रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

दत्त दिसो मज


दत्त दिसो मज
भरला जगात
अवघ्या रूपात
नांदणारा ॥
दत्त स्मरणात
जाऊ माझा दिस
विषयाचे विष
स्पर्शू नये ॥
नांदावा सकल
संतांचे संगती
उलटून दिठी
पाहण्याची ॥
वाहती प्रवाह
तमाचे भ्रमाचे
व्हावे नच त्यांचे
कधी काळी ॥
आणखी विक्रांता
नलगेच काही
सदैव तू राही
हृदयात ॥


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

. . .ना चि





. . .ना चि
**********
त्याचे प्रश्न तिला
तिचे प्रश्न त्याला
उत्तर कोणाला
सुचेनाचि

आवडला खेळ
निसटली वेळ
परी ताळमेळ
लागेनाचि

काही देहावरी
काही मनावरही
सुखाच्या लहरी
थांबेनाचि

कळेल जगाला
घराला दाराला
शब्द बोलण्याला
धजेनाचि

इतकाच काळ
इतकाच वेळ
मन रानोमाळ
थांबेनाचि

निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि

आजचा उद्याला
देऊन हवाला 
प्रश्न जडावला
मिटेनाचि

०००००००


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

दत्ता येई रे





दत्ता येई रे
मज पाही रे
पदी देई  रे
ठाव आता ॥
 कर घाई रे
वेळ नाही रे
प्राण जाई रे
मम आता ॥
जन्म सरला रे
यत्न चुकला रे
देह थकला रे
भवरोगी ॥
नच लायक रे
मूर्ख बालक रे
तरी दुर्लक्ष रे
करू नको
घट फुटू दे रे
नभ सुटू दे रे
प्रश्न सुटू दे रे
मुळ रुपी ॥
येई धावत रे
कृपा विक्रांत रे
असे मागत रे
स्मर्तृगामी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com
०००००००

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

वस्त्र




वस्त्र
*****

वस्त्र विटले
वस्त्र फाटले
अस्तित्वास हे 
प्रश्न पडले

नवे कालचे
आज जुनेरे
उद्या होईल
बघ पोतेरे

तर मग हा
व्याप कशाला
अर्थ काय रे
या जगण्याला

प्रश्न असले
वांझ मनीचे
पुन्हा उठले
शांत तळीचे

शोध घेऊन
जीव थकला
दत्त पदाशी
येत थांबला

दे बा उत्तर
येत सत्वर
होणे मग ते
होवो नंतर

तुझा विक्रांत
उभा तिष्ठत 
तव दारात
तुज स्मरत 

© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

श्रीपाद गणेश



श्रीपाद गणेश
**********

आकाश प्रकाश
माझा देव गणेश
श्रीपाद वल्लभ
घेऊनिया वेष ॥
येई भादव्यात
चतुर्थीला थेट
मंगल सुखाची
करी लयलूट ॥
काय काय मागू
माझ्या दैवताला
जय लाभ तर
असती नखाला ॥
धन मान रूप
नको बाबा मला
सदा राहू दे रे
तुझिया पदाला ॥
बघू दे रूपाला
स्तवू दे गुणाला
ओठ करू देत
नाम गर्जनेला ॥
याहून अधिक
नच उरो चित्ता
म्हण रे तू बाप्पा
तुझा या विक्रांता ॥

(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in‍

सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

श्रीपाद वल्लभा


श्रीपाद वल्लभा
************
श्रीपाद वल्लभा
प्रभू दत्तात्रया
माझिया हृदया
वास करा ॥१॥
जैसी कृपा केली
भाबड्या रजका
तैशी या बाळका
वरी करा ॥२॥
परी नका देऊ
जन्म यवनाचा
धनाचा मानाचा
कधी काळी ॥३॥
जैसे ज्ञानी केले
मूढ ब्राह्मणाला
तुझिया कृपेला
प्रार्थी तैसा ॥४॥
जेणे तुझे प्रेम
सदा लागे वाढी
संसार आवडी
सुटूनिया ॥५॥
विक्रांत भक्तीचा
दारात मुकाट
पडावा दृष्टीत
तुझ्या प्रभू ॥६॥
.
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in‍

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

डॉ.म्होप्रेकर मॅडम



डॉ.म्होप्रेकर मॅडम

असंख्य रूपे तुमची
इथे नित्य मी पाहिली
असंख्यात व्यक्ती एक
आहात खूप वेगळी

शीतल शांत मंदसे
जणू चांदणे कोवळे
बरसून  सुखावून
सदा इतरास  गेले

प्रसन्न छान समृद्ध
नंदनवन फुलले
प्रियजनांसाठी जणू
उदार मेघ दाटले

उष:काली  पसरले
सूर्यकिरण कोवळे
नसे डाग किंतु कधी
देहावरी जे ल्याईले

कुणा जरी कधी जरी
हे गहन वन वाटले
मूढ तयापासूनिया
सु ख सदा अंतरले

माता सदा तू दयाळू
असे शिघ्र कनवाळू
कर्तव्यनिष्ठ पत्नी नि
लेक सून ती स्नेहाळू

जनसेवेसाठी मनी
आस सदा असे मोठी
रुग्णसेवा हीच पुजा
असे कर्तव्य आरती

गमते कर्तव्य निष्ठा
जरी कधी ती कठोर
आईचेच प्रेम त्यात
सदा निर्मळ अंतर

किती आतताई लोका
क्षमा तुम्ही ती केलीत
कित्येकांचे अपराध
पोटी अन् घातलेत

जगण्यातला आनंद
केला सदैव साजरा
प्रियजन सवे जणू
जन्म केलात सोहळा

ज्यांची स्मृती जनास या
होते सदा सुखदायी
विरळच असतात
अशी जगी लोक काही

त्या तया भाग्यवंतात
आहात तुम्ही पुढारी
म्हणून मागे प्रभुस
सौख्य तुम्हा मिळो सारी

विक्रांत तुमचा असे
सदा सुखी अनुचर
म्हणे धन्यवाद मॅम
सांभाळले आजवर

+

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...