गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

स्पर्श नवा ...







पान पान गळुनिया
झाड ओकेबोके झाले
गर्द निळ्या आभाळाचे
अन जीवा भान आले

उगाचच फुंकलेल्या
शीळेलाही अर्थ आला
मना मध्ये चीणलेला
कातळही ओलावला

इथे तिथे रेंगाळून
चित्र होते रंगविले
हरवूनी जाता हट्ट
मनी काही उमटले

दुरावला गाव मागे  
पुढे वाट उसवली
चालण्याला अर्थ आला
स्पर्श नवा पायाखाली
 
विक्रांत प्रभाकर

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

टिंब टिंब म्हणत जीवन







मी थांबलो असतो
तू म्हटली असतीस थांब जर
पण त्या निरोप समारंभात
निरोपाची फुले होती
तेव्हा तुझ्याही हातात
अन मग
ती दूरवर वाहणारी वाट
रुंद अन प्रशस्त गेली होत
पाय अडखळलेच नाही
असे कसे म्हणू मी
प्रत्येक वळणार
तुझी याद येत होती
प्रत्येक रात्री
तुझीच स्वप्न दिसत होती   
हे खर आहे की
जीवन अडत नाही कधी
कुणाच्या असण्या नसण्यानं
पण ते तुझे ठरवून नसणे
एखाद्या रिकाम्या जागे सारखे
खटकत राहते अन
टिंब टिंब म्हणत जीवन
पुढे सरकत राहते
उत्तर माहित असूनही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in


नुसतीच कविता लिहणं आवडल असतं मला






नुसतीच कविता लिहणं आवडल असतं मला
पोटासाठी लागते पण शब्दापासून दूर जायला
तीच सर्दी तोच खोकला तीच क्रोसिन मोक्सिसिलीन
फिरून फिरून वापरायचे क्लोब कॅंडिड सोफ्रामायसीन
तेच ते खरडायचे रिपोर्ट त्या तश्याच चौकोनात
आल्या गेल्या मेलवर अन रात्रंदिन लक्ष ठेवत
चुकार टुकार राईटस ऑफ.. दस रुपये में तमाशा दिखाव
धावा पळा गोळा करा नाही तो उपर चक्कर लगाव
कधी कुणी टिळेवाला कधी कुणी झेंडेवाला
कधी येतो टोपीवाला विटाळतो शब्द फुलला  
रे बिचाऱ्या शब्द सख्यानो हेच माझे आता जीवन
जरी असले भारंभार सभोवताली कागद पेन
लिहू जाता मनीचे बोल नवी कटकट येते समोर
किती एक कविता मग जातात वाहुनि वाऱ्यावर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...