गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

म्हसूबाबाच गाणं १







म्हसूबाबाजींचे घर
असे उंच ओट्यावर
त्याला हवेच्याच भिंती
वर आकाश छप्पर

लाल शेंदरी पोशाख
मस्त बसतो ऐटीत
भय जनाच्या मनात
राज्य करतो झोकात

त्याला ठेवियले कुणी
खोट्या आशेने मांडून
किती दिलेत भयाने
नजराणेही आणून

कुणा मागत तो नाही
कुणा देत किंवा काही
घडो घटना काहिही
श्रेय त्यालाच ते जाई

मना मनामध्ये आहे
म्हसू बाबाचा दरारा
अर्धा गाव अवसेला  
करी तयाला मुजरा

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१३

माझ्या मना






या जगावर रुसलेल्या
आणि स्वत:वर चिडलेल्या
माझ्या मना
या जडशील वैफल्यातून
आणि अस्वस्थ कबरीतून
आशेच एक छोटस
रानफुल होवून वर ये
कुणी जल न सिंचता
कुणी लक्ष न देता
स्वत:च्या ताकदीने
बेदरकार हिंमतीने
स्वत:त भरून उरणारे
मीपण घेवून वर ये
पत्थराला  चिरत
मातीतून उसळत
हरित अंकुराने
लसलसत्या नव्हाळीने
रसरसत्या जीवनाचे
सार घेवून वर ये
चैतन्यान फुलून ये
बेफान उधाणून ये
आवेगाने उसळून ये
जीवनाचा प्रसाद वाहू दे
तुझ्या अणुरेणुतून
आणि पसरू दे
गंधलहरीतून   
सारे विश्व त्यानं
जावू दे भरून

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

प्रीतीचा स्वीकार



प्रीतीचा स्वीकार
असतो संपूर्ण
इतर सारे
जाते हरवून

प्रीत स्वीकारते
हासत काटे
नच केवळ
फुले मागते

गुण दोष
दु:ख हर्ष
वेगळे नसती
प्रीतीत स्पर्श

प्रीत असते
एकतानता
दोन देह
एक आत्मा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...