बुधवार, २९ जानेवारी, २०२०

ज्ञानीयाच्या गाठी

 

ज्ञानियाच्या गाठी 
************

ज्ञानियाच्या गाठी 
ज्ञानाच्याच गोष्टी 
भाकरीची पोटी 
याद नाही

येई जिवलगा
घेऊनिया हाती 
अमृताची वाटी 
काठोकाठ 

काय सांगू बाई 
शब्द कवतुक 
ओघळते सुख 
श्रवणात

बोलता बोलता 
जीवीचे ते गुज
सांगती सहज 
बहुमोल 



अदृष्य ते दृष्य
दिसू लागे डोळा 
भेटीचा सोहळा 
मनोरम

चैतन्याची कळा
चैतन्यात गोळा 
चैतन्य निराळा 
तरी भासे

जाहला सत्संग 
सत्याचाच संग
विक्रांत निसंग 
क्षणा भेटी


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

दत्त तत्व





 
दत्त तत्व
*****
माझे नाहीपण
तुझिया वाटेला
म्हणून जगाला
कळेचिना ॥

आयुष्य म्हणजे
अभ्राचा आकार
जल रेखावर
जन्म चाले ॥

हरवले भान
देह आणि मन
तरीही स्फुरण
दत्त असे ॥

आघात वाचून
कुठले स्पंदन
परि कणकण
गुण ग़ुणे ॥

नसल्या वाटेचे
जरी वाटसरू 
चाले येरझारू
खुणावर॥

नसे सुरुवात
मग कैसा अंत 
बुडला प्रेमात
शब्द माझा ॥ 

विक्रांत अस्तित्व
दत्ताचे कवित्व
धूम्र वलयात
गंध होय ॥

निर्गुण निजले
त्रिगुण सरले
दत्त आकळले
तत्व आत ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


सोमवार, २७ जानेवारी, २०२०

कुठे शोधू दत्ता




कुठे शोधू दत्ता
*********
कुठे कुठे शोधू दत्ता
माझा हरवला रस्ता ॥

जग रान भेरी झाले
माझे काळीज जळाले ॥

पेटे डोळ्यात तहान
जन्म वैशाखाचे ऊन ॥

नाही सावली आधार
दत्ता जीवाला सावर ॥

आता विझू आले प्राण
येई येई गा धावून ॥

मायबाप अवधूता
देई दर्शन विक्रांता॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


चाक जीवनाचे



चाक जीवनाचे
*******  

आताच टपऱ्या होत्या त्या इथे
लगेचच सांगा गेल्या तरी कुठे

काय गाडी आली बागुलबुवाची
दवंडी पिटली कुण्या वा बळीची

नका घाबरू खेळ हा घडणारा 
दर तीन चार मासी  दिसणारा

आम्हाला सवय पथी चालण्याची
चुकवत गाड्या घराला जाण्याची

असतात म्हणती इथे फूटपाथ
दावतात असे उगा स्वप्नच खोट

जगू देत त्यांनाही जगतोय आम्ही
कशाला धावता वाया असे तुम्ही

जाळून पेट्रोल वाया टेक्स जातो
भिऊन माणूस का जागा सोडतो

नका हो असे उगा नाटक करावे
आहेत तसे पुढती हे जगत राहावे

असो गल्लोगल्ली टपरी मांडलेली
राहो वडे भजी पान जना आवडली

सुखे ते विकती मजेत आम्ही खातो 
होतो त्रास काही असू दे म्हणतो

कुणाला कधी ते जमणार नाही
गाडी खालची ती हलणार नाही 

चालला कशाला मग हा तमाशा 
जर उठणार ना कुणाचाच गाशा

मिळाला का वाटा भेटला का दादा ?
थोडासा फुगीर झाला ना हो वादा ?

चालू द्या चालले आम्ही न पाहिले
चाक जीवनाचे हे सदा रुतलेले

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...