बुधवार, २० जुलै, २०१६

देव आधार







देव आधार सदाचाराचा 
चारित्र्याचा नीतीचा  
सारासार विचाराचा
देव आकार प्रेमाचा , 
सहृदयाचा मांगल्याचा
नि कल्याणाचा
देव अपार सामर्थ्याचा 
सुज्ञ जाणीव देणारा 
सदा साक्षी असणारा
देव नसे रे जादूगार    
दुनिया स्वर्ग करणारा 
मरती मुंगी वाचवणारा
देवत्वाची पूजा माझी 
पूजा असते आशेची  
कामना अन मानव्याची  
 अंधारावर जय मिळविणाऱ्या 
 त्या उद्याच्या सूर्याची
तो देव जर हरवला  
अर्थ न राहीन लढण्याला  
या इथल्या जगण्याला  
मनीच्या उज्वल माणुसकीला
म्हणून जपतो  
देव मी पूजितो  
अग्निसम रे जगायला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
 


मंगळवार, १९ जुलै, २०१६

गुरुराय माया





अनंत हातांनी
अनंत रूपांनी
दिलेय मजला श्रीगुरुरायानी ||१||

माझ्या याचनेचा
माझ्या यातनेचा
अंत सहजच टाकला करुनी ||२||

कधी पदतळी  
काटे ही टोचली
परी थकता मी नेले उचलुनी ||३||

पाहणे रूपाला
हट्ट मी धरला  
घटोघटी होता परि तो लपुनी ||४||

कळलेच नाही
तेधवा जे काही 
जाणवे अवघे पाहता वळूनी ||५||

साऱ्या कामनांचा
स्वामी तो सुखाचा
सदा परी मज गेला ठकवूनी ||६||   

आता न मागतो
त्यालाच वाहतो
तन मन प्राण सारे ओवाळूनी ||७||

गिरनार राया
गुरुराय माया
पाहतो विक्रांत शरण जावूनी   ||८||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  













शुक्रवार, १५ जुलै, २०१६

दत्ता तुझी आस






दत्ता तुझी आस
लागली प्राणास
जाळतात श्वास
रात्रंदिन ||१

दत्ता तुझा भास
होतसे मनास
जीव हा उदास
तळमळे ||२

जावे गिरणारी
धावुनी माहुरी
वा गाणगापूरी
वाटे सदा ||३          

बघ इथे आता
जीव न रमतो
कासावीस होतो
तुजविन ||४

संसाराचे ओझे
वाही कसेबसे
पांघरून पिसे
लौकीकाचे ||५

काय तुज देणे
भक्ती अवघड
विक्रांत हा जड
आवडेना || ६

माऊलीच्या पोटी
राग बरा नाही
द्वाड लेकराही
पोटा धरी  ||७

आणि काय तुज
मागू सांग आई  
चरणासी घेई  
विक्रांता या ||८

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  

                  






झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...