बुधवार, ३० जानेवारी, २०१९

डाव





डाव

कधी उन्हात पोळतो
कधी जातो साउलीला
आयुष्याचा खेळ नच
कधी कळतो कुणाला ॥

कधी नीटस मांडला
कधी उधळून दिला
किती रंगला तरीही
अंती मातीत आखला ॥


व्यूह परीकर थोर
हरतात  जिंकलेले
काळासी होड चाले
नाणे वर उडवले

दर दिसी नवा डाव
दर निशी नवी हार
कमावितो नच कुणी
गमावतो वारंवार

हारजीत अंती पण
अवघाची हरणारे
उठूनिया जाती गडी
येती नवे खेळणारे

खेळण्याच्या सोस तरी 
काही केल्या जात नाही
कुणा हवे खेळण्याला
काहीच कळत नाही

खेळविता दूर कुठे
आत किंवा बसलेला
खेळण्याच्या गोंगाटी या
आत्मभान हरवला 

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

दत्त होवो




दत्त होवो
*******
स्थिती मनाची 
गती जीवाची 
वृत्ती चित्ताची 
दत्त होवो

मग हे चरण 
मी न सोडीन 
भ्रमर होईन
जन्मोजन्मी

करुणा किरण 
हृदयी धरीन 
अवघे सोडीन
आड आले

बस इतुके 
प्रभू घडावे 
ओठात राहावे
नाम तुझे

मग हा विक्रांत 
देहासोबत 
जाईल वाहत 
यथागती

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


अजूनही स्पर्श तुझा





                                    no idea about photo and this cute couple ,if its privet I will remove it .

अजूनही स्पर्श तुझा
गात्रात या मोहरतो
अजूनही शब्द तुझा
देहात या झंकारतो

त्या झिंगल्या क्षणांशी  
तद्रुप असा की  झालो
ओठातील गाणे तुझे 
ओठांत वेचून आलो

ती प्रतिमा मुक्त तुझी
आसमंत व्यापलेली
बाहूत वादळी तुझ्या
मी आकाश निळे झालो

जीवनाचे गुढ सारे 
पाहूनी इथे मी आलो
तुझ्यामुळे जीवनाला
सखी भेटून मी आलो


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, २७ जानेवारी, २०१९

मन दत्ताचे



मन दत्ताचे
*********

मन वाऱ्यांचे 
मन ताऱ्यांचे
मन विखुरल्या 
कण पार्‍याचे 

मन आकाशी 
मन प्रकाशी
मन येऊनिया 
तव दाराशी

मन भिजले रे 
मन थिजले रे
तव रूपात 
बघ सजले रे

मन पाण्याचे 
मन गाण्यांचे
मन कोंडल्या 
तव प्रेमाचे

मन नाचते 
मन खेळते
मन सदैव 
तुज स्मरते

मन विक्रांतचे 
मन जगताचे
मन संकल्पी 
होय दत्ताचे

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



शनिवार, २६ जानेवारी, २०१९

अवधू




अवधू
*****

अवधू माझा
सखा जीवाचा
असे प्रीतीचा
महाराज ॥१

कुठे बसला
कुठे वसला
नसे दृष्टीला
ठाव त्याचा ॥२

कैसा भेटीन
कै मी पाहिन
डोळा भरून
जिवलगा॥३

मार्ग दिसेना
तम  हटेना
चैन पडेना
जीवा माझा ॥४

येई दयाळा
भक्त प्रेमळा
घेई ह्रदया
या विक्रांता ॥५

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


स्वातंत्र



स्वातंत्र
*****

स्वातंत्र्य म्हणजे काय असते
फक्त एक कल्पना असते
आपण गुलाम आहोत
हे कळल्यावर उठणाऱ्या
वादळाची धूळ असते

राजकीय गुलामी कळणे
तर सोपे असते
तिच्या विरुद्ध लढणेही
सोपे असते

आपण वागवीत असतो
ती मानसिक गुलामी
ती तोडणे खूप कठीण असते

आपण गुलाम असतो
रूढीचे संस्कृतीचे जातीचे धर्माचे
या सा-याचे जीवनातील
अपरिहार्य सांघीक व सामाजिक
 स्थान ओळखून
त्यांची गुलामी नाकारून
त्यांच्यावरती उठून
आपण जेव्हा विराजमान होतो
मानवतेच्या भूमिकेवर
तेच खरे स्वातंत्र्य असते

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

तुझ्या विन





तुझ्याविन

अजूनही मनास या
तुझीच आस आहे
अजूनही डोळ्यात या
तुझेच भास आहे

सैराट जन्म जरी हा
जाहला कुठे किती
येतेच हि नाव माझी
सखये तुझा तटी 

उरातला हौदोस हा
कळेना या जीवाला
येई वावटळ ऐसी
चैन पडेना जीवाला

हरवते जीवन हे
सखी तुझ्याविन
निस्तब्ध श्वास होती
हे आकाश ही जमीन  

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...