बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

बोलणे

बोलणे
******
काय बोलले जाते ते खरंच महत्त्वाचे नसते 
कोण सोबत बोलते तेच महत्त्वाचे असते .
बोलणे तर कुठल्याही अवांतर विषयांवर होते
कितीही अन कुठलेही विषयांतर घडू शकते 
घटना सांगितल्या जातात प्रसंग वर्णिले जातात
टेबल खुर्ची मिरचीमसाला काहीही बोललेजातात 
विषयात आपण नसतो शब्दातही आपण नसतो 
शब्द उमटल्या मनाच्या सहवासात आपणअसतो 
आणि ते मन असते मैत्री प्रदान करणारे 
आपल्या अस्तित्वातील अनेक शून्य भरणारे 
ते बोल असतात स्थैर्य आणि धैर्य देणारे 
जीवनाच्या माळरानावर आपुलकीची उब देणारे 
आणि तो काळ असतो निर्विवादपणे दुःख वर्जीत 
आपण जगत असतो आपल्या मोहरल्या अस्तित्वात 
मैत्रीचे सौख्याचे प्रेमाचे असे झाड जीवनात उगवते 
भावनांच्या वैभवाने बहरते ही खरंच जीवनाची कृपा असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

आवेग

आवेग
******
जेव्हा सरतात आवेग 
कोसळणाऱ्या प्रपाताचे 
अन वाहते पाणी 
रूप घेत प्रवाहाचे 
तेव्हाही ते जीवनच असते 

हृदयातील प्रत्येक आवेग 
हा असाच झोकून देतो स्वतःला 
उंचावरून खाली 
परिणामाची चिंता न करता 
अन हरवतो 
स्पर्शताच जमिनीला वास्तवाला 
म्हणूनच ते जीवन असते 

आवेगाचा छंद नेतच राहतो 
मनाला खेचून पुन्हा पुन्हा 
नवनव्या उतारांकडे 
नवनव्या तटाकडे 
आणि राहतो कोसळत 
जगण्यामध्ये झिंगत 
सागराला मिळेपर्यंत 
म्हणून जीवन सुंदर असते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 


सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

स्वप्न


जीवन
****

जेव्हा हरवतील तुझी स्वप्न 
आणि जागेपणात होरपळेल जगणं
तेव्हा नकोस देऊ तू दोष कुणाला
स्वतःला तिला अथवा जगण्याला
किंवा त्या खुळ्या स्वप्नाला
तुझे जीवन अथवा त्याचे जीवन
तुझे स्वप्न आणि त्याचे स्वप्न 
सगळी सारखीच असतात 
चेहरे बदलतात देह बदलतात 
मन तशीच असतात 
नदी बदलते पाणी बदलते पण 
वलय तशीच असतात 
थोडक्यात तुझे स्वतःचे इथे काहीच नसते 
ना सुख असते ना दुःख असते 
सुखदुःखात हिंदकळणारे मनही तुझे नसते 
इथे केवळ जीवन असते 
जगण्याच्या नाट्याला पार्श्वभूमी प्रदान करणारे 
तुझा प्रवेश त्याने ठरवून ठरवलेला असतो 
आणि तुझे गंतव्य सुद्धा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

सुंभ

सुंभ
****
मिटल्या मनात मिटले चांदणे
मिटलेले गाणे एक तुझे ॥
तुज भेटायचे तुज जाणण्याचे
हृदी ठेवण्याचे भाग्य उणे ॥
तरीही जगणे रेटतेच पुढे
पाठीवर कोढे प्राक्तनाचे ॥
होय निपचित जाणीव लाचार 
काय अंतपार तया नाही ॥
परि मिटते ना वेड सरते ना 
स्वप्न मिटते ना तुझे तेच ॥
विक्रांत जळता सुंभ क्षणोक्षणी 
वेदना घेऊनी कणोकणी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आधार

आधार
*******
अवघ्या जगता 
देतसे आधार 
गुरु कृपा कर 
दत्तात्रेय ॥१
चालवतो पथी 
धरूनिया हाती 
साधनेची रिती 
दाखवतो ॥२
हात सुटताच 
गती खुंटताच 
धाव घे स्वतःच 
भक्तासाठी ॥३
विक्रांत मनात 
संदेह तो नाही 
दत्त जैसा नेर्ड 
तैसा जाई ॥४ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 
ज्वालामुखी (रूपक)
*********
धुमसतो ज्वालामुखी उंच त्या शिखरावर
वाहे लाव्हा येतो धूर रूप असे घनघोर 

पान पान जळू गेले रान सारे मरू गेले
जाणिवेच्या हुंकारात गाव नामशेष झाले 

भय फार पाखरांना त्राण जाई उडतांना 
दुमदुमे  भयनाद फळ कुण्या कामनांना 

अंतरात कोंडलेला किती खोल असे जाळ
 ठाऊक न उलटला किती युगे युगे काळ 

पुन्हा एक जाग येता तोच तप्त वेगावेग
आणि नभी उलटते एक दैवी गोल रेघ 

थरारत्या स्मरणात हादरतो कणकण 
उठूनिया लोपतसे सनातन जागरण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

म्हातारपण

म्हातारपण
********

कुणालाही कधी काही मागू नये 
अन् म्हातारे झाल्यावर 
कुणावरही अवलंबून राहू नये 
चांगली असतील मुले तर ठीक आहे 
नाही तर आपणच आपली वाट 
वेगळी केलेली बरे
चार पैसे गाठीला ठेवलेले 
तर कधीही चांगली असते 
आपल्या बचतीत कुठलेतरी 
वृद्धाश्रमात शोधून सुखात जगणे 
हे सुद्धा चांगलेच असते 

प्रिय असतात नातलग अन्
सांभाळतात मुले नातवंडे
अहो भाग्य नाही या परते 
पण सगळेच काही 
एवढे नशीबवान नसतात 
वृद्धाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम 
त्यांच्यासाठीच असतात
तिथे जगावे मस्त आनंदात 
नवनवे मित्र जमवत 
नवनव्या गोष्टी शिकत 
नवीन छंद जोपासत 
राहावे सदैव वाहत गंगेगत 
मागील सारे किनारे विसरत 

मला सांभाळा रे 
अशी  अर्ज आर्जवे नकोत 
सांभाळत नाही म्हणून 
शिव्या शापही नकोत 
मुले जन्माला येतात ती
आपल्या आणि त्यांच्या प्रारब्धाने 
पुरे करण्यास काही मागील देणे घेणे
तर मग जे वाट्याला आले 
ते भोगणे क्रमप्रात आहे

अपेक्षात अडकणे म्हणजे 
संसारात अडकणे आणि 
संसारात अडकणे म्हणजे 
जन्मा मरणाच्या चक्रात अडकण
म्हणून सर्व अपेक्षांचा अंत जिथे होतो 
त्या भक्तीसागरात स्वतःला लोटून देणे 
किंवा कर्मयोगाचा कर्तव्याचा पथ पकडून
त्या मार्गाने चालत राहणे 
हेच तर अध्यात्मात शिकणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...