गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

दाखवी चरण


दाखवी चरण
**********
माझी थकलेली 
हाक तुझ्या कानी 
पडेना अजुनी
काय दत्ता ॥

जळलेले प्राण 
सरे सारी शक्ती
अनामिक भीती
 फक्त पोटी ॥

हरवलो रानी
धावे अनवाणी 
तुटलेल्या वाटांनी 
निशिदिन ॥

बापा अवधूता 
किती कष्ट देशी 
परीक्षा पाहसी 
दीनाची या ॥

मूर्ख शिरोमणी 
उद्दाम अडाणी
विक्रांत जाणुनी 
क्षमा करी ॥

नको धनमान
नको यशोगान 
दाखवी चरण 
एकवेळ ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


अभय


अभय
******
दिस सरला रे दत्ता 
आता जाऊ कुण्या वाटा 
माझे सरले चालणे 
तुझ्या दारी येता-येता 

क्षीण झाली रे चेतना 
दीप मंदावे डोळ्यात 
नच कळे माझ्यासाठी 
काय होईल पहाट 

डाव सरल्या वाचून 
पट गुंडाळून जाता 
कोण कवड्या कुठल्या 
काय आठवे स्मरता

 पुन्हा चालणे धावणे 
सुख-दुःखात वाहने 
तेच आखीव चौकोन 
तीच चाकोरी जगणे 

असे किती कुठवर 
नवे वस्त्र देहावर 
पुन्हा पुन्हा मिरवावे 
शाप जीर्ण तयावर 

तुझी करूणा केवळ 
तोडी मोडी भवभय 
ऐसे जाणून विक्रांत 
तुज मागतो अभय

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

विटाळ

विटाळ
*****
देह विटाळ जन्माला 
दत्ता माझ्या का लावला 
जन्म भोगतो वाहतो 
पाप आले का वाट्याला
 
दिसे दुःखाचा डोंगर 
सारा जन व्यवहार 
नको असून कुपथ्य 
मन रोगांनी जर्जर 

काम क्रोध आणि लोभ 
गळा बांधले दाटून 
मद मत्सराचा फास
कळू लागल्यापासून 

कसा घ्यावा तरी श्वास 
तुझ्या नामात रंगला 
भार वेदनांचा देही 
जीवी आकांत भरला 

येई येई बा दयाळा 
जाण माझिया हाकेला 
तू तो ऐकसी आवाज
मुंगी पदीचा चालला 

तुझा म्हणवितो बळे 
माय पुरवावे लळे 
जन्म व्याकुळ विक्रांत
तुज हाकारी कृपाळे
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

उदास गाणे


माझे उदास हे गाणे
 दत्ता टाक रे पुसून 
किंवा भिजलेल्या मनी 
दैवी ठिणगी पाडून

 वृक्ष वाढला उठला 
झाले जगणे जगून 
वाट पाहतो विजेची 
दोन्ही हात पसरून 

वाट एकेक मिटली 
गेली कड्या त पडून 
दार भिंतीत चिणून 
गेलो स्वतःला कोंडून 

आता जगतो तमात 
डोळे स्पर्शाचे होऊन
अन सरावलो असा
 राही प्रकाशा वाचून 

किती ठोठावले दार
 झाले डोके आपटून 
जाणे घडणार नाही
 तुझ्या कृपेच्या वाजून 

लाज वाटते आता 
असे निरर्थक जगून 
करी शेवट अवघा 
जावा विक्रांत मिटून


विझू देत

विझू देत
+***+
माझ्या विझल्या आगीत 
का ग जिंदगी शोधते 
नको उकरूस धुनी
तिथे ठिणगी नांदते ॥

गेला जळूनिया सारा
जरी इथला पसारा 
उब जाणवे हवीशी 
आत जळता निखारा 

नको घालूस फुंकर 
आता विझू दे निवांत 
स्वप्न सरतात सारी 
निवू घालता काळात 

कुणी उचलून भस्म 
लावून देत भाळावरी 
नच भाग्य जरी तेही 
जाऊ देत वाऱ्यावरी

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

दत्त लळा

दत्त लळा
*******
उंबरा वरती 
बसला कावळा 
खातसे फळाला 
आवडीने ॥१

पोटा परी पोट
भरे याचे पूर्ण 
भजल्या वाचून 
दत्त लाभ ॥२

तैसा हा विक्रांत 
दत्ताच्या दारात 
आला रे चालत 
सुखालागी ॥३

सुखही मिळाली 
मिळे समाधान 
दत्त हे निधान 
सापडले ॥४

किती भाग्यवान 
असे हा कावळा 
लागे दत्त लळा 
अनायसे ॥५
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १० जानेवारी, २०२२

स्वामी माय


स्वामी माय
*******

स्वामी समर्था 
श्री अवधूता 
जीवन आता 
तुमचे हाता ॥

बहु खेळलो 
बहु थकलो 
पुन्हा तुमच्या 
चरणी आलो ॥

कुठे पडलो 
आणि रडलो 
आता भुकेने 
व्याकूळ झालो ॥

धावत येई
कडेस घेई
तव प्रीतीचे 
भोजन देई ॥

बाळ तुमचा
अज्ञ विक्रांत 
घास भक्तीचा
घाली मुखात ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...