मंगळवार, ९ जुलै, २०१९

कृतार्थ सांगता



कृतार्थ सांगता
***********

देह हा जगाचा
पंच महाभूतांचा
वाहत्या विश्वाचा
कण फक्त ॥
व्याधींनी ठेचला
दुःखांनी वाकला
अतृप्ती ओतला
जणू रूप ॥
विकारी जळला
विकारी मळाला
विकारी चालला
मृत्यूकडे ॥
ऐसिया देहाचे
करावे ते काय
श्रीदत्त उपाय
करी माय ॥
नको रजकाची
वांछा भोगण्याची
धुणी ती जन्माची
धूवायाची ॥
विक्रांत प्रार्थितो
तुज अवधूता
कृतार्थ सांगता
करा यांची ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
०००००

सोमवार, ८ जुलै, २०१९

मनाचा बाजार


मनाचा सुमार
चालला बाजार
नच अंतपार
याला दत्ता

हवेपणाला या
अंतर पडेना
स्वप्नांची सरेना
मोजदाद ॥

एक मिळताच
चिकटे दुजाला
मोहाच्या झाडाला
लाख फुले ॥

का रे तडफड
व्यर्थ धडपड
जरी डोईजड
उतरेना ॥

मोहात धावते
पापाला बुजते
अडते रडते
रात्रंदिन ॥

विक्रांत मनाला
वाहितो तुजला 
स्वीकारा दयाळा
दत्तात्रेया

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००


रविवार, ७ जुलै, २०१९

वारी




वारी
***

सर्वव्यापी सनातन
ज्ञानदेव पुरातन
पंढरीसी येणं जाणं
एकपणी रसपान

जाणीवेच्या मातीमध्ये
उगवणे जागेपण
अवकाश व्यापूनिया
विरलेले देहभान

पादुकांची स्पर्श भेट
जोडणारे जनमन
एका भाव एक ध्यास
लाखो चालती चरण

चालण्याच्या सोहळयात
जन्म जगण्या वेढून
वाटेचे निमित्त फक्त
आत स्थिरावला क्षण

चाल बापा त्या पथाने
स्वरूपात मुरलेला
वाहणारे पाय वाहो
शब्द थांबो चाललेला


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

आसक्ती


आसक्ती
********

कशाला आसक्ती
हाडांची मांसाची
सजल्या त्वचेची
जगन्नाथा

जनुकात बंद 
प्रजनन छंद
घेण्या देहबंध
नव्या रुपी ॥

कामातूर मन
तोच भोगवटा
मरणाच्या वाटा
घोंगावती ॥

मनोमनी चाले
सुखाचा हा शोध 
अतृप्तीचा नाद
विश्व भरे ॥

विक्रांत मागतो
कृपेची सावली
सरू दे काहीली
दत्तात्रेया ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००


शनिवार, ६ जुलै, २०१९

जळो मोठेपण




जळो मोठेपण 
आले उगवून 
मनाला व्यापून 
नको तरी

बरवे राहावे 
कुणी नसलेले 
दत्तात रमले 
चित्त माझे

नको ती उपाधी 
दयाघना पाठी 
सोडव रे गाठी 
पडलेल्या

होणे कुणी नाही 
देणे कुणा काही 
आठवण ती ही 
नसु देरे

तुझिया प्रेमात 
राहावे जगत 
आनंदे पाहत 
रूप तुझे

विक्रांत मागतो 
जाग जगण्यात 
योग असण्यात 
सवे तुझ्या

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in
००००

शुक्रवार, ५ जुलै, २०१९

जीव दत्त पायी




जीव दत्त पायी
***********

फेडूनिया ऋण 
काही जीवनाचे
मजला जायचे 
आहे जरी ॥

अडकला जीव
माझा दत्त पायी
मज अन्य काही 
नको वाटे ॥

चाललो घेऊनी 
संसाराचे ओझे
आलो प्रारब्धाचे 
मापे जरी ॥

सांभाळ रे दत्ता 
नेई आता पार
मजला आधार 
अन्य नाही ॥

वाहतो विक्रांत 
प्रारब्ध प्राक्तनी
दत्ताला स्मरूनी
सदोदित 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, ४ जुलै, २०१९

सुटो अहंकार




सुटो अहंकार
********

माझिया मनाचा
सुटो अहंकार
जेणे तुझे दार
अडविले ॥

होऊन धुकट
येते तुझ्या आड
डोळ्यास झापड
लावतसे ॥

तूच माझा सखा
स्वप्न सजविता
मरणाची गर्ता
चुकविता ॥

इवल्या फुंकरी
सरू दे आभाळ
कृपेची सकाळ
करी बापा ॥

नाव अवधूत
गाजो तुझे मही
त्राही त्राही पाही
विक्रांता या ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...