रविवार, १० मे, २०१५

स्वीटवाल्याचा मुलगा वारता





समोरच्या स्वीटवाल्याचा
मुलगा अचानक वारला
कर्तासवरता तरुण
क्षणात हातून गेला
गोरापान हसमुख उमदा
तत्पर सावध नेटका .

पंधरा वर्ष समोर दुकानात
रोज दिसत होता
जाता घेण्यास काही आत
देवून हलके स्मित
ओळख दाखवत होता.

कळले जेव्हा तो गेला
मनात तोच सवाल उठला
अरे हे काय वय आहे
असं अचानक मरायचं
मिठाई वाला झाला म्हणून
काय हार्टअॅट्याक यायचं

अन जाणवलं एक दु:ख
काहीसं अनपेक्षित
जे राहिलं मनात
खूप काळ उगाच रेंगाळत
गेलं हळूहळू विझत
तेव्हा लक्ष्यात आलं की
काही काही माणसं आपल्याला  
मैत्री नसून आवडतात
दूरवर राहूनही
खूप चांगली वाटतात
रोज दिसणाऱ्या हिरव्या डोंगरागत
गर्द चाफ्याच्या भरल्या झाडागत

त्यामुळेच त्याच असं निघून जाण
मनाला फार त्रास देत होतं
कितीतरी काळ मन हळहळत होतं

आणि हो ! त्याचं नाव !!
जेव्हा बोर्डावर लिहिले गेलं
तेव्हाच मला कळलं
कदाचित ते मला
कधीच कळलं नसतं
मी कदाचित कधीच कुणाला
विचारलही नसतं
आता तर तो मला
कधीच दिसणार नाही
पण त्याचं नाव मात्र मला
कितीतरी दिवस भेटत राहील
काळाचा विस्मृतीरुपी पडदा
खाली उतरेपर्यंत

विक्रांत प्रभाकर




शुक्रवार, ८ मे, २०१५

मी मात्र भरुन पावलो...






तुझे माहित नाही मला
मी मात्र भरुन पावलो
तुझी प्रीत लाभल्याविन   
बघ प्रेमाने समृध्द झालो

असे मात्र मुळीच नाही
कि जखमा झाल्याच नाही
रात्र रात्र जागुन रडलो
तुझ्यासाठी सखये मी ही

ते सुखाचे शुभ्र उमाळे
अन विरहाच्या आर्त रात्री
जगलो जगलो सखी मी ग
जीवन जाणले काहीतरी

खरोखर  प्रीत शिकवते
अद्भुत अगम्य जगायला  
आपल्याला हळूच कळते
अंतरात अन उमलायला

तसा तर तुझ्यासाठी मी  
उभा पायी जन्म अंथरूनी
पण तू ना आली म्हणूनी
जाणार नाही कधी जळूनी

अमृत स्पर्श होता एकदा
मृत्यू का येणार कुणाला
अर्थ प्रीतीमधला कळता
रूप सुवर्ण ये लोहाला

विक्रांत प्रभाकर

बुधवार, ६ मे, २०१५

शूल घुसे काळजात






अश्या विझल्या डोळ्यांनी  
थंड थिजल्या शब्दात
नको नको बोलू सखी
शूल घुसे काळजात

मिटले हे हसू तुझे
सांग कुणाच्या बोलांनी
का तुला खुपले माझे
जाणे शब्द उधळूनी

नाही कसे म्हणू तुला
जीव जडे तुजवर
पतंगा हाती नसते
झेपावणे दिव्यावर

कसे समजावू तुज
दावू भाव उघडून
सर्वस्व तुला वाहून
गेलो भणंग होवून

मरू मरू जातोय मी  
प्रेम तुझे संजीवनी
रागावता तुच अशी
उरणार ना कहाणी

विक्रांत प्रभाकर


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...