रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

आदेश

आदेश
******
नाथ महाराज 
करा माझे काज 
सवे दत्तराज 
रूप दावा ॥१ .

विरक्तीचा अंश 
हृदयी  भरूनी
घ्या मज ओढूनी
पदावरी ॥२

अलख ओठात 
निरंजन मनी 
घाली मुद्रा कानी
पंथराज ॥३

आदेश कानात 
द्या हो माझे नाथ
विक्रांत मनात 
तळमळी ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

व्रणांच्या लक्तरी

व्रणांच्या लक्तरी
************
जन्माच्या या गाठी टोचती सलती 
कळल्या वाचून जखमा वाहती ॥

कुणाला सांगावे अंतर कोंडले 
सारेच धुरांडे काजळी माखले ॥

काय हवे तुज आणिक कशाला 
अर्था वाचून रे अंधार कोंडला ॥

मरून जावे का जगावे मरणे 
अस्तित्व भंगले व्हावे वा शोधणे ॥

कधी तरी कुठे प्रकाश किरणे 
येईल मिठीत आपुले असणे ॥

धूसर तरीही अमर आशा ही 
निजते दिवस वाया जाऊनही ॥

विक्रांत काहीली अंतरी ठेविली 
व्रणांच्या लक्तरी जिंदगी बांधली ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

दत्त आकाश

दत्त आकाश
**********
पंख लेऊनी वादळी 
असा उधाणत गेलो 
जन्मोजन्मीचे किटाळ 
क्षणी झटकून आलो ॥१
नाही भय शंका काही 
दत्ता शरण मी गेलो 
जीणे आभास काळाचा 
सुख दुःखात हसलो ॥२
भोग उरला सुरला 
नात्यागोत्याचा व्यापार 
तोही सुटेल क्षणात 
पाने उलटून चार ॥३
मज अलिंगतो दत्त 
मज उधळतो दत्त 
बळ देऊन पंखात 
नेई उंच आकाशात ॥४
दत्त कृपेचा प्रकाश 
लक्ष तरंग नभात 
कण इवला विक्रांत 
गेला विरून तयात ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

अनुवाद


हे प्रभू दत्तात्रेया
या माझ्या विनम्र प्रार्थनेने
माझे हृदय होते पुलकीत
माझा जीव थबकतो थरारतो 
प्रत्येक हृदय कंपनात
माझा आत्मा आसावतो व्याकुळ होतो
तो तुझा दैवी प्रकाश 
जावा उतरत माझ्यात म्हणून

ते तुझे अस्तित्व देते मला 
निरव उदात्त शांती 
त्या तुझ्या मिठीत हरवतात माझ्या चिंता 
तुझी प्रगाढ चैतन्यमय सर्व व्यापकता
होते माझ्यासाठी दिशादर्शक तारा 
त्या माझ्या अफाट अनंत प्रवासात 
तो कधी असतो जवळ हृदयात
तर कधी अति दूर अंतराळात
वेदनांच्या या दुःखद प्रवासात 
स्वप्नांच्या रंगीत आकाशात 
तो असतो माझा 
परम शांती प्रदायक पथदर्शक प्रकाश

माझ्या प्रत्येक श्वासात अन 
ओठावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रार्थनेत 
मला मिळते शक्ती सामर्थ्य 
जे येत असते तुझ्या अर्चनेने

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

शंकर महाराज

शंकर महाराज
************
अष्टावक्र अवलिया 
बालोंन्मत अवधूता 
अप्राप्य साऱ्या जगता 
परि प्रेमे भेटे भक्तां ॥१
उग्र मुद्रा तीक्ष्ण डोळे 
नजरेत वीज खेळे 
देही असून विदेही 
अष्टसिद्धी पायी डोळे ॥२
बोलावून पायी देवा 
दिले मज गूढ सुख 
परी वाढली रे भुक 
प्रीती दुणावे अधिक ॥३
ज्ञान देई भक्ती देई  
भाळी लावी रे विभूती 
कली मळ सरो सारा 
धडाडून दे विरक्ती ॥४
लोभ सरो मोह सरो 
हृदयात प्रेम झरो
होत कलंदर तुझा 
अलक्षात चित्त हरो ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
/kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

दत्त गाणी


दत्त गाणी
********
तुझ्यावरी लिहलेली 
दत्तात्रेया तुझी गाणी 
सांभाळली हरवली 
कुठे कधी नेली कुणी  ॥१
तुझ्यासाठी तुझी गाणी 
उमटली माझ्या मनी 
मोठेपणा काय त्यात 
जन गेले विसरूनी ॥२
भक्ती माझी वाढली का
जरी मज ठाव नाही 
कवितेत मिरविले 
तेही माझे नाव नाही ॥३
जयासाठी शब्द होते 
तया हृदयात गेले 
हेलकरी रिक्त हस्त 
चाकरीचे काम झाले ॥४
शिजेल मी वाहीलेले 
येईल प्रसाद हाती 
तोवरी रे माथ्यावरी 
वाहीन रे मी ही पाटी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

दुर्गा काली तारा हो !

तू दुर्गा काली तारा हो !
***************
तू कर सेवा, रात्रं दिन जागून
तू वाचव जीव, रक्ताचे पाणी करून 
त्यांना फरक नाही पडणार
ते पशु नाही सुधारणार
त्यांच्यासाठी तू नाहीस डॉक्टर
नाहीस मानवतेचे मंदिर
त्यांच्यासाठी तू फक्त आहेस
एक स्त्री शरीर

खरतर तू कुणीही अस 
पोलीस वकील कलाकार 
कलेक्टर मालक मॅनेजर 
त्यांना खरच फरक नाही पडणार
मिळताच ती दुष्ट संधी 
ते तुला ओरबाडून खाणार 

कुठलाही क्षण बेसावध तुला
नाही राहून चालणार 
तेज तर्रार कृपाण तुला 
सदैव बाळगावी लागणार
कारण ते कधी कुठल्या रूपात येणार 
तुला कधीच नाही कळणार 
कधी मित्र कधी आप्त कधी मदतगार
कधी संरक्षक कधी राखणदार
तर कधी मृग सोन्याचे होणार

म्हणून तू रहा संघटित 
सखी मैत्रीणींच्या सोबतीत 
पण होऊ नकोस बंदिस्त 
पुन्हा त्याच चौकटीत
कारण तिथेही त्यांचे हात
अगदी सहज पोहोचतात 
भिंती आड अंधारात 
अधिक पशू राहतात

बाकी कायदे शासन प्रशासन 
सारेच व्यर्थ आहेत 
हजारो वर्षापासून 
तू बळी पडत आहेस 

अनअत्याचार हे नेहमीच 
दुर्बळावर होत असतात 
सबळांच्या वाटेस कधी
कोणी जात नसतात 

म्हणून तू सबळ हो सशक्त हो 
रंभा मेनका उर्वशी नको
दुर्गा काली तारा हो !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...