मंगळवार, ९ जून, २०१५

खातात लोक रस्त्यावरी






  



 

नाक्यावरी वडापाव 
मित्र सारे आम्ही खातो 
जळते जिव्हा तरीही
पुन:पुन्हा वाखाणतो

लागल्यात गाड्या किती
लाईनीत रस्त्यावरी
वडा सॅडविच डोसा
दही शेव पाणीपुरी

खरकटे डिश जरी
डबक्यात पोहतात
ग्लास चहा प्यायलेले 
बुचकळूनी येतात 

असो खरुज इसब 
जागोजागी अंगावरी 
वड्यात ते येते काय
छानसे तळल्यावरी 

तेल पामोलिनी असो 
पुन:पुन्हा उकळले 
रंग काही टाकलेले
स्वस्त सारेच मसाले 

कसले आहेत हात
ओतले काय कश्यात
सारे काही होते माफ
वाचविल्या त्या पैशात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







तिने लग्न केले तर






तिने लग्न केले तर
सांग काय करशील ?
आडात जीव देशील  
का झाडा लटकशील ?

तिचा जीव घेशील का
आम्ल अंगी फेकशील ?
प्रेमासाठी वाट्टेल ते
जगा या दाखवशील ?

सांगता न ये मनाची
काय उर्मी उसळेल
सूड क्रोध अपमान
अवहेलनी जळेल  

मनावरी ताबा कुणा
आग होईल विझेल
पण सांगतो ऐक रे
ते तुझे प्रेम नसेल

हवेपणी हपापले
पशुत्व फक्त असेल
नरकाच्या नरकात
जगणे एक उरेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ८ जून, २०१५

मागतो मी अंत आता






ही सुखाची पायवाट
इंगळ्यानी सजलेली
अन माझ्या डोळ्यावरी
पट्टी तूच बांधलेली

वेचलेल्या फळात का
विष असे साचलेले
क्षणोक्षणी दाह उरी
आणि रक्त पेटलेले

सुखासाठी धावतो मी
काय तुझा खेळ होता
मागतो मी अंत आता
काय नसे तुझ्या हाता

जळतांना नाव घेतो
मनाचेच समाधान
जंबूकांनी फाडूनही
अडकला कंठी प्राण

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...