सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

विजेला जायचेच असते का






मानही न वळवता तू गेलीस
मला पाहूनही न पहिल्या सारखी
क्षितिजाच्या कडेकडेनी
अंग चोरुन गेलेल्या नभासारखी
अन मी कललेला भिंतीवर
तसूभरही न हलता
उभा होतो मख्खा सारखा
दृष्टीच्या विस्तारातून पाहत तुला
हळू हळू अंधुक होणाऱ्या नजरेनी ..
असेही कधी होईल
वाटले नव्हते मला
तू गेलीस अन
मोहळ उठल्यागत मन
तुझ्या आठवांनी उधाणून आले
तुझे हसणे बोलणे रुसणे ..
अन ते शेवटचे चिडणे
तळव्यात घुसलेल्या काट्यागत
अचानक अनपेक्षित
मी विव्हळ अन विदीर्ण
माझ्यातच भग्न
अन तू सुटलेल्या बाणासारखी
गेलेली माझ्या शब्दांना धुडकारून
कारण न घेता समजून  
तेव्हा ही तुझे अभिमानी मन
लखलखत होते
तुझ्या डोळ्यातून अन चेहऱ्यातून
विजेला जायचेच असते का सारेच जाळून

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

नेमाडे कधी वाचलेच नाही ..



  नेमाने ज्ञानेश्वरी वाचणारे आम्ही
नेमाडे कधी वाचलेच नाही
नाही म्हणजे कधीतरी एकदा दोनदा
हातात कोसला घेतला होता
पण इतका जीव गुदमरला की
कोश कधीच पुरा केला नाही
हिंदुच्या तर नावानेच धसका घेतला
अन त्या पायरीलाही पाय लावला नाही
पण आता या ज्ञानपीठवाल्यांनी
इतकी काही पंचाईत केली आहे
खरच सांगतो माझ्यातील मराठीची
सारीच हवा काढली आहे
सोडून दिलेले कोडे पुन्हा एकदा
द्यावे कुणीतरी सोडवायला
अशीच काहीशी वेळ वगैरे...
आता आली आहे माझ्या वाट्याला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/










गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

लावू द्या आम्हाला त ला त






उगाच बुडबुडे फोडण
असं बर नसत यार   
लावू द्या आम्हाला 
त ला त नि र ला र

फुगवितो आम्ही हे
आम्हा काय माहित नसतं
साबणाचे फुगे आमचे
क्षणिक त्याचं उडणं असत

जगू द्यात आम्हाला
आनंदानं खिदळत
चांगल वाईट शेवटी
मानण्यावरच असत

इवलाल्या शब्दातून
जग सार नवीन दिसतं
प्रत्येक श्वासा मधून
नवीन इंद्रधनू फुटतं

तरंगत्या बुडबुड्यावर
वेडे मन ही तरंगत
खरतर आपल जगणं
घर अंगणच असतं

प्रतिभासूर्य नाही आम्ही
ना भाव किमयागार
वेचलेली स्वप्न आमची
अन हे शब्दही उधार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...