बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

स्मृती

तुझ्या स्मृती.
********
तू नसतेस तेव्हा 
तुझ्या असंख्य स्मृती 
रुंजी घालतात मनात 
आणि मला ओढून नेतात 
तुझ्या सहवासात 

तेव्हा तू आकाश होतेस 
मला कवेत घेणारे
तेव्हा तू सुमन होतेस 
मला धुंद करणारे

तेव्हा तू फांदी असतेस 
माझ्यासवे झुलणारी 
माझे आसमंत भारावते 
तुझी निशब्द बासुरी 

तुझे नसणे घनदाट होते 
आणि माझ्यात आकार घेते 
खरेच तू जवळ नसतेस 
तेव्हाही इतकी जवळ असतेस 
की माझे पण 
तुझे होऊन जाते जाते 

त्या तुझ्या दुराव्याने अन विरहाने 
तू माझ्यात खोलवर रुजत असतेस 
अभिन्न होवून अन् राहतेस
माझ्यातील ओल टिकवून
जणू रंगातील पाणी होवून 

नाम रूपातील हे 
तुझे अस्तित्व 
मी माझ्यात धरून 
असतो  जगत सदैव
तुझा होवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

चांदण्याची गाणी


चांदण्याची गाणी
 ************

तुझी चांदण्याची गाणी  
मनी झरती येऊनी 
बोल पखरण ओली 
जातो चिंब मी भिजुनी ॥

तुझे हात हाती येता 
जन्म किती सरतात 
तुझ्या डोळ्यात वाकता 
स्वप्न किती फुलतात ॥

तुझ्या वेडात अजून 
शब्द नवे उमलती 
माझ्या गाण्यात नव्याने 
भाव पुन्हा अंकुरती ॥

मिठी मारते जीवन 
भरे श्वासामध्ये प्राण 
तम फिरते माघारी 
येते पूनव दाटून ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .


सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

तुझिया प्रेमाने


तुझिया प्रेमाने
***********

तुझिया प्रेमाने झालो बळवंत 
जगा मारे लाथ आनंदात ॥

तुझिया नामाने झालो धनवान 
अवघा कृपण भोगालागी ॥

तुझिया सेवेने झालो सुखी असा
हीनवट पैसा वाटे मज ॥

तुझिया कृपेचा पिटतो डांगोरा 
दत्त दत्त स्मरा म्हणे जगा ॥

तुझिया भक्तीचा लेश जो पातला 
विक्रांत जाहला हर्ष राशी ॥

तुझिया प्रेमाची पिपासा सुटेना 
जन्मा यावे पुन्हा तुझ्यासाठी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

नटांचे जग


नटांचे जग 
****
कळत नाही 
सिनेमातल्या नटनट्यांचं 
कौतुक आपल्याला का असते
ते धडपडतात अन जगतात 
पैशासाठी नावासाठी

ते करतान मनोरंजन 
ते करतात मन विलोपन 
ते देतात तथाकथित सुख
तास दोन तास खुर्चीला खिळवून 

खरंतर ते फक्त असतात 
बाहुली लेखकाच्या अन्
दिग्दर्शकाच्या हातातली
 .
ते करतात अभिनय 
बरा चांगला वा उत्कृष्ट 
घेतात छम छम पैसा मोजून  
ते मिरवतात देखणेपण 
ते करतात देह प्रदर्शन 

ते असते प्रचंड पैसा देणारे
उपजीविकेचे साधन 
तिथे असते मरणाची स्पर्धा 
अपार शोषण 
शारीरिक लैंगिक मानसिक 

यश मिळवणे 
यशोशिखरावर टिकून राहणे 
अन यासाठी खेळणे 
राजकारण गलिच्छवाणे
ते एक दुष्ट चक्रच असते 
खेळत राहावे लागते .

पैशापेक्षाही प्रसिद्धीची नशा 
ही विलक्षण असते
अन प्रकाश झोता पासून 
अंधारात जाणे 
यासारखे मोठे दुःख नसते

इथे टिकतात धूर्त 
वाऱ्याची दिशा ओळखणारे 
कुणालाही वापरू शकणारे 
अन् वरून फेकू शकणारे. .

होय ते असते 
एक भयकर राजकारण 
एक अनाकलनीय अर्थकारण 
कळते असे वाटणाऱ्या ला 
उधळून लावणारे .
अन् अनाड्यालाही 
ज्ञानी बनवणारे .

इथे स्तुती पाठकांची गर्दी 
चाहत्यांची रीघ 
टाकते करून वेडी 
शिरून डोक्यात हवा
 कधी कधी कोणाच्या 

पळत्या घोड्यावरचे 
ते स्वार होणे असते 
जमले तर उडणे असते 
पडले तर मरणे असते .

त्यांना त्यांच्ये जीवन जगू द्या .
अन तुम्ही तुमचे जीवन जगा .
साधे सोपे सरळमार्गी धोपटसे
सुख समाधानाचे मुलाबाळांचे
आवडत असेल 
हलणाऱ्या चित्रांच्या गोष्टी बघणे तर 
जरूर बघा पण फक्त त्यात गुंतू नका

कारण जागा आणि माणूस बदलले
तरी सुख आणि आनंद बदलत नसतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मी कोण?


मी कोण?
*******

मी कोण आहे जो कधीच हरवत नाही 
आहे मी चा घोष हा कधीच सरत नाही ॥

भोगतांना सुख सारे भोगात मळत नाही 
जळतांना दुःखामध्ये मुळीच कळत नाही ॥

असतो जागा विषयी विषयी विरत नाही 
असतो पाहतो निद्रेस कधीच निजत नाही ॥

तो दिसावा सदा पाहावा घडता घडत नाही 
तो कळावा फक्त रहावा हे होता होत नाही ॥

त्या मीला टक लावून जर का पाहता येईल 
पाहणे हरवून मग हे जग ही वाहून जाईल ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

काटा


काटा
******
जन्माने कुणीच कधी कनिष्ठ असत नाही 
उपजताच श्रेष्ठ बलिष्ठ असे ठरत नाही ॥१

त्या रेषा माणसा मधल्या मज दत्ता पटत नाही 
जिणे कर्मठ कोणाचे बघ मजला रुचत नाही ॥२

ते गट जाती जातीतले जरी का झाले धर्मातले 
ते तट अजूनही परी का तुटता तुटत नाही ॥३

ते जे गेले पलीकडे झाले अधिक कट्टर वेडे 
सुटले बेडीतून जरी एका दुजी तया कळत नाही ॥४

काटा निघता पायातून दुजा द्यायचा टाकुनी 
काटा घालुनी गळ्यात कोणी भले मिरवत नाही ॥५

होता आकाश मोकळे कुणी बळदात घुसत नाही 
भाग्य लाभले अपार का रे डोळ्यांनी शोधत नाही ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

जीवलगा

जीवलगा
********

नजर ढळेना शब्द सुचेना 
तुज पाहताना जिवलगा ॥१

सहवासाचे हे क्षण साजरे 
सरू नये रे कधी वाटे ॥२

तो तूच असे रे माझ्यात येऊन
अवघे व्यापून उरलेला ॥३

गेला कणकण भान हरपून 
उरले स्पंदन शीत तुझे ॥४

जगण्याचा या भासही मिटला 
विक्रांत नुरला सांगावया ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...