृजनधारेचा  ताबेदार  
कोण आहे कळत नाही
असंख्य सुखाच्या
पोतडीत त्याच्या
कधी कधी असतात
अतिशय तीव्र तीक्ष्ण
मारक शस्त्र
जी क्षणात करू शकतात
जीवनाचा नाश
सहजपणे कधीही
क्षणभराच्या
आंधळ्या आवेगाने
आणि मग
आक्रोशनी भरलेले
पश्चातापी धरणे
व्यर्थ ठरते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

युनिअन





युनिअन जेव्हा झूल बनते
एका समांतर सत्ताकेंद्राची
जी अंगावर चढताच
काल जन्माला आलेल्या पाडसाला
फुटतात मोठमोठी शिंगे
दहशतीची झुंडीची मग्रुरीची
मग हाती काठी घेवून
वर्षोनुवर्ष रान राखणारे गुराखी
होवून जातात हतबल
अन त्यांना चरू देतात
हवे ते हवे तसे रान
सहजच कानाडोळा करून
नियमाकडे न्यायाकडे
मग अकाली बाळस धरलेल्या
त्या पाडसाचे प्रचंड धूड होते
त्याला मार्ग करून दिल्या शिवाय
हातात काहीच नसते .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, १ एप्रिल, २०१४

विटाळशी ??




आजवर दबले गेलेले बंड 
आता नक्कीच पेटणार
यज्ञ म्हटले कि त्यात  
काही समिधाही पडणार
काही जरी झाले तरी
आता मागे हटू नका  

ते जुनाट मंत्र म्हणतील 
भरपूर तूप ओततील
ऋत्विज धारण करतील
सारी सूत्रे पुन्हा एकदा
हाती घेवू पाहतील   
त्या त्यांच्या हिकमतीला
पण फशी पडू नका

ते पुन्हा तुम्हाला सजवतील
वाजत गाजत नेतील
हसू नका हुरळू नका
यज्ञबळी होऊ नका
यज्ञकर्मी तुम्ही यज्ञवन्ही
हे कधीच विसरू नका

दाढ्या जळतील 
जळू द्या
मंडप पडतील 
पडू द्या
शिव्या मिळतील 
मिळू द्या
सृजनत्वाला विटाळशी
पण म्हणवून घेऊ नका

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...