मंगळवार, ७ जुलै, २०१५

दे सखी तुझे प्रकाशाचे हात







जमले तर दे सखी
तुझे प्रकाशाचे हात
जमले तर दे मज
या वळणावर साथ

असे कुणास ठावूक
किती चालने अजून  
कधी कळले कुणास 
मार्ग जाईल संपून

कुण्या जन्माचे देणे
हाका मारते अजून
कुण्या जन्माचे नाते  
हक्क सांगते अडून

क्षण हरेक जगतो
तुज डोळ्यात माळतो
हाका मारुनिया मूक
शब्द कोषात ठेवतो

पायी शृंखला कुणाच्या
मन धावते माघारी
आशा वेडगळ तीच
बोल बोलते अंतरी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 

सोमवार, ६ जुलै, २०१५

मृत्यू इयत्ता नववीतला ...





काल अचानक पाहिला मी
मृत्यू इयत्ता नववीतला
खेळता खेळता दारामध्ये  
डाव अखेरचा संपलेला

रोगराई नव्हती कुठली
नव्हता अपघात वा झाला
हसता हसता धावता धावता
होता तो खाली कोसळला

कणखर काटक देह त्याचा
आणि निरागस चेहरा
माती लागली हाता गाला
अंगावरती घाम सुकला

एक विच्छिन्न आक्रोश
साऱ्या रुग्णालयात दाटला
एकमेकांच्या मिठीत रडत    
त्याच्या मायबापांनी केलेला

आग हृदयी पाहणाऱ्याच्या  
डोळ्यात सागर दाटलेला
का ? कश्याने ?या वयात?
प्रश्न साऱ्यास पडलेला

काय कुणा सांगावे मी
अर्थ नव्हता जरतर ला
ट्रॉलीवर तो अलगदपणे
जणू आताच निजलेला   

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ५ जुलै, २०१५

स्पर्श ओले..





आठवांच्या पावसाला
किती धरू कसे धरू
वेचलेले क्षण क्षण
उरी ओझे काय करू

माझ्या सवे जाईलही
माझ्या स्मरणाची गाथा
किती अन कुणा वाटू
देही डोई किती कथा

ठरलेल्या चाकोरीत
वाहुनिया जाते पाणी
नवा ऋतू नवी वर्षा
नवेपनी जुनी गाणी

सांभाळता सांभाळले
हातातून ओघळले
हळू हळू स्पर्श ओले
कुण्या हाती विसावले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...