रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

वेळापत्रक

वेळा पत्रक 
********

दत्त हसवतो 
दत्त रडवतो 
दत्त खेळवतो 
सुख दु:खी ॥

जन्म हा चुकला 
काळ रे हुकला 
तिमिरी पडला 
जरी वाटे ॥

जुनाट संस्कार 
कर्मठ आचार 
काही मनावर 
अगम्यसे ॥

तू न इथला 
कळते तुजला 
दावणी बांधला 
प्रारब्धाने ॥

परी भोग रे
दिन मोज रे
जन्म जग रे
वाट्या आला ॥

किती काळ कैसे 
जगावे हे ऐसे 
दत्ता ठाव असे 
वेळापत्रक ॥

दत्ता आठवून 
सारे सोपवून 
पार जन्मातून 
हो विक्रांत  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

क्षणभर भेट व्हावी

भेट व्हावी
*******

क्षणभर भेट व्हावी दत्ता 
 तव क्षणभर भेट व्हावी रे 
तुझ्यावाचून जगण्याची 
या व्यथा मिटून जावी रे ॥

बहू पाहिल्या मूर्ती तुझ्या 
सुंदर मंदिरी सजल्या रे 
अन पादुका उंच शिखरी 
ऊर्जा वलय ल्याइल्या रे 

शैशवात तुज पाहिले 
काही कळल्या वाचून रे 
निद्रा जाग सीमेवर तू 
पाहिलेस मज हसून रे  

तसेच मुग्ध सुंदर दिसावे 
रूप मनोहर डोळ्यास रे 
विरहाची ही रात्र मिटावी 
दिनकर हो तू हृदयास रे 

त्या क्षणाची वाट पाहत 
उभा कधीचा विक्रांत रे 
सरो वेदना अवधूता ही
घे सामावून तुझ्यात रे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

लळा

लळा
*****:

आळंदीचा राजा 
ज्ञानदेव माझा 
भक्ताचिया काजा 
आतुडला ॥

घनदाट ऊर्जा 
तिथे एकवटे 
पाप खरकटे 
धुऊ जाय ॥

पावन ती गंगा 
ज्ञानाची भक्तीची 
पेलत्या शक्तीची 
घेणाऱ्याच्या ॥

आस्तिक-नास्तिक 
नाही भेदभाव 
जसा सूर्यदेव 
जगताशी ॥

पापी पुण्यवान 
होतात पावन 
परिसस्पर्शान 
तेथीच्या रे ॥

विक्रांता अवघे 
पुण्य आले फळा 
म्हणूनिया लळा
माऊलीचा ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

Preference


Preference
**********

She prefered 24 carat Gold.
It's nothing but obvious,
gold gives stability,
gold gives security,
and of course, surety.
Of the future life.

What else one would like to have?
But then, what about flowers?
Oh flowers !
One can buy them lots,
if one has gold in hand.
And one can also live without flowers.

It's leisure 
It's pleasure 
but not absolute need.
Isn't it ?
So her choice is perfect !
Bravo .
She is gem 
really intelligent .
As life is hunger 
Life is money 
Life is Gold .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .





मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

शब्द


शब्द
*****

शब्द नाजूक कोवळे 
रस तालात भिजले 
जीव बेभान बेधुंद 
अहा वाहावी गुंगले 

शब्द मवाळ मोटके 
पर तत्वात भिजले 
लावी सार्थकी जीवन 
प्राण प्रकाशी पेटले 

शब्द मनाचे तान्हुले 
भाव बंधानी नटले
करी आकांडतांडव 
कधी हसून निजले 

शब्द नागमोडी वाट 
कुणा क्वचित कळली 
कुणा मुक्कामी सोडवी 
कुणा घाली रानभूली 

शब्द सोयरे ते माझे 
मैत्र जीवीच्या जीवीचे 
तया वाचुनिया शून्य 
जिणे विराण वाटेचे 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

जगणे



मिटूनिया पंख 
स्मृती 
क्षणात पाहत आहे
सार्‍या 
प्रतिक्रिया होत्या 
मन
मनास सांगत आहे

हरवले सूर 
तरी
शब्द ध्यानात आहे.
अन
स्मरणात श्रुतींच्या 
सार्‍या
चुकाच दिसत आहे

ओझ्यात अपेक्षांच्या 
अंध
आयुष्य सरतआहे

धरणात भरता पाणी
झाड
आतले वठत आहे 

जगण्यास हवे जल
तेच
मरण आणत आहे

दु:ख साचले नकोसे
सुख 
तरीही जाचत आहे 

विक्रांत लिही तू लाख 
शब्द
हे अळवावरचे आहे 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

ज्ञानदेवा पायी

ज्ञानदेवा पायी
***********
ज्ञानदेवा पायी 
रहावे बसून 
प्रेमाने भरून 
हृदय हे ॥

पहावे तेजाचे
मानवी ते रूप 
कैवल्य स्वरूप 
शब्दातीत ॥

जगत मागणे 
नच मुखी यावे 
सुखात राहावे 
सांनिध्याच्या ॥

सदा देवा मला 
रहा वेटाळून
ठेवी रे भरून
स्वरूपात ॥

विक्रांत देहात 
चित्त आळंदीत 
चैतन्या भजत 
प्रेममय ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...