शनिवार, ३० जानेवारी, २०१६

सांभाळले बळे






गाठी पडलेले वाहायचे गप
चहाचा कप 
भुकेलेल्या ||
थिजले कातळ उगे युगोयुगी
अभिलाषा जागी 
मृतिकेची ||
गंजली आयुधे दुबळ्या हातात
लादल्या युद्धात 
हतवीर्य ||
चाले कसरत तरीही हातांची
भंगल्या मनाची 
समजूत ||
घेई पदरात भिकेचे डोहाळे
सांभाळले बळे 
दत्तात्रेया ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

स्वामी राया









मी स्वामींचा हे कळतेय मजला  
जन्माचे नाते स्पर्शे हृदयाला  

पण घडेना संग सेवा जीवाला  
कळेना असा हा अंतराय कशाला  

होता दारवान बंद दारात   
सुटला हुकूम सोडा रे त्या आत  

जाहला प्रवेश पाहीला मी देव   
भाग्याने दिधले अभाग्यासी खेव   

तेच ते आसन करारी मुद्रा   
तेजाने कोंदाटे दरबार सारा   

सुरेख सुंदर भक्ताचा समुदाय  
पुण्याचे पुतळे भाग्याचे राय  

लोटले दिस किती सरले मास    
तेवढाच तो घडलासे सहवास  

परी गेले ना जीवन भरून  
तया वाचून अवघे हरवून   

सुटावे शब्द भ्रम हे मनाचे  
जळावी आशा स्वप्न उद्याचे  

दत्त दिगंबर हो स्वामी राया   
शब्द निनादो माझिया हृदया  

 विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

तू येशील तेव्हा ये रे






तू येशील तेव्हा ये रे  
माझे मागणे नसे रे    
तुज वाटले कधी तर  
उधळून माझे दे रे      

हा वर्षाव वेदनांचा  
मजला नवीन नाही  
किती जन्म वाहुनी हे
ओझे असे अजूनही

असोत हिशोब तुझे    
जे मजला न कळती
अन देता मिळे काय
प्रश्न कधी न पडती

जवळी भाव सुमने
मज ठाव फक्त देणे 
कळतो ना नफातोटा
व्यापार काही करणे

सर्वस्व माझे हे देणे
जणू फुल ओघळणे
लक्ष्य तारका नभात  
गळून एक पडणे

जाईन जन्म हा वाया    
जावो उगाच सरून
तृण फुल कधी का रे
आकाश घेते व्यापून

तव प्रांगणात आले  
तव चांदण्यात न्हाले
तव वर्षा ऋतू प्याले
जणू मीही तूच झाले

द्वैताची आस अशी ही
अद्वैतास का पडावी  
आकाश होवूनही का
धरातृषा जळास व्हावी   

तू जाणतोस अवघे
का खेळ असा खेळसी
मोहात पुनरपि का
जन्मास मज घालसी

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...