बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

रूजले बीज

रूजले बीज
*****

रुजले बीज 
भिजले बीज 
आज आले फळाला ॥

केली त्वरा 
देऊन वरा 
मीन बांधला गळाला ॥

बळे आलो 
शिष्य झालो 
मेवा मिळाला भुकेला ॥

पुण्य फळले 
वृक्ष जाहले 
अर्थ कळाला मूढाला ॥

भक्ती नसून 
सेवे वाचून 
मेघ ओळला थोरला ॥

कोण दातार 
कोण घेणार 
स्वार्थ नसल्या कृपेला ॥

खूण विक्रांत 
आली ध्यानात 
मोड फुटला भाग्याला॥

जरी ना मेलो 
परी मिटलो
तपच आले दाराला 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

तुच जाणतोस

तुच जाणतोस 
***********

तूच जाणतोच 
माझा खटाटोप 
मांडलेला व्याप 
प्रेम बळे ॥

तूच जाणतोस 
केलेली प्रार्थना 
गर्जना याचना 
ऐश्या तैश्या ॥

तूच दिली जाण
कळे मूर्खपण 
रडणं भेकणं 
थांबविले ॥

हरक्षणी तूच 
आहे सभोवती 
खुळी द्वैत दृष्टी 
मावळली ॥

आता मी पाण्यात 
भरलेला माठ 
आला गेला भ्रांत 
भीती नाही ॥

मावळल्या चिंता 
भ्रमाचा आकार 
जन्माचा प्रकार 
कळू आला ॥

अवघा उजेड 
जाणवतो अरे
चंद्र सूर्य तारे 
जाणीवेत ॥

विक्रांत फुटका 
देहात भरला 
परंतु सुटला 
दत्त कृपे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

जागव जाणीव

जागव जाणीव 
**********
जागव जाणीव 
माझी दिगंबरा 
मनाला मोहरा 
लावी आता ॥

सदा राहो दत्त 
स्वरूपी जागृत 
वाहत्या पाण्यात 
तळ स्वच्छ ॥

आहे पण माझे
शब्दाच्या वाचून 
रूप हरवून 
मौन व्हावे ॥

विक्रांता कळावा 
दत्त हा आतला 
सहज चालला
जन्म व्हावा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

सक्ती


सक्ती 
**********

बोलतो आपण
तिला 
सक्ती नाही कश्याची
ती तर 
राणी आहे घराची 

ओहोहो 
किती थोर 
आहेत हे विचार 
किती  महान
किती  उदार

होय 
एवढे शिकले सवरले तर  
पडणारच फरक 
दृष्टिकोनात

पण येताच वेळ 
देण्याची घेण्याची 
वारश्याची 

येताच वेळ 
कामाची कष्टाची 
त्रासाची 

अन महत्वाची 
म्हणजे
तथाकथित त्यागाची 

होते ऐसी की तैसी
सार्‍या उदारतेची 
आणि तिलाच
सक्ती होते 
पुन्हा सती जायची


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

सोहम भाव

सोहम भाव
*********

सोहम सोहम 
घोकून घोकून 
सोहम होऊन 
गेले कुणी 

सोहम सोहम 
ऐकून ऐकून 
सोहम रंगून 
गेले कुणी 

सोहम सोहम 
जाणून घेऊन 
सोहम सांगून 
गेले कुणी

सोहम भाव हा . 
हृदयी जागता 
नुरेच  वार्ता 
मरणाची

सोहम भावात 
जाता  हरवून
मुक्त हो जीवन
त्याचे जणू

सोहम ऐकून
स्वामी मुखातून 
गेला हरखून
विक्रांत हा 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

काळाचा काळोख


काळाचा काळोख
**************

काळाचा काळोख 
खोलवर आत
गर्द विवरात 
अथांगसा ॥

तिथे न प्रकाश 
आकार आकाश
गूढ अवकाश 
अनिर्बंध ॥

सारी हालचाल
चाले वरवर 
लाट लाटेवर 
उमटते ॥

फेन बुडबुडे 
लोभस तरंग 
तयावरी रंग 
जीवनाचे ॥

अवघे सुंदर 
अवघे भीषण 
जीवन मरण 
चाललेले॥

अतळ जळाचा 
घेण्या जावा ठाव 
हाती येतो गाव 
क्लेशाचाच ॥

घेई रे हलके
ओंजळीत पाणी
जातसे वाहूनी
अर्धे जरी ॥ 

तेवढेच तुझे
तुजलागी पुरे 
अर्ध्यांलागी अरे 
वाहण्यास ॥

ओंजळीत पाणी
सागरात पाणी 
वेगळी कहाणी 
जीवा नाही॥

विक्रांत क्षणात 
जगतो जागून
गेली हरवून 
काळव्यथा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .



बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

पाणी नीती


पाणी नीती
*********

पाणी आले पाणी गेले 
पाण्याविन डोळे ओले 

बिल भरा टैक्स भरा 
आणि करा हात ओले 

काय पाणी हक्क आहे ?
अहो तुम्ही पक्के भोळे 

फेकताच पैसे थोडे
धावतील लोभी सारे 

हाच डाव सदोदित
खेळतात दुष्ट बळे

हतबल होत तुम्ही 
शरण ते हवे गेले  

तोच व्युह तोच तह 
पराभुत अडलेले  

कमावून राजा माल
सेनापती झोपलेले

चरफ़ड उगा मनी
जन अन गांजलेले 

साम दाम भेद दंड 
मार्ग आहे ठरलेले .

धुरिणांना काय सांगू 
तुम्ही जग जाणलेले  

शब्द तरी लिहतो मी 
तुम्ही मनी आणलेले 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .







भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...