बुधवार, ६ जुलै, २०१६

ओझे अजुनी







कालचे ओझे अजुनी
पाठीवरी वाहतो मी
सुटका नाही तरीही
स्वप्न एक पाहतो मी

फार काही वांछिले ना
सत्य फक्त मागतो मी
शत दु:खे वेदनांची
तरीही गाणे गातो मी

भोगणे प्राप्त मनास
पुन्हा पुन्हा सांगतो मी
आणि मार्ग सुटकेचे
रोज रोज शोधतो मी

रातदिन युद्ध माझे
रोज जरी हारतो मी
धरिले हृदयी तुवा
दत्ता नच सोडतो मी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, ३ जुलै, २०१६

मोह इवले ढसाळ






मोह
****

मोह इवले ओढाळ
मना वाहूनिया नेते 
नामी रंगलेले चित्त
पुन्हा ढळते मळते

मज कळेना कृपाळा
तुझा डाव हा कसला
घेई क्षणात पोटाला
देसी लोटून दुरला

दिल्या नात्यात जगतो
देह प्रारब्धा वाहतो
जरी सांभाळ म्हणसी
शक्ती तुलाच मागतो

देह शिणला भागला 
काळ थोडाच राहिला
नको मोकलूस आता
ठाव देई रे पदाला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १ जुलै, २०१६

नर्मदेचा काठ






नर्मदेचा काठ
तुडवावी वाट
राहावे चालत
जन्मोजन्मी || १ ||
कणोकणी साऱ्या
व्हाव्या गुजगोष्टी  
तरुवेली नाती
दृढवावी || २ ||
चंद्र सूर्य तारे
आकाश सोयरे
कवळावे वारे
भणाणते || ३||
मंदिर मठात
घालावे आसन
करावे साधन
मनसोक्त || ४||
मैयातीरवासी
सखे आप्तजन
उरात बांधून
घ्यावे प्रेम  || ५ ||
काठोकाठ किती
संत भक्तजन
तयांचे चरण
वंदावे मी || ६ ||
अंती प्रवाहात
जावे हरवून
जीवन संपून  
तिच्यातीरी  || ७ ||
दत्ता दयाघना
पुरवावी आर्ती
विक्रांतची माती
धन्य व्हावी || ८ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/









अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...