शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

पाहू नको दोष



 पाहू नको दोष
**
पाहू नको दोष 
माझे दया घना 
अंत तो तयांना 
नाही मुळी 

जैसे विश्वरूप 
तुझे पाहताना 
भोवळ अर्जुना 
आली असे 

परी तयामध्ये 
एकच तो गुण
तुजला शरण 
आलो आहे 

एकच तो थेंब
जैसा अमृताचा 
सकळ व्यथांचा 
नाश करी 

एकच किरण
करीतो संहार 
तमाचा सकळ 
प्रवेशिता 

जरी झालो दत्ता
बळे तुझा दास
पुरवावी आस 
माझी आता 

हरवी न्यूनत्व 
देई पावनत्व 
जैसे पावकत्व 
हुताशनी 

कृपेचीच ध्वजा 
मग हा विक्रांत 
राही मिरवत 
जगा माझी


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

महद भाग्य





महद भाग्य

************
म्हणतो मी माझे 
जयाला हे दत्ता 
दिलेस तू हाता 
ठाव असे 

लायकी वाचून 
ओघळले सुख 
भागविली भूक 
वेळेवरी

अहो घरदार 
गुणांची लेकर 
समाधान सार
तुझे कृपे 

तुचि ती दिलीस  
काळजात कळ 
भक्तीचे वादळ 
छातीमध्ये 

तेही एका भाग्य 
महद सुखाचे
फळची पुण्याचे 
जणू काही 

विक्रांत कृतज्ञ 
सदा तव पदी 
करे प्रीती स्तुती 
यथा मती

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

उधारी

   


उधारी
 *******

दत्ता जीवनाचे 
कर काहीतरी 
अवघी उधारी 
मिटव  रे

कधीची ही किती 
मज ना माहिती 
नको चक्रवाढी 
गुंतवू रे

तसा तर कधी 
नव्हतो पुढारा 
मिरविता दारा 
देवा तुझ्या 

पण कधी तरी 
असेल पाहिले 
चित्ती ठसविले 
दासासी या 

तसा फार काही 
नच उपयोगा
आलो तव योगा 
दया घना

म्हणूनिया रुष्ट 
होणार तू नाही 
खात्री मज ही 
आहे पूर्ण 

श्रीदत्त माऊली 
प्रेमे तू ओतली 
विक्रांत जवळी 
घेई आता



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

दत्त ओळख

 
 
 
दत्त ओळख
********

दत्त भरल्या डोळ्यात
जग अंधारले काळे
मोह सर्पिनीचे मुख़
झाले जहर सांडले .
.
दत्त स्मरता मनात
तुटे मुद्द्ल पटाचे
पोटी सुखावती लाटा
किती उमाळे हर्षाचे
.
दत्त ओळख अंधुक
गळा घालतसे मिठी
गंध चाफ्याचा मधूर
झाला शहराची उटी
.
दत्त वाटेने चालता
काटे पथाने गिळले
माय अंथरी पदर
कैसे सोनुले चालले
.
स्वप्न सत्यात पहाट
ओली जाहली डोळ्यात
थेंब विक्रांत सांडला
दत्त पदी सुमनात
*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

आमिषे


आमिषे
******
फोनवर फोन
 येती दणादण
नकोसे जीवन
होत असे ॥
नाही देणघेण
नाहीच मागण
जीवा भणभण
तरी होय ॥
ऎसे मुर्खपण
डोक्यात शिरते
व्यर्थ कुणाकडे
सांगावे का ?॥
अहो मज नको
तुमचे ते काही
सुखात मी राही
माझ्यातल्या ॥
नसे लागभाग
कसली हवाव
अंतरात देव
सदा तृप्त॥
नको ती आमिषे
नको भलावण
दत्त राये मन
भरलेले ॥
****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

दान


दान
****
कृपाळू होऊन
दिले तू जे दान
सुखाने भरून
पावलो मी ॥
दिलीस ती शांती
मनो गाभाऱ्यात
प्रेम प्रकाशात
नांदतो मी ॥
झालास सोयरा
भार वाहणारा
कृतज्ञ दयाळा
जाहलो मी ॥
आता कुठे जावे
वाया वणवण
दत्ताचे चरण
पाहिले मी ॥
उमजून माया
मैत्रीत रुजलो
अवघा राहिलो
भरून मी ॥
विक्रांत सुजान
करुनी सोडला
पायी बसविला
सुटून  मी ॥
****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दत्ता भार माझा



दत्ता भार माझा
********* ***
दत्ता भार माझा
किती रे वाहसी
सदा सावरीसी
पडताना ॥
काय माझे पुण्य
केवढे से तप
परी सुखरूप
ठेवीसी तू ॥
भक्त सागरात
कुण्या कोपऱ्यात
तुजला स्मरत
राहतो मी ॥
परि त्या स्मरणी
जाहला तू ऋणी
देतो किती देणी
भरूनिया ॥
मायबाप माझा
सखा तू सोबती
जडली रे नाती
तुझ्या ठायी ॥
कळे ना मजला
तुझी कृपा दत्ता
लोळतो मी पदा
सदा तुझा ॥
ठेव दृढ पायी
तुझा तू विक्रांत
नच उधळत
जावो कुठे ॥

****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...