शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

राखी





म्हटलं तर दोराच
दोन गोंडे लावलेला
बेगडा मध्येच मणी
छानपैकी सजविला

समर्थ असा पण की
जीव जीवास देणारा
रक्तातल्या हुंकाराला
क्षणात साद देणारा

नव्या वर्षी नवी गाठ
नवा धागा हाती येतो
प्रेमाचा नि आठवांचा
ठेवा वृद्धिंगत होतो

मुग्ध बालपणी सवे
हळूहळू फुलतांना
जीवनाच्या घडणीत
साथ सोबत घेतांना

निरपेक्ष वर्षेगत
माया ती पांघरताना
जीवना मी धन्य झालो
नाते असे जपतांना

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

Kavites
athikavita.blogspot.in

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

उजळले मन






उजळले मन
ज्ञानदेवी माय
जाहला उपाय
काही एक ||

केली आटाआटी
शब्दा घेत झटी
म्हणूनिया युक्ती 
कळो आली

मशके धरिली
अवकाशी आस
तयाचा तू ध्यास
पूर्ण केला

पाकळ्यांचे शब्द
मुग्ध आळूमाळू
परम कृपाळू
दृष्य झाले  

अमृताच्या सरी
ओघळल्या दारी
भिजुनिया उरी
चिंब झालो

अर्थातला अर्थ
रुजो आता मनी
सुफळ होवुनी
शब्द यात्रा

विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

बाराव्या अध्यायी






बाराव्या अध्यायी । थांबलो अडलो ।
भक्तीसी जाहलो । सादर मी।।१।।
कळेना मनाला ।काय वाचू पुढे  ।
जाहले एवढे ।ओझे मज।।२।।
दडपली छाती ।पाहुनिया ज्ञान।
क्षण एक कण।मज पुरे।।३।।
परी माऊली ती। धरुनिया हाती।
सवे चालविती।सदोदित।।४।।
कळेना घुसते ।काय  टाळक्यात।
शब्द मंदिरात।सेवक मी।।५।।
कृपाळू अनंत। सखा ज्ञानवंत।
म्हणुनी  विक्रांत।धीर धरी।।६।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

निरोप

निरोप ( विसर्जन) ***** आलास आता आताच  अन्  पुन्हा निघालास  कसे दिवस उलटले कळले नाही कुणास ॥१ तुझे स्थान हृदयात  जरी का नित्य  अस...