रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

दक्षिण द्वार


दक्षिण द्वार
*********

द्वार दक्षिणेचे जल 
होते वाहत वरून 
देह पाण्यात डुंबून 
होतो पायरी धरून 

वाटे सरावे जीवन 
जावे इथेच संपून 
कृष्णा पाण्यात इथल्या 
देह जावा हरवून 

परी घडले ना रे ते 
आलो वर उसळून 
भोवती अथांग माय
होती पाहत हसून 

हट्ट धरला परत 
एक डुबकी परत 
आलो वरती परत 
देह मनाच्या सोबत 

बरे ठिक महाराज 
म्हटलो सोडून हट्ट 
घेई ठेवून मागणे 
हेच प्रार्थतो विक्रांत 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

भाग्याची कविता


भाग्याची कविता
*************
त्या जुन्या घरासम देवालयी 
भक्तीने भारावली जेव्हा ती गेली 
देवीच्या रूपात तिला आई भेटली 
सात्विकता हृदयात होती उचंबळली
प्रेमसरिता डोळ्यात ओघळून आली

देवीला साडी वाहियाला खण 
हार फुले दिवा लाविले कुंकुम 
कडकडून अन दिेले अलिंगन
भक्ती भावाने करून नमन 
निघाली ती बळे पाय जडावून 

तोच एक कामकरी वृद्धा देवळात आली 
गोड बोलून एखादी साडी दे म्हटली 
हिनेही सहजच सोबत आणलेली 
दुसरी साडी तिला दिली 
तेव्हा तिच्या डोळ्यात उचंबळली
पौर्णिमा हिला दिसली
हसून मग ती म्हणाली 
मी इथेच असते  येत जा भेटत जाईल 
आणि बाहेरही पडली आली तशी गेली 
मागे तिच्या ही सुद्धा सहज बाहेर आली 
पाहते तो 
देवळाच्या बाहेर 
कोणीच नव्हते दूरवर 
कोण ती कुठली कुठूनिया आली 
लगेचच अशी कशी कुठे गेली 
क्षणभर अवाक हि क्षणभर गोंधळली 
आणि अचानक मनी उमजली 
येऊन ती आई भेटूनिया गेली 
प्रेमाला तिच्या जणू पोच ती मिळाली 
डोळ्यात पाणी उभ्या रोमावळी
दाटून ये कंठ देही वीज भरली 
भाग्याची कविता शब्दावीन लिहिली.


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

सुख दु:ख


सुख दु:ख
******
सुखही माझे दुःखही माझे 
अरे नच ओझे डोक्यावरी ॥१

सुखास मागता दुःखास  टाळता 
येतसे जडता जगण्याला ॥२

सुख दुःखाविना जन्म ना कोणाला 
कृष्ण राघवाला सुटका ना ॥३

डावा थांबताच उजवा चालला 
प्रवास घडला पावूलांना ॥४

सुखाचे आभार दुःखाचे आभार 
जीवन साचार शिकवती॥५

विक्रांता प्रवास दत्ताला भेटणे 
बाकी सारे उणे पथी आल्या॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

कळले तर


कळले तर
********

जे हवे ते 
सदैव
हातातुन 
निसटावे 

जे मागावे 
दैवा ते  
कधी न 
मिळावे 

या ऐशा
जीवनाचे
कौतुक ते
कुणी करावे 

भकेल्या पोटा
अन्न अंती 
हेच तत्वज्ञान 
खरे असावे 
  
मिळे जे 
जगण्यास 
ते गुमान
स्वीकारावे 

हे जीवन 
हे जगणे
कुणी मागीतले 
का मिळाले 

...तर असू दे 
जगून घे 
कळले तर
बघून ये 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

आसावरी ताईच्या कवितेचे रस ग्रहन

*मावळत्या दर क्षणात*  (रसग्रहन)
****

मावळत्या दर क्षणात
उगवतसे बिंब नवे
पण दिव्यास मालवत्या
स्नेहाचे तेल हवे

देहस्वी ऐहिकास
नवनवीन श्वास हवा
घरभिंती सजवाया
जगण्याचा कैफ हवा

भोवळले जग सगळे
भीतीने गारठले
अन तशात एक मोर
पावसात नाचतसे

विस्कटते स्वप्न एक
तोच दुजे अवतरते
सळसळती उंच लाट
वेगाने ओसरते 

आवर्तन हे असेच
चाललेय नेमाने
या विराट योजनेस 
अर्पावे हे 'असणे'..!
***
आसावरी काकडे
३०.४.२०२१

मनात खोलवर रुजलेली नश्वरते ची जाणीव आणि त्या जाणीवेवर विवेकाने, प्रज्ञेने, अभ्यासाने  व चिंतनाने केलेली मात असे या कवितेचे स्वरूप मला जाणवते.
काळ हे मापक तसे सापेक्ष असते. सूर्य बिंब मावळत असते म्हणजे क्षणाक्षणाने सूर्य ही विझत असतो तरी दुसरीकडे आपल्याला तो नवा दिसत असतो. 
अन आपल्या दृष्टीने सूर्याचा काळ प्रचंड मोठा हजारो वर्षाचा असल्यामुळे  आपण तो अमरत्वामध्ये मोडू शकतो पण दिवा जो आहे तो आपल्यासमोर पेटत असतो आणि विझत असतो खरंतर सूर्याचे आणि ज्योतीचे पेटणे आणि विझणे या दोन्हीही गोष्टी जरी एकच असले तरी आपल्या काळ परिमाणात जी गोष्ट आपल्या हातात असते ती आपण  सकारात्मक रित्या करून  तिचा आनंद घ्यावा.म्हणजे दिव्याला तेल घालणे.

आपले ऐहीक जीवन हे देह आश्रित आहे आणि या  जीवनात अर्थ, मजा,उत्साह मिळत असतो तो नवनव्या गोष्टींमुळे . नाविन्यातच खरे जगणे असते. याशिवाय त्या जगण्यात आपण आपला कैफ ,धुंदी आसक्ती आवड उतरावी लागते छंद जोपासावे लागतात. तरच ते जगणं सुंदर होते

कवयित्री म्हणतात की भोवताचे जग जरी  गारठलेले घाबरलेले दु:खामध्ये व्यथेमध्ये अडकलेले आहे.तरी तिथे पावुस आहे अन त्यात एक मोर नाचत आहे आणि हा मोर म्हणजे मानवी मनातील आनंदाचे ,जीवन इच्छेचे प्रतीक आहे

पाण्याची एक लाट उंच उसळते आणि दुसऱ्या क्षणी ती पुन्हा खाली उतरते मानवी मनामध्ये स्वप्नांची मालिका चालू असते. मन एक स्वप्न पाहते व ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा करते कधी कधी ते स्वप्न पूर्ण होते कधी नाही.आणि मग ते संपूर्णपणे एका उंचीवरून ते नाहीसेही होते. आणि मनात पुन्हा एकदा दुसरे स्वप्न उगवते ही मालिका सदैव चालू असते प्रत्येक मनात चालू असते

एकदा का हे जीवनाचे तथ्य मनाने स्वीकारले आणि त्या तथ्यानुसार जीवन  जगण्याला सामोरे गेले म्हणजे त्या जगण्यातील नैराश्यता निघून जाते आणि जीवनाच्या सुरात सूर मिसळून आनंदाने जगणे होते 

आपण असण्याच्या अगोदरही हे जीवन हजारो वर्षापासून चालू होते आणि आपण गेल्यावर सुद्धा हजारो वर्ष जीवन चालू राहील कदाचित त्याच्यामध्ये मानव प्राणी नसेल ही पण जीवन चालू राहील . तर अशा या अनंत जीवनातील, आपण एक क्षणभरचे कणभर अस्तित्व आहोत ,हे आपल्या अस्तित्वाचे असणे विना क्लेश स्वीकारणे, यासाठी मोठी समज असावी लागते .
अन या समजे मध्येच प्रज्ञेचा  उदय असतो.
तो इथे न लिहताही अधोरेखीत होतो.

विक्रांत तिकोणे 

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

पाचवा पुरुषार्थ


पाचवा पुरुषार्थ
****::::******

मिळे ते स्वीकार
केले समाधाने
जगलो सुखाने
 प्राप्त  जे ते ॥

दु:खाला नकार 
कधी ना दिधला
रोष न धरला 
अभावाचा ॥

इंद्रिया आधीन
झालिया वाचून 
इंद्रिया तोषून
शांत झालो ॥

अहो ते जगणे 
देवाजीचे देणे 
तयात वाहने 
त्याची मर्जी ॥

चारी पुरुषार्थ 
धर्मे निरोपिले 
जगता ते आले 
हे हि कृपा ॥

विक्रांता स्वीकार 
चारीही घडला
भक्तीचा उरला
पाचवा तो ॥

देई दत्तात्रेया 
उरले ते दान 
उभा मी घेवून
झोळी उभा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

गुज सांग


गुज
****

गूढ ते संकेत काही देवा तुझें 
मज कळायचे कैसे काय ॥१

आम्ही तो अजान संसारी पांथस्थ 
तुझे हृदगत केसे जाणू ॥२

जाणवते आत काही हुरहूर 
अस्वस्थ काहूर मनी दाटे॥३

काही लागो लाग तुझ्या निरोपाचा 
मज जगण्याचा अर्थ कळो ॥४

ज्ञानदेव माय धरूनिया कर 
करी गं सुकर आडमार्ग.॥५

विक्रांत उनाड फिरे  रानमाळ 
घेऊनी जवळ गुज सांग ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...