सोमवार, २२ जुलै, २०२४

आत्मभान


आत्मभान

********

आत्मभान यावे ।हृदयी ठरावे 

चित्तात वसावे ।अनुभवे।।

हीच तळमळ ।लागली जीवाला 

म्हणुनी धावला ।जीवराव।।

परी ठायी ठायी।लागली वळणे

सुखाचे छळणे।लाघवी ते।।

जीवन हा योग।कळल्यावाचूनी।

गुह्य उघडुनी।कोण दावी।।

*****

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २१ जुलै, २०२४

म्हातारपण


म्हातारपण
********
स्वीकारून आपले म्हातारपण 
उतरावी आपण आपली उतरण .
आधी चढ मग उतार
हा जगताचा आहे नियम 
सूर्य सुद्धा त्याला अपवाद नाही
सांज होतात बुडून जाई

पाय थकलेले असतात 
सांधे गंजलेले असतात 
त्रास तर होणारच .
तोही सोसायचा असतो .
उरलेला मार्ग पार करायचा असतो
रस्ता तर रडत कुरकुरत ही 
पार करता येतो 
हसत खेळत गप्पा मारत ही
पार करता येतो .

कधी  कुठला मुक्काम शेवटचा
कुणालाही माहित नसतो
किती उरलेत श्वास कुणाचे 
कुणीही जाणत नसतो
पण त्याची पर्वा का करावी
दौलत या क्षणाची का न लुटावी

गाथा गीता ज्ञानेश्वरी भागवत 
नाही तुम्हाला आवडत 
तरी नाही हरकत 
मित्र-मैत्रिणी निसर्ग पुस्तक 
यात राहावेसे वाटते रंगत 
अहो अध्यात्मही काही  
वेगळे नाही सांगत

ज्यात निर्भळ आनंद वाटतो 
ज्यात निर्मळ आनंद जन्मतो 
तेच फक्त करा
कारण आनंद हीच जीवनाची 
खरीखुरी अभिव्यक्ती असते
चढणे उतरणे संपणे ही तर 
कालचक्राची अपरिहार्यता असते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 




शनिवार, २० जुलै, २०२४

गुरुमाय

गुरुमाय
******
श्रीगुरु माऊली काय मागु तुला 
नुरे मागायला काही इथे ॥१
इतुके भातुके दिले खावयाला .
जीव हा भरला आता इथे ॥२
सरले खेळणे हसणे रडणे 
जगी हरवणे पुरे झाले ॥३
रंगुनी खेळात पथ विसरलो 
घर हरवलो कुठे जावे ॥४
तुझिया मिठीची आता ये आठव 
जीव घेई धाव तुझ्याकडे ॥५
येऊनिया माय घेई कडेवरी 
नेई मज घरी आपुलिया ॥६
तुझिया प्रेमाचा भरव गे घास 
सोहम सुग्रास मज लागी ॥७
मज लागो निज तुझ्या मांडीवरी 
दुनिया ही सारी होत शून्य ॥८
 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

कृपा

कृपा
****
तुझिया कृपेने तुझ्या दारी आलो 
दास मी जाहलो देवराया ॥१

कृपेच्या संकटे झाली तळमळ 
कळू आले बळ माझे मला ॥२

हरवला गर्व सरे अहंभाव 
तुजविण ठाव अन्य नाही ॥३

दिसे चालता मी तूच चालविता 
रक्षिता पोशिता सर्वकाळ ॥४

आता दत्तात्रेया आळी पुरवावी 
नयना घडावी भेट तुझी ॥५

तुझिया मायेचा घडूनिया अंत 
रहावा विक्रांत स्वरूपात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १८ जुलै, २०२४

वेडापीर

वेडापीर .
******

तो अंधार घेऊनी गाठी 
वाहतो दुस्वास पाठी ॥
चुकतो प्रत्येक आचार 
तुटतो प्रत्येक विचार ॥

कळण्याची गती नाही 
सारासार मती नाही ॥
गुण खोटे दोन चार 
अवगुण अपरंपार ॥

काय बोले तमा नाही
मनी थोडी क्षमा नाही ॥
वेडेपणा कणोकणी   
धूर्तपणा पांघरूनी ॥

देवा ऐसे वेडे पीर
देसी एक एकावर ॥
किती तया सांभाळावे
दूर किती नि ठेवावे ॥

दे तया शहाणपण 
शांत सहज जीवन ॥
गांजलेले बाकी जण 
घेऊ दे श्वास सुखानं ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

स्वप्न


स्वप्न
*****
तुझी भरजरी स्वप्न
सोन कोवळ्या उन्हात
धागा एक एक सूक्ष्म
असे आकाश मागत

इथे काट्याचे कुंपण
उभे लावुनिया घात
स्पर्श एक एक तीक्ष्ण
सुख जातात फाटत

मन सांभाळ गडणी
दार खिडक्या लावून
काय भरवसा इथे 
वारा नेईन ओढून

इथे हवाच असतो 
स्पर्श मृदू ज्याला त्याला  
असो नसो वा लायकी
रंग रूप दिखाव्याला

कधीतरी ग येईन
दर्दी कुणी मेहमान
स्वप्न डोळ्यात भरून
तुज घेवून जाईन 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, १६ जुलै, २०२४

तरीही

तरीही
*****

हरणे नाही जिंकणे, धरणे नाही सोडणे
इथे केवळ असते आले जीवन जगणे 

लाटा येतात धावत रेषा जातात बुजत
किल्ले वाळूचे पाण्यात अन् जातात वाहत

कोण इथे कोणासाठी आहे बरे थांबलेले ?
धन शंख शिंपल्याचे कुणी आहे सांभाळले ?

मित्र जाती मैत्र जाते प्रिया जाते प्रेम जाते 
विस्मृतीच्या अंधारात जीणे सुखात निजते

लाटा गर्जत असती शंख तुटत असती
सागराच्या वाऱ्यावर स्मृतीही वाहून जाती

ही कथा युगायुगाची सागरा ठाव असते 
खोलवर बुडलेली बोटही जाणत असते

ती तटस्थ प्रसन्नता किनाऱ्यास खिदळत 
किल्ले पाडत स्वप्न सारवत असते वाहत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 





झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...