रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

दत्त म्हणता म्हणता




दत्त म्हणता म्हणता
आला सुखाचा रे पूर  
पथ पडला दृष्टीस
झाले काटे सारे दूर  

दत्त संन्यासी विरागी
असे सद्भक्ता आतूर
तया मागणे संसार
सोने सोडूनिया धूळ

हवे पोटाला तेवढे
देई चुकल्या वाचून   
नेई धर्माच्या वाटेला
महा कृपाळू होवून

तया पायाशी वाहीला
पाप पुण्याचा मी साठा
येरझारीचे सामान
जड अहंकार खोटा

राखे तैसाच राहतो
पदा धरुनी ठेवतो  
मन हवाली करुनी
सुखे जगात राहतो

जन्मो जन्मीचे हे पुण्य
आले सफळ होवून
पुण्य घरात जन्मलो
देह विक्रांत घेवून

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




कविता सौरभ




कविता सौरभ
********

कविता सौरभ 
जयास कळला
कागद पुरला 
नाही त्याला 

शब्द धावती 
थकल्या वाचुनी
एकामागूनी
एक असे

येती कल्पना 
नभात फिरुनी
उपमा घेऊनी 
नवनव्या

आणिक मात्रा
वृत्त घोटली
नाहीत लागली 
पांघराया

श्रोता तयास   
जरी न भेटला
शब्द न थांबला 
रुजणारा

कृपा नशिबी  
जया लाभली
धन्य जाहली 
कविजन

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

दत्त एके दत



दत्त एके दत
*********

दत्त एके दत्त
दत्त दुणे दत्त
दत्त त्रिक दत्त
असे झाले ॥

क ख ग घ लुप्त
अवघे दत्तात
मात्रृका घरात
अवगम्य  ॥

सरे अंकलिपी
संपले गणित
दत्त संगतीत
मोजमाप ॥

ओंकारा सकट
स्वरांची वरात
हरवली आत
दत्त गात ॥

शुन्याच्या शाळेत
दत्ताचा वर्गात
विक्रांत सुखात
नांदतसे ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

कृष्णेचिया काठी


कृष्णेचिया काठी
************



कृष्णेचिया काठी
संगमाच्या पाठी
वाडीचिया मठी
स्वामी नृसिंह

चालतो गजर
डुले औदुंबर
कृपा भक्तावर
देव करे

करुणा सागर
मायेची पाखर
घाली दीनावर
आसावल्या

त्याच्या कृपेने
घडे तिथे जाणे
कृपेची किरणे
अनुभवने

मागतो मी दत्ता
तुज एक दान
दावी रे चरण
सदा तुझे

विक्रांत ओवाळा
संसारी मळला
आळवि प्रभूला
स्नात करी

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


डिसोझा सिस्टर


डिसोझा सिस्टर
(रिटायर झाल्या तेव्हा )
************
शुभ्र फुले कमळाची
यावीत जशी सामोरी
येण्यात तुमच्या होई
गंधीत दुनिया सारी

निर्मल सोज्वळ जशी
चांदणेच ओघळावी
शालिन शीतल अशी
व्यक्ति आम्ही पहिली  

धर्म वर्ण अभिमान
सेवेत समर्पित सारी
हवी हवीशी सर्वांना
कर्तव्य दक्ष तू नारी

जाता जरी सोडूनी हा
कर्मयोग मांडलेला
कुशीत गावच्या लाल
सुखसौख्य भोगायाला

जाणतो सारेच आम्ही
व्हाल फुलांचा ताटवा
सदा सुगंधि कराल
घर दार आणि गावा  

सदा सुखी रहा अश्या
दिले जैसे सुख जगा
स्वजना सोबत आयू
नित्य ते आरोग्य भोगा

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे





गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

आम्ही दत्ताचे चाकर




आम्ही दत्ताचे चाकर
आम्हा दत्ताची भाकर
पोट चाले दत्तावर
सदोदित

दत्त म्हणता म्हणता
काम चालू राहे सदा
दत्त जगण्याच्या वाटा
चालविता

दत्त निजेला गोधडी
दत्त तहान या ओठी
जन्म चाले दत्तासाठी
अहोरात्र

दत्त विक्रांत मालक
जन्म मरण चालक
युगा युगांचा पालक
भाग्यवशे

काय सांगू त्याची मात
किती ठेवितो सौख्यात
धनी करितो क्षणात
नोकराला


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

दत्त फळीवर




दत्त फळीवर
दत्त गाडीवर
दत्त छातीवर
सोनसळी

दत्त देव्हार्‍यात
दत्त देवळात
दत्त कोनाड्यात
देवळीच्या

दत्त ओफिसात
टेबल काचेत
दत्त निरखत
पापपुण्य

दत्त भरलेला
जग जगण्याला
दत्त साठलेला
ध्यानीमनी

विक्रांत दत्ताला
कुठे ठेवियला
दत्तात शिरला
दत्त रुपे

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...