मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

दत्त तत्व





 
दत्त तत्व
*****
माझे नाहीपण
तुझिया वाटेला
म्हणून जगाला
कळेचिना ॥

आयुष्य म्हणजे
अभ्राचा आकार
जल रेखावर
जन्म चाले ॥

हरवले भान
देह आणि मन
तरीही स्फुरण
दत्त असे ॥

आघात वाचून
कुठले स्पंदन
परि कणकण
गुण ग़ुणे ॥

नसल्या वाटेचे
जरी वाटसरू 
चाले येरझारू
खुणावर॥

नसे सुरुवात
मग कैसा अंत 
बुडला प्रेमात
शब्द माझा ॥ 

विक्रांत अस्तित्व
दत्ताचे कवित्व
धूम्र वलयात
गंध होय ॥

निर्गुण निजले
त्रिगुण सरले
दत्त आकळले
तत्व आत ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


सोमवार, २७ जानेवारी, २०२०

कुठे शोधू दत्ता




कुठे शोधू दत्ता
*********
कुठे कुठे शोधू दत्ता
माझा हरवला रस्ता ॥

जग रान भेरी झाले
माझे काळीज जळाले ॥

पेटे डोळ्यात तहान
जन्म वैशाखाचे ऊन ॥

नाही सावली आधार
दत्ता जीवाला सावर ॥

आता विझू आले प्राण
येई येई गा धावून ॥

मायबाप अवधूता
देई दर्शन विक्रांता॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


चाक जीवनाचे



चाक जीवनाचे
*******  

आताच टपऱ्या होत्या त्या इथे
लगेचच सांगा गेल्या तरी कुठे

काय गाडी आली बागुलबुवाची
दवंडी पिटली कुण्या वा बळीची

नका घाबरू खेळ हा घडणारा 
दर तीन चार मासी  दिसणारा

आम्हाला सवय पथी चालण्याची
चुकवत गाड्या घराला जाण्याची

असतात म्हणती इथे फूटपाथ
दावतात असे उगा स्वप्नच खोट

जगू देत त्यांनाही जगतोय आम्ही
कशाला धावता वाया असे तुम्ही

जाळून पेट्रोल वाया टेक्स जातो
भिऊन माणूस का जागा सोडतो

नका हो असे उगा नाटक करावे
आहेत तसे पुढती हे जगत राहावे

असो गल्लोगल्ली टपरी मांडलेली
राहो वडे भजी पान जना आवडली

सुखे ते विकती मजेत आम्ही खातो 
होतो त्रास काही असू दे म्हणतो

कुणाला कधी ते जमणार नाही
गाडी खालची ती हलणार नाही 

चालला कशाला मग हा तमाशा 
जर उठणार ना कुणाचाच गाशा

मिळाला का वाटा भेटला का दादा ?
थोडासा फुगीर झाला ना हो वादा ?

चालू द्या चालले आम्ही न पाहिले
चाक जीवनाचे हे सदा रुतलेले

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

स्वामी कृपा






स्वामी कृपा

*********



स्वामींच्या कृपेने

जाहलो स्वामींचा 

घेतला प्रेमाचा

नुभव II

धावला संकटी

इवल्या सेवेनी

जाहलो मी ऋणी

जन्माचाच II

मणाचे ते ओझे

मिटले क्षणात

सुख आयुष्यात

ओघळ्ले II

आता विनवणी

तया योगीराया  

सेवेसही काया

वाहू दे रे II

घेतलेस पदी

राहू दे असाच

निशंक मनास

करूनिया II

विक्रांत स्वामीचा

होय नामधारी

दत्त वारकरी

आयुष्याचा II

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...