शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

वाट स्व.सौ सुनिता रा.गायकवाड वहिनीला समर्पित)

वाट .( स्व.सौ सुनिता रा.गायकवाड वहिनीला समर्पित)
*************

अशी वाट अर्ध्यावरती सोडून कोणी जाते का ?
असा रंगला डाव भला मोडून कोणी उठते का ?

आता आताच चंद्र हा माथ्यावरती आला होता !
आता आताच रातराणीचा गंध धुंद भरला होता !

तुला मला कळल्याविना अंधार हा दाटला का ?
गुंफलेला हात हातीचा नकळत असा सुटला का ?

रोजचाच तो निरोप अन् रोजचेच ते भेटणे होते !
रोजचाच तो निरोप मग अंतिम असा ठरला का ?

ज्याचा जयकार केला तो देवही धावला न का ?
मोडून पडले घरटे तया झेलता आले नसते का ?

खूप अजून चालायचे किती काय निभावायचे !
तुझ्याविना पण कळेना माझे मज सावरेल का ?

आता तुझे चित्र समोर अन् अपार या आठवणी !
उडणे न होत नभी तरीही पंंख हे जळतात का  ?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दारी

दारी
***

सदा तुझे येणे व्हावे माझ्या दारी सजलेले 
तुझे स्मित राहो सदा चौकटीत रेखलेले ॥

तोरणात ओघळून सौख्य हिंदोळत जावे 
रांगोळीत रेखाटले मांगल्यही तूच व्हावे ॥

तूच दारी उजळले दीप ते प्रदीप्त व्हावे 
अन तुला पाहताना गाली आसु ओघळावे ॥

तुझ्याविन जगण्याला आण काय मागू आता 
मागितल्यावाचून हे सौख्य आले माझ्या हाता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

निःशब्द गाणे

.निशब्द गाणे
*********
पाण्याचे गाणे 
सागरी भरते 
वाऱ्याचे तराणे
नभी हरवते ॥१ ॥

तसे तुझे माझे 
नसलेले नाते 
उच्चारा वाचूनी 
मजला कळते ॥२ ॥

नाव गावाविण 
रुजते वाढते 
दिक्काली असून 
शून्य म्हणावते ॥३ ॥

म्हणता म्हणता 
धणी न भरते 
विस्तारत जाते 
रूप तुझे घेते ॥४ ॥

कुणा न दिसते 
कुणा न कळते 
माझ्या जगण्याची 
सावली होते ॥५ ॥

सावली हक्काची 
कधी का असते 
नशीबे पांथस्था 
पुण्याने मिळते ॥ ६

विक्रांत छायेत 
सुखे पहुडला
तुझिया मिठीत 
जगण्या भेटला ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

केन्द्रबिंदू

केंद्रबिंदू
*******
माझ्या जीवनाचा दत्त केंद्रबिंदू 
बंधा विना बंधू
अनुरागी ॥१
विस्तारतो व्यास जगता जगता 
फिरता फिरता 
संसारात ॥२
कुणा वाटे गेलो भूली हरवलो 
परी बांधलेलो
तया हाती ॥३
जोवर तो तिथे तोवर मी इथे 
नाही या परते 
सत्य काही ॥४
काय ती बिशाद बिंदू सुटण्याची 
अहो अस्तित्वाची 
खूण तीच ॥५
ऋणभार त्याचा सदा खांद्यावरी 
धन भारावरी
लीन झाला ॥६
विक्रांत दत्ताचा असे आकर्षला 
गुण कर्ममेळा 
भोवताली ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

रंग

रंग
****
काही रंग पौर्णिमेचे काही रंग पंचमीचे 
काही रंग वेडे खुळे तुझ्या माझ्या सोबतीचे ॥१

त्या रंगांना पाहती डोळे उल्हासे स्तब्ध होऊन
या रंगांना पाहती डोळे अंतरी डोळे मिटून॥२

अस्तित्वाचे फुल होते कणकण उमलून
कळल्यावाचून जाते निस्पंदात हरपून॥३

देहाची या वेणू होते श्वास तुझा पांघरून
जीव रंगतो निःशब्दी मी तू पण हरवून॥४
 
ओलांडून भक्ती प्रीती भान उरे एकत्वाचे 
द्वैत राहे तरी काही अव्दैताच्या पटलांचे ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

अस्तित्व


अस्तित्व
********
तू मेघ आषाढाचा माझ्या जीवनात 
बरसला असा जन्म सुखावत ॥

तू डोह यमुनेचा माझिया डोळ्यात 
हरवून तृषा मी झालो पूर्ण तृप्त ॥

तू चंद्र पुनवेचा माझिया मनात 
स्मरून तुला मी नाहतो अमृतात ॥

तू गंध बकुळीचा माझिया श्वासात 
मी धुंद सदैव तुझ्या अंगणात ॥

तू स्पर्श पालवीचा मृदुल काळजात 
मी थांबून क्षणात ठेवी हृदयात ॥

तू अस्तित्व हे माझे घेतले पदरात 
उरलो न मी आता व्यर्थ या जगात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

राधातत्व


राधातत्व
*******
राधा न कळते केल्याविना प्रीती
राधे विन भक्ती 
फोल सारी ॥१
फोल सारे जन्म कृष्ण राया विन 
जन्माला येऊन 
वाया जाणे ॥२
वाया जाते धन यश कीर्ती मान 
काळात वाहून
क्षणात रे ॥३
क्षणोक्षणी प्रीत कर साऱ्यावर 
जीव जीवावर 
ओवाळ रे ॥४
ओवाळून अहं प्रेमात टाकता 
ठसेल हे चित्ता 
राधा तत्व ॥५
राधेची करुणा भक्ती ये जीवना 
मग भेटे कान्हा 
वृंदावनी ॥६
विक्रांत मागतो राधा राणी सदा 
ठेवी मज पदा 
तुझ्या माय ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...