शनिवार, २२ जून, २०१९

सुखावलो दत्ता





सुखावलो दत्ता
************

सुखावलो दत्ता
तुजला पाहता
जाहलो वाहता
कोंडलेला

मोहाचा पिंपळ
धुनीत जळला
जन्माचा सरला
एक गुंता

आता विभूतीचे
कौतुक मनाला
लाविले भाळाला
विनोदाने

गाता दत्त दत्त
सरले ते भय
सुखाचे उपाय
ळू आले

नेई मज बापा
हव्या तैश्या वाटा
दत्ता अवधूता
झालो तुझा 

विक्रांत भाग्याचा
चाकर दत्ताचा
चुकार सेवेचा
प्रिय झाला

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००


शुक्रवार, २१ जून, २०१९

भाषेसी खेळू नका



भाषेशी खेळू नका
************

भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी

कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी 
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी

भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे 
तिला लोळवू नका कुणी

एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी

आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही

फिरलेल्या डोक्यांचे त्या
ऐकू नका मुळी कुणी
रे ठेचून काढा तयांना
एक्कावन्न नव्व्यांनो म्हणूनी

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

धुक्यातील गिरणार




जीवा घालणारी साद
दाट धुक्यातील वाट
दीप दूरवर मंद
याद साठलेली आत 

पान पान ओेले चिंब
चिंब भिजलेले मन
चहू बाजूने गगन
दत्त विराट होऊन 

पाय अनवाणी वेडे
होते अधीर धावत
खडे टोचणारे काही
नाव ओठात णत

झालो पवित्र पावन
तूच श्वासात देहात
शिर भिजलेले ओले
तुझा डोईवर हात 

कण कण  सुखावला
दत्त चैतन्यी सजला
आलो कुठून कुठला
सारा विसर पडला

दत्त गिरणारी बाप
ऐसा कृपावंत झाला
तनामनाची गाठोडे
वर उचलता झाला  

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १९ जून, २०१९

देई रे कोपरा



देई रे कोपरा
**********
प्रत्येक पायरी 
असे प्रभू दत्त 
शिखर न अंत 
चालण्याचा ॥
प्रत्येक श्वासात 
कृपेचा प्रपात 
तुझिया ऋणात 
जगतो मी ॥
असा घडो यज्ञ 
प्रभू जगण्याचा 
घडो सर्वस्वाचा 
स्वाहाकार ॥
सरू दे संकट 
सरत्या क्षणांचे 
रित्या या काळाचे 
तेच पुन्हा ॥
देई रे कोपरा 
तुझ्या कपाटात 
मज स्वरूपात
ठेवी दत्ता ॥
शोधतो विक्रांत 
कडी कपारीत 
यावे अवचित 
दिगंबरा ॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

शनिवार, १५ जून, २०१९

रहा सदा साथ





रहा सदा साथ
**********


बहुत जन्मात
तुझी आठवण
करूनिया मन
तुझे झाले 

पेटलेला दीप
असे अंतरात
देऊनिया हात
सांभाळी रे 

पुन्हा ठेव पदी
दे हरवून
जन्म मरणातून
सोडव रे 

मागण्यास आता
आन काही नाही
जीवनाची वही
भरलेली ॥

भेटलास बापा
रहा सदा साथ
मागतो विक्रांत .
तुज आता 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




शुक्रवार, १४ जून, २०१९

रेवा माय




रेवा माय
***


जगतोय दूर 
किनारा सोडून 
माय दूरावून
तुझिया पासून 

तुझिया स्मृतीचे
इवलेसे क्षण  
वेचतो त्यातून 
आनंदाचे कण

ये कधी तरी  
जा गे घेऊन
तुझ्या कुशीत मी
मजला सांडीन

होईल काश
भरून चांदणे 
हरित पर्णाची
लेईन वसणे 

जल लहरींचे
चंचल नर्तन 
अथांग डोह वा 
जाईन होवून

कुठल्या दारचा
होईल वा ओटा
गूढ रानातील
अनवट वाटा

पुन्हा एकदा हे
अवघे सोडून
वाटे फक्त तुझा  
जावे मी होवून 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

००००००


गुरुवार, १३ जून, २०१९

भरदुपारी




भरदुपारी
*************


भरदुपारी त्या उन्हात
आलीस तू सावली होत
सुखावले तनमन माझे 
झाली सुमनांची बरसात 

तापलेल्या तव गालावर
होते कमलदळांचे सरोवर 
घनगर्द कुटिल आभाळ
उतरलेले अन भालावर 

शब्द आले तव वाऱ्यावर 
होत एक शीतल लहर 
वीज नजरेतील तुझ्या
गेली माझ्या आरपार

अशी येत जा तू कधी 
सखी होत माझी दुपार 
वाळवंटी माणसांच्या या 
देत मजला हिरवा आधार 


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...