मंगळवार, १३ जुलै, २०२१

गुंतणे


गुंतणे 
****
गुंतण्याला मोह माया
कधी कुणी म्हणू नये 
पौर्णिमेच्या चांदण्याला 
क्षणिकसे गणू नये 

एका क्षणी एक उर्मी 
मनी हळू उमलते 
दिले दान दैवाने जे 
उद्यावर नेऊ नये 

गुंतणे ते घडू दे रे
आकांक्षाच्या ताटव्यात 
बहरून ऋतू येता 
फुलण्या ना म्हणू नये

देता यावे घेता यावे 
नकारात मरू नये 
उपेक्षेच्या ओझ्याखाली 
जीव उगा दबू नये 

फळफुली बहरतो 
पानझाडी हरखतो 
झाल्याविना वृक्ष असा 
जीवनाला भेटू नये


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १२ जुलै, २०२१

मालक


 

मालक
""""
दत्त जीवनाचा 
झाला या मालक
आवक जावक
तया हाती 

तया मर्जी विना 
कोणीही येवुनी
उगा या जीवनी 
प्रवेशे ना

शत्रु मित्र किंवा 
असो प्रियजन 
सारे ठरवून 
त्याचे कृपा 

तयाचेच देणे 
मान-अपमान 
घेतसे भोगून 
सुखाने मी 

जेैसी सुत्राधिन
काष्टाचे खेळणे 
विक्रांत जगणे 
दत्ता हाती


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, ११ जुलै, २०२१

काठावर पास


काठावर पास
*********

काल उभा होतो मी
 गेट जवळच 
जरा बाजुला
विचारणा करीत 
मित्राच्या आजारपणाची 
सुचना देत प्रेमाची 
अन
यादी सांगत काळजी घेण्याची

तोच एक थोरली पांढरी गाडी 
आली आतमधून 
दिसताच ती 
दिला रस्ता करून 
वळता गाडी जाता जवळुन 
कानी आले शब्द आतून 
समजत नाही का ?
गेट बसला अडवून ?
मग्रुर फुगला चेहरा  
त्यावर तुच्छतेचे अवसान 
अन गेला तो भुरर्कन निघून 
क्षणभर कळलेच नाही
थुंकी पडताच अंगावर 
जसे  जातो बावचळुन आपण 

खर एक हलका हॉर्न 
दिला असता त्यान 
तर काम झाले असते पण .
एक घमेंड अनामिक
होती आत विराजीत 
अन आपले यत्किचित 
अस्तित्व मिरवित 

काय मी दुखावलो ?
प्रश्न मला पडला ?
होय नक्कीच 
पण काही क्षण  . .
अंगावर थुंकताच यवन
शांत राहणारे एकनाथ 
थोडेच आहोत आपण 
त्या घंमेडीला देत दूषण 
निषेध उमटलाच शब्दातून

पण उठताच ती वृती 
रागाची असंतोषाची
घडताच तिचे दर्शन 
त्याच क्षणी जवळून
गेलीही ती विरघळून 

पाणी तळ्यातील 
एक लहर होवून 
पुन्हा तळ्यात 
जणू गेली हरवून .

आणि त्या मग्रुर चेहर्‍यात 
दिसला मज 
तो परिक्षक 
ते जीवन 
अन गेले सांगून 
काठावरच पास बरं का अजून !

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .










शनिवार, १० जुलै, २०२१

आषाढ आठव


आषाढ आठव
💧💧💧💧💧
दोनचार तुषारात 
आषाढाचे गाणे होते 
मुठभर खाऊ मध्ये 
अमृताचे गाणे होते 

येता अशी सामोरी तू 
जग विसरणे होते 
तुझे मज पाहण्यात 
उंच तरंगणे होते 

असुनिया जवळ तू
दूर ते अंतर होते 
दूरवर आता किती 
कि सारे स्वप्न गमते

भेटीगाठी नाही आता 
नाही पुन्हा येणे जाणे 
स्मरताच कधी तुज
मनी उजळते गाणे 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ८ जुलै, २०२१

मायेची कवडी


मायेची कवडी
************

धनिकांना गुरू
सदा उपलब्ध 
दरिद्री ते लुब्ध
दूरवरी 

विदेशी भक्तांना 
सदा मोठा भाव 
गोरेपणी आव 
श्रेष्ठत्वाचा 

भेटताच शिष्य 
परदेशी झाला 
मोठेपण त्याला 
आपोआप 

असतो व्यापार 
अवघी शेवटी 
मायेची कवडी 
अजिंक्य ती

विक्रांत जाणले 
मान्यही केले 
चालू द्या चालले 
गुरु लोक

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, ६ जुलै, २०२१

अक्कलकोटीची आई

अक्कलकोटीची आई
****************
अक्कलकोटीच्या आईचे 
ऋण  फिटत नाही 
बाळ विक्रांता एकटा 
कधीच सोडत नाही 

अक्कलकोटीच्या आईचे 
लाड संपत नाही 
दिली खेळणी अपार 
हौसच भागत नाही 

अक्कलकोटीच्या आईचे 
कौतुक सरत नाही 
किती आनंद आनंद 
हे पोट भरत नाही 

अक्कलकोटीच्या आईची 
माया कळत नाही 
किती सांभाळू हातात
कमीच पडत नाही 

अक्कलकोटीच्या आईगत
कुणीच जगात नाही 
तिच्या मांडीवरी खेळे 
काहीच मागत नाही 

अक्कलकोटीच्या आईला 
जन्म सारा वाहिला 
तिने उचलुनी पान्हा 
भक्ती ज्ञानाचा पाजला


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, ४ जुलै, २०२१

या वाटा अंधाराच्या


वाटा अंधाराच्या 
*************

या वाटा अंधाराच्या 
या वाटा निरुपायाच्या 
दूर दूरवर जातात 
परत न येण्यासाठी 

या वाटा जागोजागी 
असतात थांबलेल्या 
चुकलेल्या वाटसरूंना 
भुलून नेण्यासाठी 

या वाटा दुःखाच्या जणू 
तृण पाचोळा पांघरुनी
होतात निसरड्या केव्हा 
अस्तित्वा गिळण्यासाठी 

या वाटा वळणावरती 
सदा भक्ष शोधत असती
तिमीराचा डंख देऊन 
तिमिरात दिव्याला ओढती

पस्तावून कवट्या कितीक 
पडल्यात वेशीवरती 
गर्तेतील क्षण आठवूनी 
झिजल्या वाचूनी झिजती 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...