रविवार, १४ मार्च, २०२१

नाम घ्यावे


नाम घ्यावे
*******

सुखाने बसावे 
राम नाम घ्यावे 
उगाच न व्हावे 
उतावीळ ॥१॥

उतावीळ होता 
धैर्य हरविता 
आलेले ते हाता 
ओघळेल ॥२॥

ओघळू न द्यावे 
उदास न  व्हावे 
पुढेच चालावे 
दृढतेने॥३॥

दृढता मनाची 
दृढता ध्येयाची 
दया त्या प्रभूची 
बरसेल ॥४॥

बरसता प्रेम 
अन्य नाही काम 
स्वानंदाचे धाम 
गवसेल ॥५॥

गवसतो दत्त
विक्रांता भक्तीत
सांगतात संत
आण घेत ॥६॥
****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
***दत्त**

शनिवार, १३ मार्च, २०२१

आठवून दत्त

आठवून दत्त
*********:

आठवून दत्त 
मनी होतो स्वस्थ
आणि कुठे चित्त 
लागू नये  ॥१

सुखाचा पाऊस 
ओघळतो आत 
वाहतात पाट
स्वानंदाचे ॥ २

कर्पुर गौरम 
तेजस आनन  
रुद्राक्ष भूषण 
मनोहर ॥३

शिरी जटाभार 
हातात त्रिशूळ 
त्रिगुण समूळ 
नष्ट करी  ॥४

दिगंबर देही 
कमंडलू हाती 
सर्वांगी विभूती 
दाटलेली ॥५॥

सभोवती श्वान 
बागडती चार 
युगे जणू चार
नम्रभावे ॥६॥

प्रेमाची ती मुर्त 
प्रसन्न गावुली
अवनी जाहली 
प्रेमबळे ॥७॥

स्वामी जगताचा
विक्रांता विसावा 
सदैव राहावा 
ह्रदयात ॥८॥

******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

नकार नाही

नकार नाही
******:::

येण्यास तुझ्या नकार नव्हता 
जाण्यास तुझ्या नकार नाही .
क्षितिजावर रंग उमटती  
कसे कुणास ठाऊक नाही  

काय म्हणू त्या चित्रांना 
जया मुळी आकार नाही 
डोळे भरूनी घ्यावे पिवूनी
रसिकता हि नकार नाही  

ओंजळीत या पडली सुमने 
रंग गंधांवर जीव जडला
कोमेजणार होतीच कधी ती
रागावण्या अधिकार नाही

असेच असते जीवन सारे 
नित्य सवे राहणार नाही  
गत क्षणांचे रंग सुनहरी 
पण मन विसरणार नाही  

आता आताच कुस बदलली 
निज तशी ही येणार नाही 
त्या स्वप्नाचे तुकडे काही 
या स्वप्नाला मिळणार नाही  

***:*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

प्रमेय


प्रमेय( उपक्रमासाठी )
****


एक दुपार परीक्षेची 
वहीत अडल्या भूमितीची 
विखुरलेल्या दप्तराची 
शाई सोडणाऱ्या पेनाची 
होती रेंगाळत 
हलकेच सरकत 
उष्ण झोत वाऱ्याचे 
अंगावरून वाहत 

समोर होते तेच प्रमेय 
तू सोडविलेले फळ्यावर 
केस मागे सारत 
पुड खडूची झटकत 
जणू माझ्या डोळ्यासमोर 
एक कविता होती उमलत 

तुझे शब्द होते स्पष्ट 
गृहितकही पक्के पाठ 
ओळीमागून ओळी त्या
सहज होत्या झरत

अन सुटताच ते प्रमेय 
विजय मिरवणारे तुझे ओठ 
बाईंची शाबासकी झेलत 
जगत्जेत्याच्या अविर्भावात 
तू बाकावर जाऊन बसलीस 
निसटत्या नजरेने माझ्याकडे पाहत 
माझ्या डोळ्यातील कौतुक वेचत 

ती माझी पहिली कविता 
माझ्या मनात होती नाचत 
शब्दावाचून अर्थावाचून 
मला न कळणाऱ्या 
गृहीतकांना डावलून

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


शुक्रवार, १२ मार्च, २०२१

शिव दत्त

शिव दत्त
********

मोहाचे मांजर 
हातून मरावे 
काशीत घडावे 
जाणे मग ॥१॥

होवून भैरव 
दास त्या शिवाचा 
शव हे लुटावे 
आपलेच ॥२॥

निनादो ओंकार 
जप श्री शिवाचा 
अवघ्या तमाचा 
नाश होवो॥३॥

एक समिधा मी 
घाटाच्या धुनीची 
होऊन जन्माची 
इति व्हावी ॥४॥

उगाच धिवंसा 
उमटे चित्तात 
शिव त्या तत्वात 
लीन व्हावे॥५॥
 
अन्यथा काय तो 
कुठे न जगात 
श्वासाच्या लयीत 
भरलेला ॥६॥

विक्रांत दत्ताचा 
शिवाला नमितो 
दत्ताला पाहतो
शिवरुपी॥७॥

*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, १० मार्च, २०२१

खेळणे


खेळणे
******

सहज कुणाचे 
होऊनी खेळणे 
पाहीले जगणे 
दत्तात्रेया॥१
 
कधीतरी कुणी 
धरीयले उरी 
कुणी भूमीवरी 
टाकीयले॥२

आठवून कुणी 
काढले शोधूनी 
घेतले ओढूनी 
क्षणभरी ॥३

अन येताच तो 
कशाने कंटाळा 
चिंध्यांचा बाहुला 
पुन्हा तमी ॥४

सुख ते कसले 
असे खेळण्याला 
मनोरंजनाला 
जन्म त्याचा ॥५

जाहले खेळणे 
भरले रे मन 
औचित्य संपून
गेले मग ॥६

खेळणे होण्यात
गंमत रे आली 
गती वृत्तीतली 
दिसूनिया  ॥७

अगा दत्तात्रेया 
पुरे झाले सारे 
उसवले दोरे 
ठाई ठाई ॥८

विक्रांता कळले 
निरर्थाचे चाळे 
अस्तित्व जाहले 
उगा मग ॥९
***********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, ९ मार्च, २०२१

संत चरित्रे

संत चरित्रे
*******

संतांची चरित्रे
रसाळ गोमटी 
भव बंध तुटी 
होय त्यांनी॥१॥

संत जणू काही 
चालती भूदेव 
स्वानंदाची ठेव 
तया पायी॥२॥

पावन पवित्र 
जीवन प्रसंग 
घडे संत सग 
आपोआप ॥३॥

सहज बोलणे 
असे उपदेश 
तन मन क्लेश 
दुरावती ॥४॥

निवते अंतर 
होय समाधान 
जीवा मिळे खूण 
निश्चिंती ची ॥५॥

तयाच्या शब्दांचे 
धरुनिया बोट 
चालतांना वाट 
शीण जाय ॥६॥

विक्रांत तयांचा 
ऋणी जन्मोजन्मी 
नित्य निरंजनी 
लक्षियले ॥७॥
*^*^*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...