गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

मोरपिस उरी



मोरपिस  उरी
********
सांडून स्मृतिची 
सारीच मंजुषा 
झुगारून आशा 
परतीची ॥१
 
कसला हा शोध 
चाले जीवनात 
दु:ख विरोधात
सुख घेण्या ॥२

काहिली उन्हाची
चार प्रहराची 
सावली घ्यायची 
सारी रात ॥ ३

असेच असते 
ना रे हे जीवन 
घ्यावे स्विकारून
म्हणतो मी ॥

पण आकळेना 
आत्म विलोपन  
येते का घडून
स्विकारात ॥४

दाविता दावीना
वाट ती ही दत्त 
पावुलात रक्त 
साकळले ॥५

विक्रांता सावळे 
तेच स्वप्न दारी
मोरपिस उरी 
खुपणारे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

गजानन महाराज

गजानन महाराज
*************
सदा उन्मनीत नसे देहभान 
बाप गजानन शेगावीचा ॥
किती मनोहर हास्य मुखावर 
दव फुलावर जसे काही ॥
नाही नाव गाव नाही इतिहास 
कुठून कशास आले तेही ॥
काही भाग्यवंत जमले भोवती 
जहाले तोडती भवपाश ॥
हाय परी देहा नव्हतो मी तेव्हा
खंत हीच जीवा फार वाटे ॥
आताही तू देवा असशी सूक्ष्मात 
सांभाळीसी भक्त शरण ते ॥
परी कसे व्हावे तुम्हासी लायक  
पडण्या पावक कृपादृष्टी ॥
विक्रांत मागतो तुज भक्ती दान
कृतार्थ जीवन करी बापा  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

देव

देव
**** 
देव सांडून सांडेना 
देव मोडून मोडेना 
देव कोंडून कोंडेना 
मना माजी ॥

देव हाती गवसेना 
देव  चित्ती सापडेना 
देव रीती आकळेना 
पुजाऱ्यांच्या ॥

देव करुणा असे का 
देव प्रेरणा असे का 
देव जीवना असे का 
सूत्रधार ॥

माळ जपून पटेना 
ध्यान करून गटेना 
ज्ञानी गुंतून येईना 
जाळ्यामाजी॥

देव असला कसला
सदा छळतो प्रेमळा
प्रश्न विक्रांता पडला 
सुटेनाची ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘. २५४

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

उपचार


उपचार
****

आता उपचार 
अवघे सुटावे
जगणे उरावे 
तव प्रेमी ॥

काही मिळविणे 
काही हरवणे 
जपणे ठेवणे
नको आता ॥

नको तळमळ 
नको खळबळ 
जीवाचा या तळ
भरू जावा

उरो लहरींचा 
खेळ पाण्यावरी 
हाले वाऱ्यावरी 
जसा काही 

दिले दत्तात्रये 
कधी भरवून
कधी हाकलून
मर्जी त्यांची ॥

विक्रांत पथारी
तया पथावरी
दोन चार रात्री 
जगण्याच्या ॥
 
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.२३०

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

वाडीचा देव

वाडीचा देव
**********

वाडीच्या देवाचा 
विरह पदाचा 
दूर तो व्हायचा 
कधी नकळे ॥

वाडीच्या गंगेचा 
तीर्थ संगमाचा 
स्पर्श घडायचा 
कधी न कळे ॥

वाडीच्या मंडपाचा 
मार्ग प्रदक्षिणेचा 
पुन्हा चालायचा 
कधी न कळे ॥

वाडी पालखीचा 
सोहळा सुखाचा 
डोळा पाहायचा 
कधी न कळे ॥

बोलाव रे बापा
कृपेचा सागरा
लागू देत वारा 
तुझा अंगा ॥

विक्रांत मागतो 
दान तुज देवा 
स्वरूप दाखवा 
हृदयात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

शोध

शोध
*****
या शब्दात शोधतो मी 
हे माझे नसले पण 
ओढून भाव-भावना 
देतो मलाच मी पण 

हे शब्द नसते तर 
येती कुठून विचार 
पाण्याविना उमटती 
का पाण्यातील आकार 

थांबती विचार जेव्हा 
नसतोच विचारक 
सरतो प्रकाश तेव्हा 
नसतोच प्रकाशक 

किती गूढ किती सोपे 
या पथाचे हे दर्शक 
निर्धार हवा पण रे 
नसते काही रंजक 

ना प्रकाश गंध रंग 
ना ज्योत नाद तरंग 
शून्यात कराया वस्ती 
का हवे कुणास अंग 

जे आहे ते रे कळणे 
सांडून स्वप्न जागणे 
तिथे काय मिळवणे ?
असल्याचे हे असणे 

हे शब्द पांघरलेली
विक्रांत सोडता वस्ती
जाणीव फक्त स्फु्रती
बंधने गळून पडती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.


गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

सकाळ


सकाळ(उपक्रमा साठी)
*******

ती तशी सोनसकाळ  
फक्त येतसे एकदा 
दर शनिवारी शाळा 
गावी सकाळी भरता 

शाळेजवळील छोट्या
गल्लीतून तू येता 
दव अंथरून वाट 
तुझी पाहतसे वाटा 

त्या तिथे उगवतीला
सखी तुला पाहतांना 
सोनियाची आभा दाटे 
सवे तुझ्या चालतांना 

अन मी होतसे जणू
खुळा मंदावला वारा 
थबकून श्वास तेव्हा 
प्राण होई डोळी गोळा 

जणू नुकते नुकते
फुल एक उमलले 
मन होई भारावले 
जणू बहरुन आले

कानामागील तुझिया
रिबीनी फडफडता
खरंच सांगतो स्पर्श 
त्याचा मला होत होता 

अन विस्फारून डोळे 
ते तुझे मज पाहणे  
तुझ्या मनी कळे मज
माझे उतरत जाणे

बघता बघता वर्ष 
किती उलटून गेली
ती सकाळ अजूनही 
मनी आहे भारावली 

अन दुपार अजून 
कधीच ती होत नाही 
तुला पाहणे त्या क्षणी 
मनातून जात नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

उधारी

उधारी ***** ठेवू नको देवा कुणाची उधारी  माझ्या उरावरी येथे आता ॥ १ फिटू दे रे कर्ज माझे हे सव्याज  नको देवा लाज आणू मज ॥२ कुणाच्...