शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

नको मज हंडा






नको मज हंडा

****

तुझ्या मोहरांचा
नको मज हंडा
राहू दे घेवडा
दारातला ॥
.
नित्य येई घरा
सेवा ही स्वीकारा
अनित्याचा वारा
नको दत्ता ॥
.
देऊनी संपत्ती
जर तुझे जाणे
नको देऊ देणे
मज असे ॥
.
संपत्तीने मद
देवा घडतसे
जगी दिसतसे
सर्वत्र हे ॥
.
म्हणूनिया देई
अन्न पोटभर
वस्त्र अंगावर
पुरे असे ॥
.
धन उधळणे
व्याख्या ही सुखाची
वाच्छा भोगण्याची
नसू देरे ॥
.
विक्रांत जीवन
तुझ्या कृपेन
जाऊ दे भरून
दया घना॥
.

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुन्यस्थानी



 शुन्यस्थानी
*****
मनाला घालून
देहाचे कफन
चालले जीवन
शुन्यस्थानी॥

असल्या वाचून
अस्तित्व कुणाला
जनाजा चालला
शोकाकुल ॥

व्याकूळ रुदन
येतेय आतून
सापडेना पण
तेही घर ॥

आले न कुठून
कळल्या वाचून
आतले फळून
रिते पण ॥

कुठली मंझिल
कुठला माजरा
अवघा पसारा
नसून ही ॥

विक्रांत खांद्याला
विक्रांत चालला
असून नसला
कारभार ॥




©
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

चाले पायवाट

  


चाले पायवाट
 **********

निर्वाणीचे हासू 
दाटले डोळ्यात 
दीप अंधारात 
दिसू आला ॥
.
दूर कोठेतरी 
हंबरती गाय
तटतटे सय 
अंतरात ॥.
.
हरवले भय
मरणाची कथा 
जगण्याची व्यथा 
कळू आली ॥
.
आणि किलबिल 
कुठल्या खगांची 
पूर्वेच्या दिशेची 
ग्वाही देते ॥
.
छेडल्या वाचून 
उठती झंकार 
रोम देहावर 
उमलले ॥
.
विक्रांत दत्ताची
चाले पायवाट 
अंधाराची गाठ 
उकलली ॥

*****
  © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १ जानेवारी, २०२०

कृष्ण



कृष्ण
 *****
यमुनेच्या तीरी 
आला मोठा पूर 
तयांमध्ये सुर 
मारी कान्हा 

कसा बाई वेडा 
नंदाचा हा थोर 
जीवा लावी घोर 
सगळ्यांच्या 

पाण्याचे ना भय
भय ना भयाचे 
कंस चाणुरांचे
तया काही 

पाणीयांच्या लाटा 
हाती थोपावतो 
थकतो ना येतो 
माघारी तो 

क्षणी ऐलतीरी 
क्षणी पैलतीरी 
सुंदर साजरी 
मूर्त दिसे 

पुरे कर आता 
खेळ कौतुकाचा 
ठाव काळजाचा 
घेऊ नको 

राहा रे समोर 
सावळ्या सुंदर 
डोळीयांचे घर 
सोडू नको 

विक्रांत किनारी 
भयभित जरी 
कृष्णा तुजवरी 
भिस्त सारी


 **


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




**

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

फळ दत्ता देई

 फळ दत्ता देई
 ************

माझी या प्रेमाचे
फळ दत्ता देई
होऊनिया येई
जिवलग

आणि काही नको
सोने हिरे मोती
चरणांची माती
लाभू दे रे

दूर करी देवा
मानपान सारा
संसाराचा वारा
लागू नाही

तुझिया प्रेमात
जगावे सतत
तुझा आठवत
 रात्रंदिन

नामाचा झंकारी
सुख आवर्तन
केवळ उरून
जावे बाकी

मग मज जग
म्हणू देत वेडा
विक्रांत बापुडा
नादावला 



©
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

ज्ञानाभिलाषा












ज्ञानाभिलाषा
**********



वाहतो हे शब्द
अक्षरांची पोथी
नाही तया गाठी
अनुभव ॥
कुणी कुणी येते
ऐकविते ज्ञान
कंटाळून कान
गेले तया ॥
जाणत्या जवळी
सदा उभे मौन
वायफळ प्रश्न
निरर्थक ॥
शास्त्राचा धांडोळा
बुद्धीचा पाचोळा
अवघा घोटाळा
गमतसे ॥
जाणत्या जवळी
जाणण्यास जाता
जाणण्याची वार्ता
बुडो जाते ॥
जयाचे वरण
करीतसे आत्मा
तया अपघाता
नाव ज्ञान ॥
बाकी कसरत
श्वासांची शब्दांची
चाले जगताची
मुक्तीसाठी ॥
विक्रांत निमूट
पाहुनिया गती
काही नाही हाती
म्हणतसे ॥

 ©
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...