शनिवार, १८ मार्च, २०१७

माझी कविता







माझी कविता 

तू कविता होतीस माझी 
आताही तूच ते गीत आहे
छंद भरल्या शब्दात माझ्या 
प्राण उजळून गात आहे 

हे भेटणे तर एक बहाणा 
तू कधीचीच अंतरात आहे
किती युगे झाली तुटून
आठव सुंगधी वाहत आहे 

ओढ जीवाला होती तेव्हा 
तीच आज उसळत आहे 
येशील तू न येशील ओठात
मूर्ती तुझी मनमंदिरात आहे

अर्थहीन आयुष्याची जरी
पोकळी जीवनात आहे 
दिसतेस तू क्षितिजावरती
वाटते सुखाची बात आहे 

जगलो जरी तुझ्याच साठी
अजून लालसा मनात आहे
तुझी अबोल भिडस्त भाषा 
लाख शब्दांची बरसात आहे ।

श्रीमह्नमंगले शारदे वाग्देवते 
तव कृपा उज्वल पहाट आहे 
अंधारल्या जीवनाचा माझा 
हा किती सुंदर शेवट आहे 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

उत्तर कोरीया ....







उत्तर कोरीया ....
************

कशी लंका रावणाची
अजुनी इथे नांदते
उत्तरेला कोरीया का
नरक असा भोगते

मुठभर सत्ताधारी
अनिर्बंध माजलेले
अनाचार दुराचार
पापात राष्ट्र बुडाले

हक्क इथे माणसाला
जगण्याचा मुळी नाही
बंदुकीने मरतात
सुख थोडे मागताही  

कसे जग झोपलेले
का कुणास खंत नाही
म्हणे धरेस कुटुंब
काय आम्हा लाज नाही

प्रार्थनाच हाती माझ्या
त्याचे अस्त्र होवू दे रे
गांजलेले बंधू माझे
सुख त्यास पाहू दे रे

जाय तिथे जन्म घे रे
राम जनार्दना कृष्णा
निर्दाळी असुर पुन्हा
अभय देई त्या जना

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १६ मार्च, २०१७

जगत पसारा





अफाट पसारा 
तुझा विश्वंभरा 
शून्याचा गाभारा 
भरलेला ।।

अगणित योनी 
जन्म अक्षौहोनी
घडेना मोजणी 
ब्रह्मादीका।।

क्षणात घडती 
क्षणात मोडती
युगे लक्ष्यावधी 
तुझी इथे ।।

खेचर भूचर 
चर नी अचर 
किती जलचर
वनचर ।।

इवलीसी धरा
मज आकळेना 
लक्ष तारांगना
कैसे जाणू।।

अथांग अंधारी
कैसा घडे स्फोट 
विश्व हे प्रकट 
कैसे होय ।।

आधी तो अंधार 
कुणी निर्मीयला 
कुणाला सुचला
संकल्प तो ।।

पडता गहन
मनास हे प्रश्न 
जीणे अर्थशून्य 
वाटू लागे।।

चित्त व्याकुळते 
दिड्मुख होऊन 
जातसे शरण
तुज पूर्ण ।।

उत्पत्ती उत्पका
जगत पालका
विनाश नाशका
दत्तात्रेया ।।

विक्रांत अजाण 
प्रश्न गुंडाळून 
चरणी बसून 
स्वस्थ झाला ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

मी चकोर




मी चकोर

तू कशी दिसत असशील ,
कोणता ड्रेस घातला असशील  ,
किती छान दिसत असशील
असेच काही विचार
भरकटत
येतात माझ्या मनात
आणि अंतराच्या या शापाने
हळहळते मनात

आणि अचानक वाटते मला
तू माझ्या शेजारीच बसली आहे
कुठल्याश्या प्रवासात
आणि
वाऱ्याने तुझे केस
स्वैर उधळत आहे  
मला त्यांचा स्पर्श होत आहे
मग मी वाऱ्याला मागे सारत
तुझे केस सावरत आहे

तू लाजून हसून
वळवून मान
खाली पाहतेस   
त्या हसण्याचे चांदणे
उलगडते माझ्या मनात

आणि इतक्या दूरवरही
माझ्या अस्तित्वात पसरते  
त्याची आल्हादक शीतलता
जाते माझ्या बैचेनीवर
एक मुलायम पांघरून घालत ... 

मी नक्कीच चकोर झालोय वाटतं !!


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...