शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

। मी ।



। मी ।


मी कोण आहे ?
या आदिम प्रश्नांची
कधीतरी उमटणारी
ठसठस
सहज विसरून जाते
जगण्याच्या धावपळीत
अहंच्या सजावटीत
सुख उपभोगाच्या तंद्रीत

जोवर समोर येत नाही
अस्तित्वाला नष्ट करणारे
देहाला मिटवणारे
मृत्यूचे दर्शन

मी जर मरणारच नसतो
तर काहीच प्रश्न नव्हता
मी कसा झालो
हे विचारण्याचा

ही संपून जाण्याची भीती
नसल्याची चिंता
कमवलेले हरवण्याची काळजी
कणाकणात रुतलेली आसक्ती
जी भाग पाडते
कळत न कळत
तोच प्रश्न विचारण्याला
मी कोण आहे
अन् हे सारे का आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...