रविवार, २५ जानेवारी, २०१५

हद्दपार




कुणाच्या जगातून झालो आहे हद्दपार
म्हणून काही फार फरक पडत नाही यार

कुणासाठी भोगलेय किती काळे पाणी
तशी ही वनवासात गेली आहे जिन्दगानी

सोड यार साऱ्या बाता असतात या इथे
मैत्री प्रीती नाती हे तर स्वार्थाचेच तुकडे

ऐकून होतो जगाची रीत अशीच असते
दुसऱ्याचे घर जळता दुनिया पहाया जमते

कधी मी ही प्रेक्षक होतो आज तुम्ही आहात
पडेल पडदा माझाही दुसरा उघडेल क्षणात

विक्रांत प्रभाकर



शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

येणे घडू नये







आता येणे घडू नये
निरुद्देश जगण्यात
नभातील पाणी जिरो
मातीतल्या खळग्यात

उधळल्या गाण्यामध्ये
मना चूक पाहू नको
शिशिरात गळलेले  
तुझे पान शोधू नको

भेटेल ही तेथे काही
किंवा वारी फुका जाई
शोधण्याचा अट्टाहास
तुझे इथे कुणी नाही

जाणलेले सत्य पाही
पदरात काही नाही
फेकलेले उचलतो
मना मुळी लाज नाही

बहु झाले लेखन हे
शब्द संपतच नाही
जळलेल्या रानामध्ये
आग पेटतच नाही

 विक्रांत प्रभाकर



गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

स्पर्श नवा ...







पान पान गळुनिया
झाड ओकेबोके झाले
गर्द निळ्या आभाळाचे
अन जीवा भान आले

उगाचच फुंकलेल्या
शीळेलाही अर्थ आला
मना मध्ये चीणलेला
कातळही ओलावला

इथे तिथे रेंगाळून
चित्र होते रंगविले
हरवूनी जाता हट्ट
मनी काही उमटले

दुरावला गाव मागे  
पुढे वाट उसवली
चालण्याला अर्थ आला
स्पर्श नवा पायाखाली
 
विक्रांत प्रभाकर

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...