सोमवार, ८ जानेवारी, २०१८

प्रतिमा तुटली




काच फुटली
प्रतिमा तुटली
सहज जाहली
अस्तंगत ||

होतो एक मी
अनंत झालो
विखरून गेलो
कणोकणी ||

दिसल्या वाचून
नसणे लेऊनी
स्पंदन होऊनी
कालातीत ||

प्रश्ना सोबत  
उत्तर गिळले
तरीही उरले
होते काही ||

त्या असल्याचे
शब्द हे झाले
अन् प्रसवले
शून्यातून ||

हर हर शंकर
दत्त दिगंबर
जय ज्ञानेश्वर
नामरूपी    ||

त्या शब्दांचा
हा देह जाहला
वस्त्रही ल्याला
निशब्दाचा ||

सरली अवघी
आता फडफड
आणि धडपड
देह रुपी ||

या  विक्रांतची
मूस बदलली
मूर्तीही जाहली
आरपार  ||

आघाता विना
होते डिम डीम
सोहम सोहम
सर्व काळी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


रविवार, ७ जानेवारी, २०१८

तू गेलास (यशोधरा)





तू गेलास सांगता
बोलता अचानक
नाव गाव सारे टाकून
अज्ञात अशा
भविष्याची चादर ओढून
तसे तर तुलाही माहित होते
मलाही जाणवत होते
विझणाऱ्या दिवसांचे ते
क्षितीज झाकोळणे होते
दिवस काही महिन्यांचे
फक्त सोबत राहणे होते

पण तू गेलास अन्
माझे जगणे म्हणजे
एक प्रदीर्घ प्रतीक्षा झाली आहे
तुझा येण्याची
कदाचित जन्मभराची

माझ्या सरलेल्या वर्षांचे
दुःख मला नाही
माझ्या हरवल्या सौख्याचे
दुःख मला नाही
माझ्या या वाट पाहण्याचेही
दुःख मला नाही
दुःख आहे फक्त
तुझे सांगता जाण्याचे

जर तू म्हटला असतास
तर मी आले असते तुझ्यासोबत
या जगाच्या टोकापर्यंत
तुझे दुःख वाटून घेत
तुला साथ देत
तुझ्या वेदनांची सावली होत .

आणि कदाचित
तुला निरोपही दिला असता
अखेरचा ...
डोळ्यात पाणीही आणता.
तुझा हात हातात घेत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


दुही




दुही

विष बीज ते दुहीचे     
खोल मनात रुजले
ओल्या भूमीत नवीन
बळ घेवून उठले  

हाती दगड पेलले   
रान डोळ्यात पेटले
मित्र मनातील सारे
शत्रू क्षणातच झाले  

मत पेटीच्या पिकाचे  
राजे गालात हसले
पडू आलेल्या खुर्चीस
टेकू चार ते लागले

प्रेम हवे जगण्याला
द्वेष हवा असे का रे  ?
भीतीमध्ये गाडलेल्या
भूता मृत्यू नसे का रे  ?

जात धर्म पंथ मग  
वर्ण भाषा वंश आदी
रावणाची मुंडकी ही
नच संपणार कधी !

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

प्रिय सखी



कधी जीवनात
अगदी अकस्मात
मागता हातात
येते भाग्य

तसे तुझे येणे
सभोवती असणे
हसणे बोलणे
असते काही

हसते जीवन
तुझ्या ओठातून
जीवा निववून
जातेस तू

तू सुखाची
झुळूक क्षणाची
होते हृदयाची
ठेव माझ्या

हातात घेऊन
मी ते क्षण कण
ठेवतो जपून
प्रिय सखी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





सोमवार, १ जानेवारी, २०१८

मोकळे केस तू


मोकळे केस तू !


रुपेरी कांतीचे 
लेवून चांदणे
मोकळे केस तू
मिरवित येते 

काजळ कोरले 
दिठीत सजले
गाली ओघळून  
तीट लावते

चालणे तुझे ते
इथले नसते  
गमे स्वर्गातून   
कुणी उतरते 

ओठात लालस
गुलाब सजले
पाहून मनात
गाणे उधळते

पाहणे तुजला 
काचते क्षणांचे 
पण जगण्याचे
भान हरवते 

वळवून मान
झटकून जाते
मनी खोल अन 
गाठ ती बसते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in



रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

सरली जैसी वर्ष हजार





सरली जैसी वर्ष हजार
सरतील रे आणि हजार

विना थांबता काळ धावतो
खुणा काही न मागे ठेवतो

कशास आला कुठे चालला
या मातीचा हा असा पुतळा

पाया खाली या अनंत वस्ती
होतील आणि या ही वरती

जग क्षणाचे खेळ खुळ्याचे
हवे कळाया काय कुणाचे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...