शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

अग्नी स्पर्श






कुठवर वाहू
जीवन ओझे  
मजला लाजे  
मन माझे  ||

जरी नालायक
तुझिया प्रेमास    
का रे जीवनास
स्वप्न दिले  ||

भक्तीभावना   
मज ना कळते   
चित्त न रमते 
ग्रंथांतरी   ||

बैचैन अंतर  
स्मरे रातदिन  
दत्त दयाघन
कृपा करी   ||

ये रे  लवकरी  
ने रे झडकरी
देवून कर्पुरी   
अग्नी स्पर्श  ||  

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/






शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

निळूला




निळूल्या सागरी
निळूली बावरी
निळ्या उधळणी
नीलमणी झाली

निळे निळे मन
निळे निळे तन
घन नीळ क्षण
राधा अन कृष्ण

विभ्रमी पाखरं
विभ्रमी वासरं
गूढ  चराचर
मंत्रित साचार

मोरपीसी खुळा
महाशून्य डोळा
होऊनी आंधळा
रंगी नादावला

देह हरवले
सूरी नादावले
कुणी कुणा केले
मूर्त प्रेम बळें

विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

मरणी बांधले मीपण






सुटली सरिता नसला किनारा
जगत पसारा | कालरूपी ||
पाहणाऱ्यास त्या पाहता पाहता
पाहणे नसता | कालातीत ||
तो अनुभवता जाणून घेता
अन आकळता | अनुभवा  ||
पाहणारा सारे तेही तोच होता
सांडूनिया जाता | तो कुठला ||
विचार हटले समयी विणले  
मरणी बांधले | मीपण ही ||

 विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

भेट








भेट मागतो मी
तुझ्या वाढदिवशी
सांग कधी देसी
भेट मज ||
माझ्याकडे नाही
देण्याजोगे काही
कफल्लक पाही
भक्त तुझा ||
सोने चांदी हिरे
तुज काय कमी
सेवक हुकमी
जग सारे ||
करीता स्तवन
शेषदेवा मौन
वेदा ही लहान
तोंड झाले  ||
माझ्याकडे फक्त
वेडगळ आशा
जाणायची तृषा
जन्म मृत्यू ||
मज न जमते
साधन शरण
जप ध्यान मौन
सांगितले ||
असे जळजळ
उरी हलाहल
कधी रे संपेल
जन्म दु:ख ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...