बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

सुगरण ..






लावलेल्या रोपट्याला
अर्थ मातीचा कळेना
विझुनिया स्वप्न सारे
डंख जपे जागेपणा

तेही माझे होते कधी
हे ही माझेच आहे रे
विस्मृतीच्या काळपोटी
विश्व सारे दाटले रे

घेई ना उगा उखाणे
नाव कुणाचे गुंफुनी
सांभाळता सांडले ते
जाय आता विसरुनी

काळ वेळ जोखडांची
चाकोरीच बांधलेली
संपताच खेळ वेळ
कनात ती उसवली

आणि मागे उरे इथे
पावलांचे ठसे काही
कोण आले कोण गेले
न वाहे चिंता कुणीही

अर्थ तो कुणा कळवा
त्यागलेल्या घरट्याचा
सुगरण का घेतसे
शोध दुसऱ्या फांदीचा   

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

तो अन मी






माझे म्हणणे त्याला
अजिबात पटत नाही
त्याचे म्हणणे मला
व्यवहारी वाटत नाही
पण कधीतरी तो
माझे म्हणणे ऐकतो   
आणि माझ्या गाण्यास
साथ देण्यास येतो  
पण डोलता डोलता  
अचानक का न कळे
मधेच उठून जातो  
सारे सारे दूर सारून
कुठेतरी डोळे खुपसून
एकटाच बसून राहतो
विलक्षण व्याकुळता
त्याच्या डोळ्यात दाटते  
हृदयातील तडफड
सारे क्षितीज व्यापते
सुरांच्या पलीकडले
शब्दांच्या पलीकडले
काहीतरी त्याला जणू
सदैव खुणावत असते
पण धरू जाता हातून
निसटून जात असते
त्याच्या माझ्या जगातील
आकाश मिटत नाही
कोण आत कोण बाहेर
कधीच कळत नाही
तो गेल्यावर काही केल्या
माझे गाणे रंगत नाही
त्याच्या शिवाय कश्याला
अर्थही येत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...