गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

प्रेम

हिरवळ
*****

प्रेम नसे रूपामध्ये प्रेम नसे शब्दांमध्ये 
तनमन व्यापलेले प्रेम असे एक नाते ॥

प्रेम त्याला कळते रे प्रेम तिलाही कळते  
काळजात काहीतरी हळुवार उमलते ॥

साधा अन साजरा तो नीटस नि सावळी ती 
पाहुनिया प्रीती त्यांची  गीत उमटले ओठी ॥

त्याचे जग तिच्यासाठी तिची स्वप्न त्याच्यासाठी 
मोहरला काळ होतो जणू फक्त देण्यासाठी ॥

ओसरून पूर जाता नदी वेग संथ होतो 
किनाऱ्याला हिरवळ जीवनाला अर्थ येतो॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

अंकूर


अकुंर
******

ओढून मेघ देहावरती 
विजेची तू झालीस लकेर 
आणि झालो कुर्बान मी 
त्या उजळल्या क्षणावर 

तव श्वासातील ते तराणे
वर्षा होत पडले भुवर 
जगण्याचे गीत उमटले 
मग माझिया ओठावर 

गंध मातीचा का केसांचा 
मोगऱ्याचा दाटे दरवळ 
भान पुन्हा या जगण्याला 
आले फुटून पुन्हा अंकुर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

माझ्या लेकीस

माझ्या लेकीस
***********

तुझ्या  गोजिर्‍या रूपास
डोळा कोंदण करून 
शब्द मवाळ कोवळ
मनी ठेवता जपून 

माझ्या जीवनाची वाट
गेली प्रकाश होऊन 
रोज उगवे पुनव 
येई चांदणे भरून

तुझ्या हसण्यात मुग्ध 
लाख फुले उमलती 
माझ्या पावुलाखालती 
स्वर्ग धरेस आणती 

तुझे अल्लड वागणे 
तुझे उगाच चिडणे 
सुख बरसे डोळ्यात 
चित्ती उमले चांदणे 

किती करू मी कौतुक 
नाही शब्दात मावत 
तुझे असणे भोवती 
सुख जणू की नांदत

तुझे जगणे शब्दात
रम्य स्वप्न प्रदेशात
सदा साहित्य गाण्यात 
मज बाल्य दावतात 

तुझे वाढणे फुलणे 
झाले आनंदाचे गाणे 
माझ्या मनाचा विसावा 
तुझ्या पायाची पैंजणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

प्राजक्तओळी


प्राजक्तओळी 
*********

हे शब्द अन या काही ओळी 
तुझ्यासाठी मी कविता लिहिली 

ओळखून तू नच ओळखते 
त्रयस्थ  मोहर फक्त उमटते 

त्या वाहवेला लाखअनेकात 
उचलून असे मी ओठी लावत

कळते तुला वा नच कळते 
मन नभात परी उंच झुलते

सारीच फुले ती धरतीसाठी 
धरतीला जरी असे माहिती 

तरीही प्राजक्त असतो सजवत
इवल्या जागेत जन्म उधळत

मी पणाने त्यावर अलगद
क्षणभर आपले नाव कोरत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..


रविवार, १८ डिसेंबर, २०२२

प्रेम ओळखावे


प्रेम ओळखावे
************
खरे प्रेम ओळखावे 
कुणी सावज न व्हावे 
शब्द स्पर्शी हिंसा येता 
प्रेम नाही ते जाणावे 

नसलेल्या प्रेमासाठी
कुणी उगा मरू नये
कणभर सोन्यासाठी
आगी  उडी मारू नये

कधी कुणी चुकते ही 
भूल मना पडते ही 
पारध्याच्या गाण्यामागे 
हरीण ते धावते ही 

कधी कोणी निभावते 
कोणी जाते माघारी रे 
फुलतांना कोमजते 
फुल ते ही असते रे 

कधी मने तुटतात 
हात अन सुटतात 
हरकत नाही त्यात 
अपघात घडतात 

मिळतात प्रेम परी 
उरी घट्ट धरावे रे 
कधीतरी जीवनाला 
डोळाभरी पहावे रे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

दत्त लेखणी

लेखणी
******
दत्त कीर्ती साठी 
जाहलो लेखणी 
सुख ते अजूनी
काय असे ॥१

दत्त रूप ध्यातो 
दत्त गुण गातो 
दत्ताला स्मरतो 
येणे गुणे ॥२

दत्ता विनवितो 
दत्ताशी भांडतो 
सलगी करतो 
लडिवाळ ॥३

सुखदुःख सारे 
दत्ताला सांगतो 
आशिष  मागतो 
हक्काने रे ॥४

घर दारा पोरे 
तया हाती देतो 
सांभाळ म्हणतो 
वेळोवेळी ॥५

दिसल्या वाचून 
विश्वास जागतो 
मजला पाहतो 
दत्तराज ॥६

विक्रांत दत्ताचा 
दास म्हणवितो 
सुखात राहतो 
सर्वकाळ ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

देह वाहतो

देह वाहतो
********

मरणाच्या वाटे देह हा वाहतो 
क्षणक्षण खातो काळ त्याचा ॥१

तया निरुपाय असे जगण्याचा 
पिंड पोसायचा जन्मभर ॥२

जाती हत्ती घोडे रथी महारथी 
नवे उपजती लढावया ॥३

जन्म आपोआप झाला असे वाटे 
मरणही दाटे तैसेच ते ॥४

उदर भरण कुटुंबं पोषण   
यातच जीवन सरू जाते ॥५

विक्रांत हताश रिक्तता पाहत 
मनाच्या राज्यात निजू जातो ॥६

कोणा आळवावे सोडवा म्हणावे 
गुमान मरावे किंवा येथे ॥७

जरी सोडवता म्हणतो मी दत्ता 
कळपाच्या वाटा तरी चाले ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...