शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

माझ्यातला

माझ्यातला (उपक्रमासाठी)
**********
पांघरून  नभ नील 
चांदण्यात निजलेला 
होऊन फकीर मस्त 
मज पहायचे आहे ॥
नसेल नाव गाव नि 
पद प्रतिष्ठाही काही 
सोपवून जीवनाला 
मज जगायचे आहे ॥
भरेल पोट अथवा 
राहील कधी उपाशी 
माझ्याहून वेगळा त्या 
मज पाहायचे आहे ॥
देती हुलकावणी ते 
क्षण शून्य स्पर्शलेले 
सदा सर्वकाळ त्यात 
उगा राहायचे आहे ॥
घेऊन माथ्यावरी जो 
ओझे सदा कामनांचे 
माझ्यातला माणसा त्या 
मज भेटायचे आहे ॥
त्या कामना त्याच्याच का 
तो कामनाच केवळ 
जाणले शब्दात सत्य
डोळा पाहायचे आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

ज्वालामुखी


ज्वालामुखी
*********
धुमसतो ज्वालामुखी
उंच त्या शिखरावर
वाहे लाव्हा येतो धूर 
रूप असे घनघोर ॥

पान पान जळू गेले 
रान सारे मरू गेले
जाणिवेच्या हुंकारात 
गाव नामशेष झाले ॥

भय फार पाखरांना 
त्राण जाई उडतांना 
दुमदुमे  भयनाद 
फळ कुण्या कामनांना ॥

अंतरात कोंडलेला 
किती खोल असे जाळ
 ठाऊक न उलटला 
किती युगे युगे काळ ॥

पुन्हा एक जाग येता 
तोच तप्त वेगावेग
आणि नभी उलटते 
एक दैवी गोल रेघ ॥

थरारत्या स्मरणात 
हादरतो कणकण 
उठूनिया लोपतसे
सनातन जागरण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 


भारत रत्न अन् जुगार

भारतरल व जुगार
***************
जेव्हा भारतरत्न 
जुगार खेळा असे सांगतात 
तेव्हा तोंडात बोट जातात 
आश्चर्याने दुःखाने उद्वेगाणे 
नट नट्यांचे ठीक आहे 
पैसाच त्यांचे दैवत असते 
त्यांनी काही केले तरी 
त्या पाठीमागे तेच ते 
पैशाचे गणित असते 
कदाचित त्यांना कशाचे 
सोयर सुतकही नसते 
ऐषआरामात जगणे 
हेच त्यांचे ध्येय असते 
पण भारतरत्न देशाचा देव असतो 
तरुणांचा आदर्श असतो
तो तरी पाघळू नये पैसा पाहून असा 
कढई तील तुपासारखा 
कदाचित सरत असेल ही 
त्याची गंगाजळी 
तर त्यांनी तसेच सांगावे 
आम्ही त्याला काहीच 
कमी पडू देणार नाही 
रिटायर आईबापाला देतोच ना आम्ही 
आपल्या उत्पन्नाचा हिस्सा 
तर मग देवाला द्यायला 
काय हरकत आहे 
पण त्याने असे तरुणाईला 
पथ भ्रष्ट करू नये खरच करू नये

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

दोन सल्ले

दोन सल्ले
********
दोन तरजोडी तर कधीच करू नका
एक लग्न करताना दोन नोकरी धरताना 
तर एक  असा सल्ला मिळाला 
फुकट आम्हाला पण किती उशिरा 
अन जरी अगोदर मिळाला असता  
तरी काय पाळता आला असता ?

मिळेल ती नोकरी धरावी लागते पोट भरायला 
हजारो बेकारांच्या दुनियेत बऱ्यापैकी जगायला 
सरकारी नोकरीच एक बर असतं 
कारण कायद्याचं युनियनचं पाठबळ असतं 
काम केलं नाही झालं तरी फारसं बिघडत नसतं 
हजेरी लागली की पगाराचं चाक फिरत असतं 
प्रायव्हेट मध्ये जरा खपाव लागतं 
आणि सांभाळून राहावं लागतं 
साहेबापुढं शेपूट हलवावं लागतं
वाहवाची फुलं उधळत राहावं लागतं
*
आणि लग्नाचं म्हणाल तर 
जी आपल्याला आवडते 
तिला आपण आवडत नाही 
तर मग काय करायचं 
घरोघर किती पोहे खात फिरायचं 
शेवटी ऍडजस्टमेंट तर करावंच लागतं .
आणि समजा एखादी आवडून लग्न केलं
 तरी पुढचं काय कुणाला कळतं
शेवटी सगळ्यात संसाराचा एकच सूत्र असतं 
त्यातून कसं तरी पार व्हायचं असतं 
आणि चक्र तर सगळीकडे सारखच असतं 
घरदार मुलंबाळं वाढवणं खेळवणं 
रुसवारुसवी फुगाफुगी तणातणी 
ओढाताण शिक्षण आजारपण 
अन मग शेवटी म्हातारपण 
तर मग हे सल्ले सल्ल्यासाठी ठीक आहेत 
पण अशी कितीतरी सुभाषित सल्ले
आम्ही फक्त फळ्यावरच वाचतो
आणि फळ्यावरच ठेवून देतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

माकड


माकड
******
एक माकड फिरते गरगर 
वरती खाली या इमारतीवर 
भला दांडगा तो हुप्या गब्बर 
घुसतो घरात चुकवून नजर 
डल्ला मारतो कधी फळावर 
नेतो चोरून खाऊ बरोबर 
लाल पिंकट मुख रे त्याचे 
भाव तयावर सदा भुकेचे 
जवळ जाताच भय दाखवतो 
भुवया ताणून दात विचकतो 
म्हणती बाबा आला हनुमान 
गेला त्याचा तो नैवेद्य घेऊन 
म्हणते बायको अति वैतागून 
तो गेला वेडपट रोपे उपटून
भय कुतूहल डोळ्यात उमटले 
टकमक टकमक पाहतात मुले 
अरे गेले कुठे पण ते वन खाते 
झाडाखाली कुण्या निजले वाटते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

उगाच


उगाच
*****

अशी खोल डोळ्यात पाहू नको उगाच 
बुडेल मी तुझ्यात जगेल मी उगाच ॥ १

अशी येत मनात गाऊ नको उगाच 
भिजून मी सुरात धडाडेल उगाच ॥ २

कशाला ग देतेस निमंत्रण उगाच 
बोभाटून होईल गाव गोळा उगाच ॥ ३

नको नको पैंजणे तू वाजवू उगाच 
होती फितूर पाय तोल जाईल उगाच ॥ ४

कळली न मजला  दुनियादारी कधीच 
कशाला मग खेळू डाव हरला उगाच ॥ ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

माऊली

माऊलीस
********
थकलेल्या बाळाला 
घेई कडेवर आई 
चालवत नाही आता 
थोडे तुझे बळ देई ॥१
किती तुडवली वाट 
काटे मोडले पायात 
सारे सोसले पाहिले 
तुझा धरूनिया हात ॥२
नाही आडवाटे गेली 
माझी इवली पाऊले 
तुझे शब्द माझ्या जीवी 
गीत जगण्याचे झाले ॥३
झाली  ओढाताण कुठे 
बोल साहिले विखारी 
नाही जाऊ दिला तोल 
तुज जपले जिव्हारी ॥४
आता बहुत हे झाले 
त्राण माझे ग सरले 
येई धावून तू माये 
करी करुणा कृपाळे ॥५
तुझ्या शब्द पाळण्यात 
मज जोजव निजव
स्वप्न रेखिले ओवीत 
माझ्या डोळ्यांना दाखव ॥६
मग निजेल मी शांत 
तुझ्या प्रेमळ मिठीत 
सारे विसरून दुःख 
जन्म जीवन जगत ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...