रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

ॐ कार तू

  ॐ कार तू
********

निराकारी उमटला संपूर्ण स्वयंभू आकार तू         
मिती आली जन्माला विश्वसंकल्प साकार तू

महास्फोटा आधीची अनाकलनीय उर्जा तू 
नेणिवेचा अथांग सागर जाणीवेचा गर्भ तू 

ज्ञानाची सीमा पुसली चक्रावणारा अनंत तू  
विज्ञानाची घुसळण इवली सर्वदा अस्पर्श तू 

थकली बुद्धी ठकला विचार अगणित अपार तू 
माझ्या मनी सजविलेला ज्ञानेशाचा ॐ कार तू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

सुख

ऋतुराज 
****
सुखाचा धबाबा होतसे वर्षाव 
आनंदाचा गाव
भेटी आला, ॥१
इवल्या क्षणाचे झाले महायुग
आटुनिया जग
मनी गेले ॥२
कशाला बोलणे शब्द आता उगे
स्वरूपात जागे
तुझे पण ॥३
अवघे कोंदाटे तुझेेेच असणे 
माझे हे पाहणे
मंत्रमुग्ध ॥४
फिरे मोरपीस तनमनावर
जागेपणावर
स्वप्न भास ॥५
विक्रांत धुमारे आनंद फांदीला
आला रे भेटीला
ऋतुराज ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

वरदान


वरदान
******
तू उधळलीस 
सुमने काही
माझ्यासाठी 
माझी नसूनही 

त्या गंधाने 
त्या रंगाने 
झालो बेभान 
मृगासमान 

नाभीमधला 
दडला प्राण 
श्वासात भरून
आलो उधळून 

माझे मजला
कळल्या वाचून
जणू की होवून
आनंद रान 

आता  रंग ते
आणिक गंध 
झाले आहेत 
प्राण तरंग

तुझे हात अन
दैवी वरदान 
करती शिंपण
स्पर्शामधून

अनुभूतीच्या 
आकाशातून
साक्ष देतात
साथी होवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आरती


आरती
******
खणाणती टाळ सुर ठरलेले 
शब्द रुळलेले ओठी जरी ॥१

परि भाव नवे मनी क्षणोक्षणी 
चाले ओवाळणी आरतीची ॥२

तीच ती प्रार्थना सुखाची याचना 
मागताना मना लाज नाही ॥३

हे तो असे एक आनंदाचे गाणे 
जीवना भेटणे जीवनाने ॥४

देव भक्ता पडे देहाविन मिठी 
रेशमाच्या गाठी अंतरात ॥५

विक्रांत पेटली ज्योत अंतरात 
रोम रोमी दाट तेज फाके ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

गणेश रूप

 रूप
****
पाहता सुंदर रूप मनोहर
हर्ष अनिवार मनी दाटे ॥
लोभस साजरी मूर्ती गणेशाची 
बटू बालकाची कांतीमान ॥
शुभ्र मोत्यासम असे एकदंत 
कृपा वक्रतुंड मुखावरी ॥
निळसर शेला पीत पितांबर 
लेणी देहावर सुवर्णाची ॥
कटीसी मेखला हातात कंकण 
पायात पैंजण रुणझुण ॥
योगिया दुर्लभ भक्तासी सुलभ 
प्रेमाचे वालभ मुर्त असे ॥
रूप पाहूनिया हरपले भान 
मन झाले लीन पायी तया ॥
विक्रांत हृदयी नित्य विनायक 
पाहतो कौतुक भक्तीचे हे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

प्रतिमा

प्रतिमा
******
पुन्हा पुन्हा माझ्या मनात 
तुझ्या प्रतिमा उमलती 
सारेच दिवस पुनवेचे 
होत सागरा येते भरती ॥

पुन्हा एकदा जीवनाला 
जगण्याची येते उर्मी 
होता वर्षा स्पर्श जैसा 
सुखावते पुन्हा भूमी ॥

जाणतो मी दूरवर तू 
लागणार नाहीच हाती 
नील नभापलीकडे त्या 
तुझी दुनिया प्रिय वस्ती ॥

गीत तुझे ओठात माझ्या 
सुर जेव्हा होऊन येतात 
त्या सुखाच्या वादळात 
हरवतो मी तुझ्या रूपात ॥

तुझेपणाचे अथांग वेड हे
घेवूनी मी असा माझ्यात 
साद घालतो भान हरवून 
ये रे ये तू माझ्या हृदयात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .



मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

आला गणपती


आला गणपती
************
आला गणपती आला गुणपती 
आला महामती विद्येचा तो ॥१
आला मिरवत वाद्य गजरात 
बसे मखरात सजलेल्या ॥२
झाली रोषणाई चढली झिलई 
अवघीच घाई घरी दारी ॥३
भरले बाजार पेढे फळे हार 
चालला व्यापार धामधुम ॥४
जमा झाले गावी अवघे ते भाई
भेटीगाठी जीवी जिवापाड ॥५
सज्ज सुगरणी सज्ज सुहासिनी 
पहा कौतुकानी रूप ल्याले ॥६
होतेसे गजर टाळांचा अपार 
गुलाल भुवर विखुरला ॥७
रांगोळ्याची नक्षी मिरवती दारे 
फटाके भूर्नळे हर्ष फुटे ॥ ८
गल्ली  बोळामध्ये मांडले मांडव
विराजित देव थोर तिथे ॥९
अन तयाचा तो वेगळाच थाट 
आरास अफाट मांडलेली ॥१०
 अनंत मूर्तीत एकच तो देव 
डोळीयात भाव प्रेममय ॥११
आता दहा दिस चालू दे दंगल
 नभात मंगल तेज कोंडो ॥१२
विक्रांत आनंद मनात दाटला 
विश्वात भरला ओसंडून ॥१३

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...